Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या
बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते.
****
स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये
शिकागो इथं जागतिक धर्म परिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाला आज १३२ वर्ष पूर्ण झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात या घटनेचं स्मरण करुन, सद्भावना आणि बंधुत्वावर भर दिला.
****
आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त
आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्त समाजमाध्यमावर
जारी केलेल्या संदेशात, भारताच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विनोबा
भावे त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचं स्मरण केलं. विनोबा भावे यांचे विचार आपल्याला
विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक
व्यवहार समितीच्या बैठकीत चार पदरी हरितक्षेत्र महामार्ग बांधण्यासह एकूण साडे सातशे
कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या दोन प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात
आली. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधल्या भागलपूर
- दुमका - रामपूरहाट एकेरी रेल्वेमार्गाच्या १७७ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुपदरीकरणाचा
यात समावेश आहे.
****
लहान उपग्रहांच्या उड्डाणासंदर्भातील
स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल म्हणजेच एस एस एल व्ही तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी
न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरो यांच्या दरम्यान
तंत्रज्ञान हस्तांतरण करार काल पार पडला. इसरोने विकसित केलेलं हे जलद, मागणीनुरप काम करणारं लॉन्च व्हेईकल
म्हणून तयार करण्यात आलं आहे.
****
जीएसटीच्या कमी होणाऱ्या दरांची अंमलबजावणी
सुरू होण्यापूर्वी उत्पादित केलेल्या किंवा विक्री न झालेल्या वस्तूंची सुधारित किंमतीवर
३१ डिसेंबरपर्यंत विक्री करण्याची मुभा केंद्र सरकारनं उत्पादकांना दिली आहे. यासंदर्भातलं
परिपत्रक केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काल जारी केलं. कंपन्यांना जुन्या मालावर
नवीन किंमत छापून किंवा नव्या किंमतीचे स्टिकर लावून त्यांची विक्री करता येईल. हे
करताना जुनी किंमत दिसत राहील याची खबरदारी घेण्याची सूचनाही मंत्रालयानं केली आहे.
जीएसटीच्या दरांमध्ये झालेल्या फरकाचा फायदा ग्राहकांना पूर्णपणे होईल, याची विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
नेपाळमधली राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे
निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना
सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी दिली. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या
माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून, राज्यातल्या पर्यटकांना आवश्यक ती
मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहे. ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे १००
पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. यामध्ये ठाण्यातले
सर्वाधिक, तर नाशिकमधले चार नागरिक आहेत.
****
मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या
शासन निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केला आहे. आपली
बाजू ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय राज्य शासनाने घेऊ नये, अशी मागणी ओबीसी समाजाने केली आहे.
****
सातारा इथं होणाऱ्या ९९व्या अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत अतिरिक्त एक कोटी रुपयांचा
निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं, मराठी भाषा मंत्री उदय
सामंत यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाद्वारे काल पुण्यात आयोजित
कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण ज्येष्ठ हास्यचित्रकार
शि. द. फडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं. साताऱ्याच ऐतिहासिक महत्त्व या बोधचिन्हातून
प्रकट करण्यात आलं आहे. उत्तमोत्तम साहित्याचे मराठीत अनुवाद व्हावेत यासाठी अनुवाद
समिती स्थापन करण्यात आली असल्याचंही सामंत म्हणाले. राज्यातल्या अमराठी व्यक्तींना
मराठी शिकण्यासाठी लवकरच ॲप विकसित केलं जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
****
बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणाची
काल बीड इथं विशेष न्यायालयात सुनावणी झाली. आरोपी विष्णू चाटे याच्या दोषमुक्तीच्या
अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे. या प्रकरणाची
पुढील सुनावणी २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
****
जालना शहर महानगरपालिकेने केलेल्या
सर्वेक्षणात १३ हजार नळ जोडणी अनाधिकृत आढळून आली आहे. या प्रकरणी नोटीस देण्यात आली
असून, या संदर्भातली सुमारे ५ हजार प्रकरणं
आता १३ सप्टेंबर रोजी लोकअदालतीत ठेवण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय
संघानं आपल्या पहिल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर नऊ गडी राखून सहज विजय
मिळवला. भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध येत्या १४ तारखेला होणार आहे.
****
विभागात येलदरी धरणातून सुमारे दोन
हजार तर इसापूर धरणातून सुमारे साठे आठ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग
केला जात आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे.
****
या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक
वाजता.
****
No comments:
Post a Comment