Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 16 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा
नकार; कायद्यातील काही तरतुदींना मात्र स्थगिती
·
कर्करोगाच्या उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात समग्र उपचार
सेवा पुरवण्याची मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्यं विभागाला सूचना
·
शेतकऱ्यांना महिनाभरात कर्जमाफी द्यावी अन्यथा राज्यभर
आंदोलन-ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा इशारा
·
मराठवाड्यासह राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस-बीड
जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी सैन्यदलाकडून बचावकार्य
आणि
·
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, बहुतांश जिल्ह्यात
हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
****
सर्वोच्च
न्यायालयानं वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला पूर्णपणे स्थगिती द्यायला नकार दिला असून, या कायद्यातल्या
काही तरतुदींना मात्र स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती
ए जी मसीह यांच्या पीठानं काल हा निर्णय दिला. आपली संपत्ती वक्फला समर्पित करण्यापूर्वी
देणगीदार किमान पाच वर्षे इस्लाम धर्माचा अनुयायी असावा ही तरतूद न्यायालयानं स्थगित
केली. वक्फ मालमत्तेचं सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण झालं की नाही हे ठरवण्याचा अधिकार,
शासनानं नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल करण्याची, तसंच वक्फ मंडळावर मुस्लिमेतर व्यक्तीची नेमणूक करण्याची तरतूदही, यासंदर्भात राज्य सरकारांनी ठोस नियम करेपर्यंत स्थगित राहील असं न्यायालयानं
स्पष्ट केलं. हा निर्णय प्रथमदर्शनी निरीक्षणांवर आधारित असून, खटल्याची सविस्तर सुनावणी नंतर होणार असल्याचं, न्यायालयानं
नमूद केलं आहे.
****
राज्यात
सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्यं
विभागानं धोरण तयार करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते
काल मुंबईत याबाबतच्या बैठकीत बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा,
रोग निदान, डे केअर रेडिओथेरेपी आणि किमोथेरपी
युनिटची उभारणी करावी, असंही त्यांनी सूचित केलं.
दरम्यान, आयुष्मान
भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये
राज्यात नवीन दोन हजार ३९९ उपचारांना काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
अहिल्यानगर
- बीड - परळी वैजनाथ या रेल्वेमार्गासाठी अतिरिक्त १५० कोटी रुपये निधी काल वर्ग करण्यात
आला. या प्रकल्पासाठी आजपर्यंत शासनानं दोन हजार ९१ कोटी रुपये निधी दिला आहे. या मार्गावर
बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवेला उद्या १७ सप्टेंबरला प्रारंभ होणार आहे.
****
सेवा आणि
सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार
परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्वानिमित्त विशेष
मालिकेच्या आजच्या भागात अक्षय आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातल्या बदलांविषयी जाणून घेऊ.
“गेल्या दशकभरातला देशाचा ऊर्जा प्रवास
उल्लेखनीय परिवर्तनाचा साक्षीदार ठरत आहे. जलद क्षमता बांधणी, सौर आणि पवन ऊर्जेतील जागतिक आघाडी आणि नाविन्यपूर्ण प्रमुख कार्यक्रमांसह
भारत स्वच्छ, स्वावलंबी उर्जेच्या भविष्याकडं वेगानं वाटचाल
करत आहे.
स्वच्छ ऊर्जा फक्त कार्बन
उत्सर्जन कमी करत नाही, तर हरित रोजगारही निर्माण करत आहे,
ऊर्जा सुलभतेत सुधारणा होत आहे आणि जागतिक हवामान क्षेत्रात
नेतृत्त्व म्हणून भारत आपली भूमिका बळकट करत आहे. गेल्या महिन्यात गुजरातमधील
हंसलपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान हरित गतिशीलता उपक्रमाचा आरंभ करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, स्वच्छ ऊर्जा आणि
स्वच्छ गतिशीलतेमुळं भविष्यात भारत जागतिक केंद्र म्हणून आकारास येईल, असं म्हटलं होतं.
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मार्च २०१४ ते जून २०२५
पर्यंत, अक्षय ऊर्जा क्षमता जवळजवळ तिप्पटीनं वाढून २२६ पूर्णांक ८ दशांश
गिगावॅट झाली आहे. सध्या, अक्षय ऊर्जा आणि अणुऊर्जेसह
गैर-जीवाश्म इंधन स्रोतांचा देशाच्या एकूण वीज क्षमतेत सुमारे ४९ टक्के वाटा आहे.
सौर ऊर्जा निर्मिती १ लाख ८ हजार गिगावॅट तासापेक्षा जास्त झाली आहे, ज्यामुळे भारत जपानला मागे टाकत जगातला तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा
उत्पादक देश झाला आहे.
पीएम-कुसूम योजनेच्या
माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप पुरवले जात आहेत. तर, पीएम
सूर्यघर योजनेतून एक कोटी कुटुंबांसाठी छतावरील सौरऊर्जा पॅनलच्या माध्यमातून ३०
गिगावॅट निवासी सौरऊर्जा क्षमतेचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे.’’
****
केंद्र
सरकारने वस्तू आणि सेवा कर- जीएसटीच्या दरात सुधारणा करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा
दिलासा दिल्याचं, आमदार नारायण कुचे यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महागाईत घट होईल आणि बाजारातील
मागणी वाढेल असा विश्वासही कुचे यांनी व्यक्त केला.
****
शेतकऱ्यांना
महिनाभरात कर्जमाफी द्यावी, अन्यथा राज्यभर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. काल नाशिक इथं पवार यांच्या
नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
काढला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाभरातले शेतकरी मोठ्या संख्येनं
या मोर्चात सहभागी झाले होते.
****
मराठवाड्यासह
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बीड, छत्रपती संभाजीनगर
तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे.
बीड जिल्ह्यात
अनेक नद्यांना पूर आला असून, शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीने धोक्याची
पातळी ओलांडली आहे. आष्टी तालुक्यात कडा, सुलेमान देवळा,
पिंपरखेड, धानोरा, शिरापुर,
टाकळी अमिया आणि डोंगरगण या गावांचा संपर्क तुटला, तर सात गावांत पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरला
पाचारण करावं लागलं. पुरात अडकलेल्या सुमारे शंभरावर नागरिकांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, एक व्यक्ती वाहून गेल्याचं वृत्त असून, तिचा शोध सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड जिल्ह्यात पावसाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज सर्व शाळा
महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
**
जालना शहरासह
जिल्ह्यात रात्रभरापासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे बहुतांश भागात
नदी-नाल्यांना पूर आला असून पिकांमध्ये पाणी साचलं आहे. घनसावंगी तालुक्यात सलग दुसऱ्या
दिवशीही ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने खरिपातली पिकं पाण्याखाली गेली असून, अनेक गावांचा
संपर्क तुटला आहे. घनसावंगी इथला वनगुटा पाझर तलाव फुटल्यानं आजूबाजूच्या शेतांमध्ये
पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालं.
**
छत्रपती
संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातही पैठण, सिल्लोड तसंच वैजापूर तालुक्यात जोरदार
पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाच जणांची अग्निशमन दलाच्या
पथकाने सुटका केली. लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत शिरूर अनंतपाळ, देवणी, उदगीर आणि जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली.
धाराशिव
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आमदार
राणाजगजितसिंह पाटील यांनी गावोगावी जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुन, शेतकर्यांना
मदत देण्याचं आश्वासन दिलं.
**
विभागात
माजलगाव धरणातून ५६ हजार ४०३, तर मांजरा धरणातून २१ हजार ७५० दशलक्ष
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातून
एक लाख पाच हजार, येलदरी धरणातून सुमारे सात हजार, इसापूर धरणातून सुमारे साडे आठ हजार तर निम्न तेरणा धरणातून सुमारे साडे चार
हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.
पैठणच्या
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून
६६ हजार २४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
**
अहिल्यानगर
जिल्ह्यात पाथर्डी आणि शेवगाव महामार्गावरील नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क
तुटला आहे. जिल्ह्यात अनेक महामार्गावरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग काल
वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.
**
कोकण, मध्य महाराष्ट्र,
मराठवाडा आणि विदर्भात पुढचे दोन दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची
शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट
जारी करण्यात आला असून, उर्वरीत जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किलोमीटर
प्रतितास वाऱ्याच्या वेगासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा
‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक शेषराव मोरे यांना जाहीर झाला
आहे. विद्यापीठाने शहरी आणि ग्रामीण उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट
प्राचार्य, तरुण शिक्षक संशोधक पुरस्कारही काल जाहीर केले. येत्या
१९ सप्टेंबरला या पुरस्कारांचं वितरण होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.
ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.
****
हैदराबाद
गॅझेटनुसार बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी काल
बीड तसंच जालना इथं बंजारा समाजाच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. पारंपारिक वेशभुषेत
बंजारा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.
****
हिंगोली
जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या भाटेगावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला
शेतकऱ्यांनी काल विरोध केला. मोजणी थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर झोपत आंदोलन
केलं.
****
No comments:
Post a Comment