Tuesday, 16 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

****

अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांच्या दुसर्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंमली पदार्थमुक्त भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यासाठी ही परिषद एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून काम करेल, असं अंमलीपदार्थ नियंत्रण आयोगानं म्हटलं आहे. या दोन दिवसीय परिषदेत देशातल्या अंमली पदार्थांच्या धोक्याशी लढण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा व्यापक आढावा घेतला जाईल आणि भविष्यातल्या कृती आराखड्यावर चर्चा केली जाईल. अंमलीपदार्थ नष्ट करण्याच्या मोहिमेची ऑनलाईन सुरवातही यावेळी करण्यात येणार आहे.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं २०२५-२६ या वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आज एका दिवसानं वाढवली आहे. काल ही मुदत संपणार होती. चालू वर्षासाठी सात कोटीहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाल्याचं कर विभागानं सांगितलं आहे.

****

स्वच्छता ही सेवा या अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हे अभियान यंदा स्वच्छतोत्सव म्हणून साजरा होणार असल्याची माहिती शहर कल्याण मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत दिली. या अभियानादरम्यान देशभर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा आणि श्रमदान होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी देशव्यापी एक दिवस, एकसाथ, एक तास श्रमदान कार्यक्रम राबवणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

राज्य सरकारनं राज्यात सेवा पुरवणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडे-दर जाहीर केले आहेत. या निर्णयानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी प्रवासाचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा राहणार असून, प्राथमिक भाडं १५ रुपये असणार आहे. त्या नंतरच्या किलोमीटर प्रवासासाठी १० रुपये २७ पैसे प्रमाणे भाडे आकारलं जाणार आहे. ही सेवा पुरवण्यासाठी उबेर, रॅपिडो आणि ओला यांची निवड सरकारनं केली आहे. सध्या त्यांना केवळ मुंबई महानगर क्षेत्रात सेवा पुरवता येईल.

****

विदर्भात चित्रपट निर्मिती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी रामटेक इथं उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या ६० दिवसात जमीन हस्तांतरित करण्याचा आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. ते रामटेक जवळच्या नवरगाव इथल्या प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी केल्यानंतर बोलत होते. रामटेकच्या प्राचीन गड मंदिर परिसरात भाविकांसाठी अद्ययावत सोयी सुविधा उभारण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

नांदेड महापालिकेत गुंठेवारी विभागातला कंत्राटी उपअभियंता विजय दवणे यास २८ हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. दोन प्लॉटच्या गुंठेवारीची संचिका मंजूर करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

नांदेड महापालिकेने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी घोषित केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १३९ आक्षेप प्राप्त झाले आहेत. काल शेवटच्या दिवशी ११७ आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. या आक्षेपांची सुनावणी आजपासून २२ सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं “कथा हैदराबाद मुक्ती संग्रामाची’’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या संग्रामाबाबत माहिती देणारी ध्वनिफीत QR CODE च्या माध्यमातून विविध भाषांमध्ये ऐकता येणार असल्याची माहिती, संस्थेचे अध्यक्ष विधिज्ञ दिनेश वकील यांनी दिली.

****

येत्या सेवा पंधरवाड्यात धाराशिव जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत महिलांना आरोग्य तपासणीसह विविध वैद्यकीय सेवा पुरवल्या जाणार आहेत.

****

भारताची बुद्धीबळपटू वैशाली रमेशबाबू हिने फिडे ग्रँड स्विस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तिने अंतिम फेरीत माजी विश्वविजेती चीनची टॅन झोंगई हिच्यावर मात केली. वैशालीचं या स्पर्धेतलं हे सलग दुसरं विजेतेपद असून, अशी कामगिरी करणारी ती पहिली बुद्धीबळपटू आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, सिल्लोड, गंगापूर, सोयगाव, खुलताबाद तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिल्लोड तालुक्यातल्या घटनांद्रा इथल्या नदी नाल्यांना पूर आला आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. केळगाव इथल्या देवगाव बाजारला पुराचा वेढा पडला होता, यावेळी २० ग्रामस्थांची अग्निशमन दल तसंच ग्रामस्थांच्या मदतीने सुटका करण्यात आली. पैठण शहरासह तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरी वसाहतींसह आस्थापनांमध्ये पाणी शिरलं असून, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment