Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार
आहेत. त्यांचं हे संबोधन संध्याकाळी पाच वाजता
प्रसारित होत आहे.
****
व्यसनमुक्त भारत, व्यसनमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित 'नमो युवा रन मॅरेथॉन` आज ठिकठिकाणी घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या
अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या उपस्थितीत ही मॅरेथॉन झाली. नमो रन मॅरेथाॅनमुळं तरुणाई देशभक्ती, देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचं तसंच देशाला आत्मनिर्भर
करण्याच्या ध्यासानं प्रेरित होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी
यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त संपूर्ण भारत आत्मनिर्भरतेसाठी वचनबद्ध झाला
आहे. आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं.
आपण सर्वांनी ऑपरेशन सिंदुरमध्ये भारताची शक्ती बघितलेली आहे. ही शक्ती आणि भारताची
हवाई संरक्षण यंत्रणा अशी आहे की, भारताला कोणी पराजित करू शकत नाही. पण एक गोष्ट भारताला पराजित
करु शकते, ती म्हणजे अंमली पदार्थ. त्यामुळं
आपला युवा जर व्यसनमुक्त असला, तर आपल्या भारतावर कुठलंही आक्रमण चालू शकणार नाही, असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजीनगर
इथंही आज नमो रन मॅरेथॉन शर्यत घेण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या अर्थात अमृत महोत्सवी
वाढदिवसानिमित्तानं ‘चलो जीते हैं’ हा मोदी
यांच्याशी संबंधीत चित्रपट आज देशभरातील महाविद्यालयांसह पाचशे चित्रपटगृहांमधून दाखवला
जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लहानपणीच्या एका घटनेवर आधारित या चित्रपटातून
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रभावित होवून स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न दर्शवण्यात आला आहे.
****
भारत - अमेरीका, उभय देशातील व्यापार विषयक चर्चेच्या अनुषंगानं केंद्रीय वाणिज्य
आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वातलं एक शिष्टमंडळ उद्या अमेरीका दौ-यावर
जाणार आहे.या चर्चेतून दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक करार निश्चिती करणं हा या भेटीचा
उद्देश आहे. १६ सप्टेंबर रोजी अमेरीकी शिष्टमंडळानं भारत भेटीत संबंधीत विविध मुद्द्यांवर
चर्चा केलेली आहे.
****
वस्तू आणि सेवा कर जी.एस.टी.च्या सुधारित संरचनेनुसार
उद्यापासून लागू होत आसलेल्या सवलतींच्या अनुषंगानं, जी.एस.टी. शंका निरसण आणि तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत ग्राहकांच्या संबंधीत
शंका निवारणासठी असं एकीकृत संकेतस्थळ बनवण्यात आलं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
याचसोबत एक-नऊ-एक-पाच एकोणीस पंधरा या मोफत
दुरध्वनी क्रमांकावरही विविध सतरा भाषांमधून आपली तक्रार नोंदवता येऊ शकणार आहे.
****
बीड जिल्ह्यात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणा-या पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण पाणी पातळी
नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी क्रमांक एक आणि सहा अशी दोन दारं पाव मिटरनं उघडण्यात
आली आहेत. याद्वारे मांजरा नदी पात्रात एक हजार सातशे सत्तेचाळीस पुर्णांक चौदा शतांश
क्युसेक्स इतकं पाणी सोडण्यात येत आहे. तसंच, पाणी आवक बघूनच पाणी सोडणं नियंत्रीत केलं जाणार असल्यानं नदी
काठ आणि पुर बाधित गावच्या नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
लातूर जिल्हातल्या उदगिर इथं मराठवाडा साहित्य परिषद
- मसापच्या उदगीर शाखेतर्फे काल 'मुक्तिसंग्रामात साहित्य परिषदेची भूमिका’ या विषयावर प्राध्यापक डॉक्टर. दत्ताहरी
होनराव यांचं व्याख्यान झालं. ज्या राजवटीत सामान्य जनतेच्या नशिबी अन्यायच होता त्या
काळी सामान्य माणसाला विचारप्रवण करण्याचं आणि सरंजामशाही विरुद्ध लढण्याचं कार्य मसापनं
केल्याचं मत होनराव यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
उद्या प्रारंभ होत असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातल्या
देवीच्या शक्तीपीठांची मंदिरं सज्ज झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या
आगारात भाविकांच्या सोयीसाठी पन्नास नव्या बस दाखल होणार आहेत. घटस्थापनेपासून कोजागिरी
पौर्णिमेपर्यंत तुळजापूर-सोलापूर, तुळजापूर-धाराशिव, तुळजापूर-लातूर, तुळजापूर-कोल्हापूर आदी मार्गांवर बसच्या दररोज सुमारे दोनशे
फेऱ्या होणार आहेत. नांदेड जिल्हातल्या माहुरचं रेणुका माता मंदिर आणि वणीच्या सप्तशृंगी
देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत -
पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात
होईल. भारतीय संघानं या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या आधीच्या सामन्यात सहज विजय नोंदवला
आहे. सुपर फोर गटामध्ये काल झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघानं श्रीलंकेवर
विजय मिळवला.
****
मराठवाड्यात सर्वत्र जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आज
वर्तवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment