Saturday, 20 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

प्रतिबंधित नक्षलवादी संघटना माओवादी कम्युनिस्ट पक्षाने अस्थायी शस्त्रबंदीचा निर्णय घेतला आहे. बदलती जागतिक तसंच राष्ट्रीय परिस्थिती आणि पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसंच पोलिस प्रशासनाचं आवाहन, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं, या संघटनेच्या शिष्टाचार विभागाचे सदस्य मलौजुला वेणुगोपाल राव यांनी सांगितलं. ते म्हणाले....

बाईट - मलौजुला वेणुगोपाल राव

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या शिष्टमंडळांशी चर्चेला तयार आहोत, असं राव यांनी सांगितल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. भावनगर इथं समुद्र समृद्धी कार्यक्रमात ते ३४ हजार २०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घघाटन आणि भुमिपुजन करतील.

****

केंद्रीय निवडणूक आयोगाने निकष पूर्ण न करणाऱ्या ४७४ राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. या पक्षांनी २०१९ पासून एकही निवडणूक लढवली नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. गेल्या दोन महिन्यात अशी कारवाई केलेल्या पक्षांची संख्या आठशेहून अधिक झाली आहे.

****

नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचं उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावं, त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नाशिक इथं काल या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते.

जिथं खासगी कंपन्या विमानतळ चालवण्यास घेतात मात्र मध्येच ते बंद पडतात, अशा ठिकाणी दंड आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

****

गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना प्रोत्साहनपर पारितोषिकं देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे. राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचं उद्घघाटन काल पुण्यात भुसे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी, द्वितीय क्रमांकाला तीन कोटी आणि तृतीय क्रमांकाला दोन कोटी रुपयांचं पारितोषिक देणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवी इयत्तेसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार असल्याची घोषणा भुसे यांनी केली.

****

विविध कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने त्यासंबंधीचा आकृतीबंध पंधरवड्यात मंजूर करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, तसंच विद्यापीठांत आवश्यक वसतिगृहांसाठी, तसंच पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

अकोला इथं राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत काल ते बोलत होते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्यासह विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरु आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हवामान बदलाच्या स्थितीतील संकटांवर मात करून शेती उत्पादन आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवे प्रयोग आणि संशोधन करून कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन भरणे यांनी केलं.

****

लातूर महानगरपालिकेने थकीत मालमत्ता करापोटी काल तीन दुकानं जप्त केली, तर आठ निवासी मालमत्तांची नळ जोडणी खंडीत केली. या मोहिमेअंतर्गत दोन लाख चाळीस हजार रुपये कर काल वसूल झाला. ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

****

गेल्या आठावड्यात झालेल्या आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि तळोदा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच शहादा शहरात व्यापारी प्रतिष्ठानं उघडली नाहीत.  दोन्ही शहरांमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून खबरदारी म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

****

राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या ४७ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. इसापूर धरणातून सुमारे १९ हजार, माजलगाव सहा हजार, तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे २७ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

****

मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरातल्या २२ जणांवर महावितरणने कारवाई केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या १६ ग्राहकांचा समावेश आहे.

****

No comments:

Post a Comment