Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 14 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ
येत्या हैदराबाद मुक्ती दिनी केला जाणार
·
डिसेंबर २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज
देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार
·
राज्यातल्या बारव आणि विहिरींचं जिल्हा निहाय सर्वेक्षण
करण्याचा सरकारचा निर्णय
·
अहिल्यानगर बीड रेल्वे मार्गावर आजपासून तीन दिवस जलद
रेल्वेची चाचणी
·
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत - पाकिस्तान लढत
आणि
·
मराठवाड्यातल्या अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग
सुरु
****
मुख्यमंत्री
समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ येत्या हैदराबाद मुक्ती दिनी केला
जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात किनगाव इथं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यातल्या
३५२ पंचायत समित्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या या अभियानात टीबी मुक्त गाव, घरकुल योजना,
पाणी योजना, वृक्ष लागवड, सौरऊर्जा वापर, अशा सर्व विभागांच्या कामांचं मूल्यमापन
केलं जाणार आहे. यातून चांगले गुण घेणाऱ्या ग्रामपंचायतीला विविध प्रकारचे पुरस्कार
देण्यात येतील.
या कार्यक्रमाचं
सर्व ग्रामपंचायतींमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, विशेष ग्रामसभेचं
आयोजन करण्याचं आवाहन, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केलं आहे.
****
डिसेंबर
२०२६ पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी पुनरुच्चार केला आहे. काल यवतमाळ इथं, ३३५ कोटी रुपयांच्या
विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केल्यानंतर त्यांनी ही बाब नमूद केली.
ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
परभणी तालुक्यात
परवा अतिवृष्टीत झालेल्या पिकांच्या नुकसानाची काल आमदार राहुल पाटील यांनी पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह यांची भेट घेऊन, सरसकट ओला
दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना तातडीने मदत
म्हणून दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात
नऊ मंडळात जोरदार पाऊस झाला असून, कात्नेश्वर मंडळात सर्वाधिक
१४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
****
राज्यातल्या
बारव आणि विहिरींचं जिल्हा निहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं, सांस्कृतिक
कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केलं. काल मुंबईत बारव संवर्धन, संरक्षण याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बारव जतन, संवर्धन आणि उपयोगिता यांची स्पष्ट उद्दिष्ट्यं आणि हेतू असलेला शासन निर्णय
जारी करण्यात येईल, अशी माहिती शेलार यांनी दिली.
दरम्यान, मराठवाडा
प्राचीन वास्तू संवर्धन समितीचे संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी या निर्णयाचं स्वागत
करत, नागरिकांनी या कामात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ते
म्हणाले…
बाईट
- श्रीकांत उमरीकर
****
राज्यातल्या
अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी गठीत एक
सदस्यीय समितीला १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक न्याय मंत्री
संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली. पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत
मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
****
अहिल्यानगर
बीड या मार्गावर १७ सप्टेंबरपासून डेमू रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर
अंमळनेर ते बीड या मार्गावर आजपासून पुढचे तीन दिवस जलद रेल्वेची चाचणी घेतली जाणार
आहे. या रेल्वे मार्गाजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी या काळात सतर्क राहावं, रेल्वे मार्गावर
चालू नये, किंवा जनावरं रेल्वे रुळांवर येऊ देऊ नयेत,
असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
मुंबईच्या
यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीने देण्यात येणारा ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार
नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना जाहीर झाला आहे. मुंबई इथं कविवर्य ना. धों.
महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्काराची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी काल केली.
येत्या २६ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे. सुचिता
खल्लाळ यांचे पायपोळ, तह हयात, प्रलयानंतरची
तळटीप हे तीन काव्यसंग्रह, 'स्त्री कविचेचं भान: काल आणि आज'
हा समीक्षापर ग्रंथ आणि 'डिळी' कादंबरी ही प्रकाशित आहे.
****
हिंदी दिवस
आज साजरा होत आहे. हिंदी भाषेचा प्रसार व्हावा, बोलीभाषेत तसंच व्यवहारात वापर वाढावा,
आणि भाषेचं संवर्धन व्हावं, या उद्देशाने हा दिवस
साजरा केला जातो. हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संदेश आज आकाशवाणीवरून
सकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा
देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांत युवकांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश
देण्यासाठी, देशभरातल्या ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल बुलडाणा इथं ही माहिती दिली. त्या
म्हणाल्या…
बाईट
- रक्षा खडसे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री
****
आशिया चषक
क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना
रात्री आठ वाजता सुरु होईल.
दरम्यान, या सामन्याविरुद्ध
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार
आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत ही भूमिका मांडली. पाकिस्तानच्या दहशतवादी
कारवाया थांबवण्यासाठी केंद्र शासनाने ऑपरेशन सिंदूर राबवलं, अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळलं जावू शकतं, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पक्षाच्या
महिला आघाडीकडून आज राज्यभर ठिकठिकाणी 'माझं कुंकू, माझा देश' हे निषेध आंदोलन राबवण्यात येणार आहे. छत्रपती
संभाजीनगर महिला आघाडी शाखेच्या वतीने सकाळी साडे दहा वाजता क्रांती चौकात आंदोलन करण्यात
येणार आहे.
****
मराठा समाजासाठी
लागू करण्यात आलेलं हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या
वांगदरी इथल्या गावकऱ्यांनी उपोषण सुरु केलं आहे. वांगदरी इथले आत्महत्या केलेले भरत
महादेव कराड यांच्या कुटुंबीयांची ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काल भेट घेत सांत्वन
केलं. राज्य सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याची टीका हाके यांनी यावेळी केली.
****
जालना शहराजवळच्या
खडकतलाव खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, काल दुपारी
ही घटना घडली. सिध्दार्थ हरबळे आणि जस्मितसिंग रिहाल, अशी मृतांची
नाव आहेत. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
****
बीड इथं
काल लोकन्यायालयात एकूण एक हजार ३०१ प्रकरणं तडजोडीने निकाली काढण्यात आली. प्रलंबीत
प्रकरणांपैकी ११ हजार २४१ प्रकरणं ठेवण्यात आली होती, त्यापैकी
१५ कोटी ६८ लाखाहून अधिक रकमेची प्रकरणं निकाली निघाल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात
लाळ-खुरकूत रोगाच्या प्रतिबंधासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत
१ लाख ११ हजार ५९४ पशुधनांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
****
वीजबिलाच्या
थकबाकीसाठी महावितरणने कायमस्वरूपी खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेतल्याने
महावितरणच्या जालना कार्यालयाने ३० ग्राहकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला. जिल्ह्यात
भोकरदन तसंच बदनापूर या तालुक्यात ही कारवाई करण्यात आली.
****
मराठवाड्यात
अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे काही धरणांमधून
विसर्ग वाढवण्यात आला आहे.
पैठणचं
जयकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं असून, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात
आला आहे. धरणाचे २७ दरवाजे चार फूट उघडून ९४ हजार ३२० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे.
**
लातूर जिल्ह्यात
काल झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तावरजा प्रकल्पाचे
१७, मांजरा दोन तर रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे काल रात्री उघडण्यात
आले, त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं
आवाहन प्रशासनानं केलं आहे.
**
बीड जिल्ह्यातल्या
माजलगाव धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून, पाच हजार ९५२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वडवणी तालुक्यातल्या उर्ध्व कुंडलिका मध्यम
प्रकल्पातूनही एक हजार ६८२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी कुंडलिका नदीपात्रात
सोडण्यात येत आहे.
****
हवामान
राज्यात
आज रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, पालघर,
सिंधुदूर्ग, नंदूरबार तसंच धुळे हे चार जिल्हे
वगळता, सर्वत्र पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment