Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 September 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल
आणि बिहारच्या दौऱ्यावर आहेत. कोलकाता इथं संयुक्त कमांडर
परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी
पंतप्रधान काल संध्याकाळी कोलकाता इथं पोहोचले. जागतिक स्तरावर सध्या सुरु
असलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक प्रगती, सशस्त्र
दलांच्या तिन्ही शाखांमधला समन्वय, आधुनिकीकरण आणि इतर पैलुंवर
या परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पंतप्रधान बिहारमधल्या पुर्णिया
इथं जाणार असून,
३६ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ
त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
ज्येष्ठ अभियंते सर मोक्षगुंडम
विश्वेश्वरय्या यांची जयंती आज राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरी केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त विश्वेश्वरय्या यांना विनम्र अभिवादन
केलं. सर्जनशीलता आणि दृढनिश्चयाद्वारे, नाविन्यपूर्णतेला चालना देणाऱ्या आणि विविध क्षेत्रांमध्ये कठीण आव्हानांना तोंड देणार्या अभियंत्यांना
शुभेच्छा देत असल्याचं, पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या
संदेशात नमूद केलं. आमचे अभियंते विकसित भारत बांधण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये
महत्त्वाची भूमिका बजावत राहतील, असं ते म्हणाले.
****
देशभरात गावागावात पोहोचलेल्या
दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची ६६ वर्ष आज पूर्ण होत आहेत. १५ सप्टेंबर १९५९
रोजी दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रसारण युगाची सुरुवात झाली. आज दूरदर्शन
भारतातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे, ज्यामध्ये स्टुडिओ आणि ट्रान्समिटर्सचं
विस्तृत जाळं आहे. देशभरातली सर्व शहरं, प्रादेशिक क्षेत्रं, तसंच
आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत दूरदर्शन पोहोचलं असून, आता
मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहणं शक्य झालं आहे.
****
झारखंडमध्ये हजारीबागच्या करांडी गावात
आज सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत तीन नक्षलवादी कमांडर मारले गले. त्यांच्यावर
सुमारे एक कोटी रुपयाचं बक्षिस होतं.
****
नव संशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण
करण्यासाठी देशातील उच्च आणि तंत्रशिक्षण संस्थांना स्वायतत्ता देणं ही काळाची गरज
असून, त्यादृष्टीनं केंद्र आणि राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पुण्यात काल सीओईपी तंत्रज्ञान
विद्यापीठात ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि
अभियांत्रिकी दिनानिमित्त आयोजित सीओईपी अभिमान पुरस्कार सोहळ्यात ते काल बोलत
होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ए.आर.डी.ई.च्या माजी
शास्त्रज्ञ वसंथा रामास्वामी यांना देण्यात आला. सीओईपी अभिमान पुरस्कारांचं
वितरणही यावेळी करण्यात आलं.
****
नाशिक शहरासह ठाण्यात बेकायदेशीरपणे कॉल
सेंटर चालवत विदेशी नागरिकांची ऑनलाइन सायबर फसवणूक करणाऱ्या दोन सेंटरवर केंद्रीय
गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणी ६० लोक काम करत
होते. पथकाने दोघा संशयित आरोपींना अटक केली. स्वत:ला विमा एजंट तसंच सरकारी
अधिकारी असल्याचं भासवून इंग्लडसह विविध देशांमधल्या नागरिकांची फसवणूक करण्यासाठी
हे कॉल सेंटर कार्यरत होतं.
****
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि
इशान्येकडील राज्यांना पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला
आहे. मुंबई,
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, अरुणाचल
प्रदेश, आसाम, मेघालय,
बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग आणि
उत्तराखंडमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस
सुरू आहे. मुंबईच्या शहर भागात, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सखल भागात काही ठिकाणी पाणी साचण्यास
सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर होत असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या तीन तासात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागानं दिली आहे.
**
मराठवाड्यातही अनेक भागात पाऊस सुरु
असून, मोठ्या प्रमाणात धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात माजलगाव धरणाच्या पाणलोट
क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. सिंदफणा नदीमध्ये अजूनही पुरसदृश्य
परिस्थिती आहे. माजलगाव धरणातून सध्या १९ हजार ८०४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सिंदफणा आणि गोदावरी नदीकाठच्या गावांनी सावध
राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचा आणखी
एक दरवाजा आज उघडण्यात आला. आता धरणातून एक लाख पाच हजार २७१ दशलक्ष घनफूट
प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणातल्या दहा दरवाजातून पाच हजार २४० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं
विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणात सध्या ३१ हजार २९३ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणीसाठा ९८ पूर्णांक २९ टक्के इतका
झाला आहे.
****
No comments:
Post a Comment