Monday, 22 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर आधारित दोन पुस्तकं, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयासचं प्रकाशन आज नवी दिल्लीत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. मोदी यांच्या भाषणांची ही पुस्तकं सुशासनाच्या दिशेनं त्यांचा दृष्टीकोन दर्शवतात, या भाषणांमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले, देशाला विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्याची दिशा दिली असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी राजकारणाला जनसेवेचं माध्यम बनवलं असल्याचं नमूद केलं. पंतप्रधानांच्या कार्यकाळात सर्वच क्षेत्रात झालेल्या सकारात्मक बदलांवर त्यांनी प्रकाश टाकला.

बाईट – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

राज्यसभेचे उपसभापती हरीवंश, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते.

****

वस्तु आणि सेवा कराच्या दुसर्या टप्प्यातल्या सुधारणा आजपासून लागू झाल्या असून, जीएसटी बचत उत्सव सुरू झाला आहे. याअंतर्गत आता कराचे फक्त पाच आणि १८ टक्के स्लॅब लागू असून, खाद्यपदार्थांसह दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या किमती यामुळे कमी झाल्या आहेत.

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर नागरीकांना मोदी सरकारने पुढच्या पिढीच्या जीएसटी सुधारणांची भेट दिली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या जीएसटीमध्ये ३९० हून अधिक वस्तूंवरील करांमध्ये ऐतिहासिक कपात करण्यात आली असून, या सवलतीमुळे देशवासियांच्या जीवनात आनंद येईल आणि त्यांची बचतही वाढेल, असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.

****

शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही नवरात्री खास असून, जीएसटी बचतच्या उत्सवासोबतच, स्वदेशीचा मंत्र या काळात एक नवीन ऊर्जा प्राप्त करेल. विकसित आणि स्वावलंबी भारताचा आपला संकल्प साध्य करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया, असं पंतप्रधान म्हणाले.

राज्यात तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, नांदेड जिल्हातल्या माहुरचं रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे.

वणीच्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या हस्ते दागिन्यांची पूजा करुन मिरवणूक काढण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असून, राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत, तसंच १७ वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी देवीची महापुजा करण्यात आली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातल्या संघर्षावर आधारित 'चलो जीते हैं' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे. लातूर इतल्या गृहिणी अश्विनी आळंदकर यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं....

बाईट – अश्विनी आळंदकर

****

धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या साकत गावात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाणी शिरल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याशी दूरध्वनीवरून परिस्‍थितीचा आढावा घोतला. याठिकाणी अडकलेल्या १२ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्यादलाच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

****

पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे धरणाचे १८ दरवाजे चार फूट उघडून ७५ हजार ४५४ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

माजलगाव धरणातून ८८ हजार ५९४, तर मांजरा धरणातून २२ हजार ९८२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज दाखल करण्यास येत्या ३० तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ही माहिती देण्यात आली.

****

No comments:

Post a Comment