Sunday, 21 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 21 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

व्यसनमुक्त भारत, व्यसनमुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई या संकल्पनेवर आधारित' नमो युवा रन मॅरेथॉन अर्थात दौडचं आज सकाळी मुंबईत आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं याचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्तानं संपूर्ण भारत आत्मनिर्भरतेसाठी कृतसंकल्पित झाला असून यासाठी आत्मनिर्भर युवा ही या दौडची संकल्पना असल्याचं ते म्हणाले. देशभरात विविध ठिकाणी अशी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.

****

सायबर क्षेत्रातील गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं अत्यावश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना’ या विषयावर काल मुंबईत, इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. आपला देश कायदा-सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीतून महासत्तेकडे वाटचाल करू शकतो असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

सरकारनं काढलेल्या शासन निर्णयामुळं इतर मागास वर्ग -ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्री आणि ओबीसी उपसमितीतील मंत्री सांगत असले तरी ओबीसींच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. म्हणूनच हा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी सकल ओबीसी संघटनांचा येत्या दहा ऑक्टोबर रोजी नागपूर इथं मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिला.

****

आजच्या सर्वपित्री दर्श अमावस्येच्या दिवशी पितृपक्ष पंधरवाडा समाप्त होत आहे. हिंदु धर्मियांमध्ये आपल्या दिवंगत पुर्वजांना प्रतिवर्षी श्रध्दापुर्वक आदरांजली समर्पित करण्यासाठी हा पंधरवड्याला महत्त्व दिलं जातं. नवरात्रोत्सवाला उद्यापासून  शुभारंभ होत आहे. देशभरात विविध ठिकाणी या नवरात्रोत्सवाच्या प्रारंभाला महालया पर्व असं संबोधीत करण्यात येतं. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभ महालया संदेश सामाजिक संपर्क माध्यमातून प्रसारीत केला. यासाठी राज्यातल्या देवीच्या शक्तीपीठांची मंदिरं सज्ज झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या आगारात भाविकांच्या सोयीसाठी पन्नास नव्या बस दाखल होणार आहेत. घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापूर-सोलापूर, तुळजापूर-धाराशिव, तुळजापूर-लातूर, तुळजापूर-कोल्हापूर आदी मार्गांवर बसच्या दररोज सुमारे दोनशे फेऱ्या होणार आहेत. नांदेड जिल्हातल्या माहुरचं रेणुका माता मंदिर आणि वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था देवस्थान समिती तसंच महापालिकेनं केली आहे. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवरच केंद्र सरकारनं वस्तु आणि सेवा कर - जी.एस.टी. कर रचनेतील सुधारणांद्वारे सर्वसामन्यांना बाजारात खरेदीसाठी सकारात्मक् वातावरण निर्माण केलं आहे. दैनंदिन जिवनावश्यक वस्तू काही अंशी स्वस्त होत असल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

****

चायना मास्टर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चिनच्या शेनझेन इथं, आज भारतीय वेळेनुसार दुपारी होणा-या  अंतिम फेरीत त्यांची लढत, अव्वल मानांकीत विश्वविजेत्या कोरीयाच्या जोडीशी होणार आहे.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघानं या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या या आधीच्या सामन्यात सहज विजय नोंदवला आहे. सुपर फोर गटामध्ये काल झालेल्या पहिल्या सांमन्यात बांगलादेशच्या संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला.

****

विभागात सगळीकडे पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ९८ पूर्णांक ६२ टक्के भरलं आहे. धरणात २१ हजार २४४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून,३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणातून पाच हजार ९७१, लोअर दुधना प्रकल्पातून सहा हजार ६२४, तर माकणी धरणातून चार हजार ५९० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

राज्यात आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसंच खानदेशातले काही जिल्हे वगळता सर्वत्र पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात सर्वत्र जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

भारत-ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं कालचा तिसरा सामना जिंकून मालिकाही दोन एक अशी जिंकली.

****

No comments:

Post a Comment