Wednesday, 17 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहण

·      अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाच्या बीड ते अहिल्यानगर या टप्प्याच्या रेल्वेसेवेचं आज लोकार्पण

·      राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

·      स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या राष्ट्रीय अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ, मुंबईत राज्यस्तरीय सोहळ्याचं आयोजन

आणि

·      अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना, आजही मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे. ब्रिटिशांच्या राजवटीतून भारत मुक्त झाल्यावर, १३ महिने आणि दोन दिवसांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद प्रांत मुक्त झाला. रझाकारांविरोधात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेलं आंदोलन आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी राबवलेल्या 'ऑपरेशन पोलो' या पोलिस ॲक्शननंतर हैदराबादचा निजाम शरण आला, आणि हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन, भाषेच्या आधारे तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला.

मराठवाड्यात सर्वत्र हैदराबाद मुक्तिसंग्रामदिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, परभणी-पालकमंत्री मेघना बोर्डीकर, हिंगोली-पालक मंत्री नरहरी झिरवाळ, नांदेड-पालकमंत्री अतुल सावे, लातूर- पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनार्इक यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे.

मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौक इथं ‘परमवीर चक्र गॅलरी’ उभारण्यात आली आहे.

****

दरम्यान, भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हैदराबाद प्रांत पारतंत्र्यात राहिला, याचे दुष्परिणाम अद्यापही देशाच्या नजरेसमोर आलेले नाहीत, अशी खंत ज्येष्ठ विधीज्ञ अनंत उमरीकर यांनी व्यक्त केली...

बाईट - अनंत उमरीकर

****

मराठवाड्याच्या विकासकामांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

बहुप्रतिक्षित अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाच्या बीड ते अहिल्यानगर या टप्प्यावरच्या रेल्वेसेवेचं आज लोकार्पण होणार आहे. बीड रेल्वेस्थानकावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अमळनेतर ते बीड या नवीन रेल्वेमार्गाचं लोकार्पण तसंच बीड-अहिल्यानगर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

तत्पूर्वी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ देखील आज होणार आहे.

****

राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुका घेण्यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही, असंही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं स्पष्ट करत, यापूर्वीच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले. प्रभाग पुनर्रचनेची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरणाची काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा करण्यात आली. राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यापुढे ही उपसमिती, मंत्रिमंडळ समिती म्हणून काम करेल. शासकीय वसतीगृहातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा दैनंदिन निर्वाह भत्ता आणि विद्यार्थिनींच्या स्वच्छता-प्रसाधन भत्त्यात दुपटीनं वाढ करण्यास, तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला पुढच्या दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.

****

सेवा पंधरवड्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त राज्यात भारतीय जनता पक्षातर्फे विविध ठिकाणी एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, मोदी विकास मॅरेथॉन, यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी गेल्या दशकभरातल्या त्यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...

बाईट - आशा भोसले

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला आज इंदूर इथं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुरूवात होणार आहे. मुंबईत यशवंतराव चव्‍हाण सेंटर इथं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होईल. दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात सर्व महिला आणि बालकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातल्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली. या महोत्सवात गोंधळी गीत, भारुड, जाखडी नृत्य यांसारख्या पारंपरिक कलांचं सादरीकरण होईल, तसंच गोंधळ, भजन आणि कीर्तनाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातील, असं देसाई यांनी सांगितलं. नवरात्र संकल्पनेवर आधारित ३०० ड्रोनद्वारे भव्य लाईट शो हे या महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असणार आहे.

****

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच जीएसटी कररचनेत सुधारणा केल्या. यात नवीन आणि नवीकरणीय उर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी या क्षेत्राशी संबंधित विविध सामग्रीवरच्या करात कपात करण्यात आली आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून …

केंद्र सरकारच्या स्वच्छ उर्जा उत्पादन धोरण आणखी मजबूत करण्यासाठी आणि अपारंपरिक उर्जास्रोतांच्या वापराला चालना देण्याच्या उद्देशाने वस्तू आणि सेवा कर परिषदेने जीएसटी दरात कपात केली आहे. यात सौर कुकर, बायोगॅस प्रकल्प, सौर उर्जा निर्मितीसाठीची उपकरणं, सौर विद्युत जनित्र, सौरपंप, पवनचक्की आणि पवनउर्जेवर चालणारी जनित्र, सौर दिवे, जलविद्युत निर्मिती उपकरणं आणि प्रकल्प यांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के इतका खाली आणण्यात आला आहे. यामुळे या उपकरणांवरच्या खर्चात कपात होऊन पारंपरिक वीजनिर्मितीवरचा ताण कमी होईल, तसंच वीजदरही कमी होतील. सौरपंपामुळे शेतीच्या सिंचनावरच्या खर्चातही घट होणार आहे.

****

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यांत मोठं नुकसान झालं असून, एकूण १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सात लाख २८ हजार ४९ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं.

****

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे तसंच मदतीचे निर्देश दिले. खासदार बजरंग सोनवणे यांनी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी केली.

धाराशिव तालुक्यातील वडगाव इथं नुकसानग्रस्त शेत पिकांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल पाहणी केली. या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला, पशुपालकाला मदत मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

**

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांबरोबरच काही ठिकाणी घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जिल्ह्यात विविध घटनांमध्ये दोन महिला आणि एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

**

लातूर जिल्ह्यातला तावरजा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे. गेल्या अनेक वर्षानंतर धरण पूर्ण भरल्याने आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते काल जलपूजन करण्यात आलं.

पैठणच्या जायकवाडी धरणातून सुमारे साडे ३७ हजार, माजलगाव धरणातून सुमारे ३१ हजार, तर सिद्धेश्वर धरणातून ३३ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे.

****

हवामान

विदर्भ आणि खान्देश वगळता, राज्याच्या उर्वरित सर्व जिल्ह्यांत आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.

****

No comments:

Post a Comment