Monday, 15 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आज स्वीकारणार महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार

·      ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड

·      जीएसटी दरांच्या फेररचनेमुळे औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि उपचार आता होणार अधिक स्वस्त

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय

आणि

·      पावसामुळे जालना जिल्ह्यात घनसावंगी आणि अंबड तालुक्यात पिकांचं नुकसान, जायकवाडी आणि विष्णुपुरी प्रकल्पांमधून विसर्ग सुरु

****

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारुन शपथ घेणार आहेत. हा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी देवव्रत यांचं काल मुंबईत आगमन झालं. अहमदाबाद इथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं. यावेळी त्यांना रेल्वे पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.

****

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील. हे संमेलन सातारा इथं एक ते चार जानेवारी २०२६ दरम्यान घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती, महामंडळाच्या कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी दिली.

निवृत्त सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी पानिपत, पांगिरा, संभाजी, झाडाझडती यासह अनेक कादंबऱ्याचं लेखन केलं आहे. झाडाझडती या कादंबरीसाठी त्यांना १९९२ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. विश्वास पाटील हे सध्या साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत.

****

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे यात सर्वांनी एकत्रित चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, यासंदर्भातल्या समित्यांची नियुक्ती करताना व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल नाशिक इथं पक्षाच्या शिबीर आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यामागे आपला हात असल्याच्या आरोपाचं पवार यांनी खंडन केलं. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असून, देशाचा विकास दर सात टक्के असल्याचं, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री, खासदार डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. जगामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर आली असल्याचं सांगून कराड यांनी, जीएसटी सुधारणांबद्दल माहिती दिली.  

****

जीएसटी परिषदेनं कररचनेत केलेल्या बदलांमुळे औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि उपचार अधिक स्वस्त होणार आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी,

या सुधारणांनुसार, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ३६ जीवरक्षक औषधांवरचा वस्तू आणि सेवा कर शून्य केला असल्यानं उपचारांवरच्या खर्चात मोठी बचत होईल. या व्यतिरिक्त, गॉझ, बँडेज, रोगनिदान चाचणी संच ग्लुकोमीटर आणि थर्मामीटर यांसारख्या विविध वैद्यकीय उत्पादनांवरील जीएसटीही १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला असल्यानं, नागरिकांना महागड्या उपचारांसाठी आर्थिक तडजोड करावी लागणार नाही. यामुळे वेळेवर आणि योग्य उपचार मिळतील, आणि पर्यायानं नागरिकांचं आरोग्य अधिक सुरक्षित होईल. आरोग्य विमा आणि जीवन विम्याच्या प्रीमियमवरही आता शून्य जीएसटी लागू झाल्यानं प्रीमियमची रक्कमही लक्षणीयरीत्या कमी होईल, त्यामुळे अधिकाधिक लोक विमा संरक्षण घेण्याकडे वळू लागतील हे नवीन बदल येत्या २२ तारखेपासून लागू होणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सेवा आणि सुशासन या तत्वाचे पालन करून परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी प्रयत्नरत आहे. सेवा पर्वानिमित्त आज जाणून घेऊया स्वच्छ भारत मोहिमेविषयी,

वाईजकास्‍ट

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा आणि सेवा पंधरवडा या संयुक्त कार्यक्रमाचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते काल झालं. सर्वसामान्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ द्यायचा असेल, तर विरोधकांसह सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या योजना राबवल्या पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

हैद्राबाद गॅझेटमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही, असं भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं भाजपच्या संवाद मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. काही जणांनी विनाकारण सरकारला बदनाम करण्यासाठी कट केल्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून दणदणीत पराभव केला. काल दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करत १२६ धावाच करु शकला. कुलदीप यादवने तीन, जसप्रित बुमराह आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्यूत्तरादाखल भारताने सोळाव्या षटकात तीन गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना हाँगकाँग सोबत होणार आहे.

****

आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. काल हांगझोऊ इथं झालेल्या अंतिम सामन्यात चीनने भारतीय संघाचा चार - एक असा पराभव केला. या पराभवामुळे भारतीय संघाला पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्स इथं होणाऱ्या विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळणार नाही.

****

पुणे इथल्या मराठवाडा समन्वय समितीचा मराठवाडा भूषण पुरस्कार परभणीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना जाहिर झाला आहे. प्रशासकीय क्षेत्रात विशेषतः परभणी जिल्ह्यात ग्रामीण विकास, सार्वजनिक प्रशासन आणि नेतृत्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. १७ सप्टेंबरला हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनी पुण्यात या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणार्या "मी आयुक्त होणार" या उपक्रमाअंतर्गत कांचनवाडी इथल्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थांनी काल आयुक्तांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गोल्फ या खेळाबद्दल माहिती दिली, तसंच इतर खेळांचाही आनंद घेतला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल स्वामी रामानंद तीर्थ यांच्या ‘संन्याशाच्या डायरीतून’, या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन निशिकांत भालेराव यांच्या हस्ते झालं. डॉ सुरेश खुरसाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातल्या शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, घनसावंगीच्या तहसीलदार पूजा वंजारी यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत जनावरं आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे ऊस पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. दादेगाव-दावरवाडी रस्त्यालगतच्या परिसरतल्या अनेक शेतकऱ्यांचा ऊस भूईसपाट झाला.

दरम्यान, पैठणचं जायकवाडी धरण ९९ पूर्णांक ३४ टक्के भरलं असून, १८ दरवाजांमधून नदीपात्रात नऊ हजार ४३२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने आणि वरील धरणातून पाण्याचा येवा सुरू असल्याने प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून ६७ हजार २३७ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे.

****

No comments:

Post a Comment