Sunday, 21 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      इतर देशांवरचं अवलंबित्व हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      एसटी महामंडळात कंत्राटी तत्त्वावर साडे सतरा हजार चालक आणि सहाय्यकांची भरती होणार

·      राज्यात अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही-कृषीमंत्र्यांची ग्वाही

·      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात १९ हजारावर स्नातकांना पदवी प्रदान

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत - पाकिस्तान लढत

****

इतर देशांवरचं अवलंबित्व हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल गुजरातमध्ये भावनगर इथं ‘समुद्र से समृद्धी’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलसह, ३४ हजार २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन केलं. पंतप्रधानांनी ६६ हजार कोटी रुपयांचे २१ सामंजस्य करार, बंदरे आणि नौवहन मंत्रालयाकडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुपूर्द केले.

स्वातंत्र्याप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत म्हणजे २०४७ पर्यंत विकसित व्हायचं असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरु होईल, असं सुतोवाच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं. या मार्गावर घणसोली ते शिळफाटा बोगद्याच्या जोडकामाचा काल आरंभ केल्यानंतर ते बोलत होते. या प्रकल्पाचा ठाणे जिल्ह्यातला टप्पा २०२८ च्या दरम्यान पूर्ण होईल आणि त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातल्या टप्प्याचं काम सुरु होईल. जपानहून या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या तज्ज्ञ पथकानं कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

****

सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सेवा पर्वच्या विशेष मालिकेत आजच्या भागात, सरकारने दिलेली कर सवलत आणि खात्रीशीर निवृत्तीवेतन याविषयी जाणून घेऊया..

‘‘गेल्या अकरा वर्षांत, सरकारने मध्यमवर्गीयांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रतीकात्मक उपाययोजनांच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. उत्पन्नावरील करांचे दर कमी करण्यापासून ते परतावा सुलभ करण्यापर्यंत, नागरिकांना त्यांच्या कमाईचा अधिक भाग देण्यावर सरकारने भर दिला आहे.  अगदी अलीकडे २०२५-२६च्या अर्थसंकल्प मध्ये केलेल्या कर सुधारणांमधून हे दिसून येते.  केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटले होते की सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी कर सवलत सुनिश्चित करत आहे.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणखी एक मोठे पाऊल म्हणून, केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकीकृत पेन्शन योजनेला मंजुरी दिली. ही योजना किमान २५ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यासाठी निवृत्तीपूर्वीच्या १२ महिन्यांतील सरासरी मूळ वेतनाच्या ५० टक्के निश्चित पेन्शन सुनिश्चित करते. या योजनेचा सुमारे २३ लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.’’

****

राज्य परिवहन महामंडळ भविष्यात नवीन येणाऱ्या आठ हजार बसेस साठी १७ हजार ४५० चालक आणि सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. येत्या दोन ऑक्टोबरपासून त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते काल मुंबईत बोलत होते. या पदासाठी ३० हजार रुपये किमान वेतन मिळणार आहे.

****

चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना जाहीर झाला आहे. काल याबाबतची घोषणा करण्यात आली. २०२३ सालचा हा पुरस्कार मोहनलाल यांना परवा २३ तारखेला होणाऱ्या ७१ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

****

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते काल अकोल्यात बोलत होते. राज्यात अतिवृष्टीनं आतापर्यंत ६३ लाख ५१ हजार ५२० हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितलं. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला निधी पुढच्या आठवड्यापासून खात्यात जमा होईल, असं भरणे यांनी सांगितलं.

दरम्यान, काल हिंगोली - वाशिम महामार्गावर भरणे यांच्या वाहनाचा ताफा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अडवत काळे झेंडे दाखवले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या आंदोलकांनी केली.

****

नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात १०० टक्के नुकसान भरपाई मिळवणारा नांदेड हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे. शासनाने तिसऱ्या टप्यात नांदेडसाठी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये निधी मंजूर केला आहे. तर खरडून गेलेल्या तसंच गाळयुक्त जमिनींसाठी २० कोटी ८१ लाखांचा निधी दिला जाणार आहे. मंजूर निधी उद्यापासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातल्या संघर्षावर आधारित 'चलो जीते हैं' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे. छत्रपती संभाजीनगर इथं रिलायन्स आयनॅक्स चित्रपटगृहात काल हा चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यापैकी सविता कुलकर्णी यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं....

बाईट – सविता कुलकर्णी

****

शासनाने विविध योजनांद्वारे नव्या पिढीसाठी संधीची दारं उघडली असल्याचं, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. विद्यार्थ्यांच्या कृतीत प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि पर्यावरणाबद्दलची आस्था असावी, असं पाटील यांनी सांगितलं. कुलगुरु डॉ. मनोहर चासकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी १९ हजार ४०० पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या.

****

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांना भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार काल प्रदान करण्यात आला, अंबाजोगाई इथं झालेल्या कार्यक्रमात साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी, मुलाटे यांना हा पुरस्कार प्रदान केला. सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह आणि पंचवीस हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

तुळजापूर इथल्या मुख्य बसस्थानकाचं ‘श्री तुळजाभवानी बसस्थानक’, तर नूतनीकरण करण्यात आलेल्या जुन्या बसस्थानकाचं ‘छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक’ असं नामकरण करण्यात आलं आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन पन्नास लालपरी बस उद्यापासून विविध मार्गावर दररोज दोनशे फेऱ्या करणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्याच्या भोकर शहरात काल सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर १ पूर्णांक १ शतांश इतकी नोंदवली गेली. भोकर तालुक्यात पांडुरणा गावात मागील कांही दिवसांपासून भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत.

****

लातूर इथं एका चारचाकीचा काच फोडून सुमारे ३० लाख रुपये चोरल्याची घटना घडली. औसा रस्त्यावरच्या आयसीआयसीआय बँकेसमोर घडलेली ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून आरोपींचा शोध घेत आहेत.

****

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर शाखेची नवीन जिल्हा कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. आमदार सतीश चव्हाण यांनी यावेळी पक्षातल्या विविध सेलची आढावा बैठक घेतली. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचं आवाहन आमदार चव्हाण यांनी यावेळी केलं.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

**

महिला क्रिकेटमध्ये, भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकाही दोन - एक अशी जिंकली. भारताची फलंदाज स्मृती मानधना हिनं मालिकावीरचा किताब पटकावला.

****

विभागात सगळीकडे पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावातल्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ९८ पूर्णांक ६२ टक्के भरलं आहे.

****

हवामान

राज्यात आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसंच खानदेशातले काही जिल्हे वगळता सर्वत्र पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात सर्वत्र जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment