Saturday, 13 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भारताची ज्ञानपरंपरा संरक्षण, नवाचार, संवर्धन आणि अनुकूलन या चार स्तंभांवर उभी; ज्ञान भारतम् संकेतस्थळाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन 

·      राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी जाहीर 

·      अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३ कोटी ५४ लाख रुपये नुकसान भरपाईचा शासननिर्णय जारी

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथे २६ शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

****

भारताची ज्ञान परंपरा संरक्षण, नवाचार, संवर्धन आणि अनुकूलन अशा चार स्तंभांवर उभी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्ली इथं ‘ज्ञान भारतम’ या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते.

इतिहासातील क्रूर आक्रमणांमध्ये लाखो हस्तलिखितं नष्ट झाली, तरीही भारताकडे जगातला सर्वाधिक हस्तलिखितांचा संग्रह असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

प्राचीन हस्तलिखितांचं संगणकीकरणातून डीजीटल रुपांतरण करत त्यांचं जतन-संवर्धन केलं जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी काल जाहीर करण्यात आली. यादीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद- सर्वसाधारण, जालना- नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिलांसाठी राखीव, बीड - अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव, परभणी -अनुसुचित जाती, हिंगोली-नागरिकांचा मागास प्रवर्ग, नांदेड-नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिलांसाठी राखीव तर लातूर आणि धाराशिव जिल्हा परिषद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे.

****

यंदाच्या जून ते ऑगस्ट दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं ७३ कोटी ५४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. ८४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे.

****

अमेरिकेतल्या स्टेट ऑफ आयोवा सोबत राज्यशासनाने काल एक सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कृषी तसंच कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रात दोन्ही राज्यं काम करतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

मराठी भाषा विभागाच्या वतीने आगामी काळात युवा साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे. मराठी भाषा मंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल अहिल्यानगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे लंडन इथं, वैश्विक मराठी भाषा केंद्र पुढच्या दोन महिन्यांत सुरू होईल, असं सामंत यांनी सांगितलं. राज्याचं नवं उद्योग धोरण, रत्न आणि आभुषणं धोरण, नवीन बांबू धोरण, अशा विविध १२ धोरणांचं सूतोवाच सामंत यांनी केलं.

 

मराठवाड्यातील बंजारा अर्थात लमाण समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटियर नुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत एक निवेदन त्यांनी सादर केलं. तेलगंणा आणि आंध्रप्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला, याकडे खासदार रवींद्र चव्हाण यांनी या निवेदनातून लक्ष वेधलं आहे.

****

मराठा आरक्षण देताना सर्व मराठ्यांना ओबीसी कोट्यात आणणं ही बाब आपल्याला मान्य नसल्याचं, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान, रेणापूर तालुक्यात वांगदरी गावातल्या भरत महादेव कराड या आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भुजबळ यांनी काल भेट घेऊन कुटुंबाचं सांत्वन केलं.

****

नेपाळच्या पंतप्रधानपदाची सुत्रं माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांनी स्वीकारली आहेत. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी काल कार्की यांना हंगामी पंतप्रधानपदाची शपथ दिली.

****

माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते काल २६ शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह आमदार विक्रम काळे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत शैक्षणिक 2024-2025 आणि तसेच 2025-2026 चे जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

वस्तू आणि सेवा कर-जीएसटी पुनर्रचनेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील करात मोठी कपात होणार आहे. येत्या दसरा दिवाळीला या वस्तूंची खरेदी नियोजित असलेल्या ग्राहकांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास छत्रपती संभाजीनगर इथले विक्रेते पंकज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे..

बाईट - पंकज अग्रवाल

****

लोकसहभाग, पारदर्शकता, आणि समान संधी यांच्या जोरावर प्रत्येक गाव आत्मनिर्भर, सुसंस्कृत आणि प्रगत होईल, असं प्रतिपादन आमदार नारायण कुचे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते. विकासाच्या विविध मुद्यांवर आमदार कुचे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाईमित्र सुरक्षा शिबिरं, पर्यावरणपूरक आणि शून्य कचरा उत्सव, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या कालावधीत विशेष ग्रामसभांचं आयोजन करून, स्वच्छ सुजल गाव घोषित करण्याचं उद्दिष्ट नांदेड प्रशासनाच्या वतीने निश्चित करण्यात आलं आहे.

****

उजबेकिस्तान इथे सुरु असलेल्या फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत महिला विश्वविजेती दिव्या देशमुखला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश मिळाला असून काल तिचा आणि ग्रँडमास्टर डी गुकेश यांच्यात सुमारे सहा तास चाललेला सामना अनिर्णित राहिला. दिव्या सध्या गुकेशपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहे.

****

हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सात्विक चिराग जोडीचा आज सकाळी चिनी तैपेयीच्या जोडीशी सामना होईल. तसंच पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा सामना चिनी तैपेयीच्या खेळाडूशी होणार आहे.

****

धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आजपासून दोन दिवसीय धाराशिव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पहिल्याच महोत्सवात निमंत्रित कवींचं राज्यस्तरीय कवीसंमेलन आणि भूपाळी ते भैरवी या मराठमोळ्या लोककलांचा आविष्कार हे कार्यक्रम सादर होणार आहेत. धाराशिव नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संध्याकाळी ६ वाजता हे कार्यक्रम होणार आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. यातच काल गुंडा गावानजिक असलेल्या ओढ्यातल्या पुराच्या पाण्यात दोन महिला वाहून गेल्याचं वृत्त आहे.

****

परभणी जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकाचं नुकसान होत आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरातही काल ढगाळ वातावरण होतं, काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

****

कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज देण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. काल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. या मागण्यांसाठी आमदार चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशीही संवाद साधला.

****

पैठणचं जायकवाडी धरण पूर्ण भरलं असून, पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे १२ दरवाजे अर्धा फूट उघडून सहा हजार २०० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. विभागात सिद्धेश्वर धरणातून सध्या आठ हजार २२४ तर ईसापूर धरणातून साडे तीन हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.

****

हवामान

राज्यात आज विदर्भ, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात नांदेड आणि लातूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर परभणी, हिंगोली, धाराशिव तसंच बीड जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

****

No comments:

Post a Comment