Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 22 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत २५ लाख पात्र महिलांना मोफत नवीन गॅस
जोडणी देण्याचा सरकारचा निर्णय
· वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा आजपासून लागू
· उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठवाड्यातील अतिवृष्टीचा आढावा
आणि
· शारदीय नवरात्रोत्सवाला सर्वत्र भक्तिभावाने प्रारंभ
****
आज नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं केंद्र शासनानं पंतप्रधान
उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत २५ लाख पात्र कुटुंबांना मोफत नवीन जोडणी देण्याचा
निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर ही माहिती दिली.
पंतप्रधानांनी सर्व महिलांना शुभेच्छा देत सणासुदीच्या काळात सरकारचे हे पाऊल
महिलांना केवळ आनंद देणार नाही तर महिला सक्षमीकरणाचा संकल्पही बळकट करेल. असं
म्हटलं आहे.
****
वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा
आजपासून लागू झाल्या. नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने नागरिकांना
जीएसटी सुधारणांची भेट दिली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं
आहे. या सुधारणेत ३९० हून अधिक वस्तूंवरील करांमध्ये ऐतिहासिक कपात करण्यात आली
असून,
या सवलतीमुळे देशवासियांच्या जीवनात आनंद येईल आणि त्यांची
बचतही वाढेल,
असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.
****
करप्रणालीतल्या सुधारणा हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचं मत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
राज्यातल्या माहिती तंत्रज्ञान विभागाचं सक्षमीकरण करून
डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस
यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत माहिती तंत्रज्ञान
विभागाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी
निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकार
राबवत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेविषयी आपण
जाणून घेऊ.
स्मार्ट सिटी मिशन देशाच्या नागरी भागाला आकार देत आहे आणि शहरवासियांच्या
आकांक्षा प्रत्यक्षात उतरवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०१५ मध्ये
सुरू केलेल्या या उपक्रमाचं उद्दिष्ट स्मार्ट आणि शाश्वत उपायांद्वारे नागरी
जीवनमानाचा दर्जा उंचावणे हा आहे. स्मार्ट सिटी मिशन प्रकल्प सुरू करताना
पंतप्रधान म्हणाले होते की, स्मार्ट सिटी संकल्पना स्वतःच एक जनआंदोलन आहे.
ये स्मार्ट सिटी कॉन्सेप्ट ये सिर्फ, इस काम के लिए इतने पैसे दिये जायेंगे वो नही है। ये अपने आप में एक बहुत बडा जनआंदोलन है। ये बिते हुये कल के अनुभव के आधार पर, उज्वल भविष्य की नींव रखने का, एक सार्थक
प्रयास है।
गेल्या दशकात या योजनेला उल्लेखनीय यश मिळालं आहे. आठ हजारांहून अधिक
प्रकल्पांपैकी सुमारे ९४ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत. याव्यतिरिक्त, १३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे
प्रकल्प अंमलबजावणीच्या प्रगत टप्प्यात आहेत, ज्यामुळे या मोहिमे अंतर्गत एकूण गुंतवणूक सुमारे १६४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
या योजनेतून शाळा
डिजिटल वर्गखोल्यांनी सुसज्ज केल्या जात आहेत, वारसा स्थळांचे पुनरुज्जीवन केले जात आहे, सार्वजनिक जागा पुनर्संचयित केल्या जात आहेत आणि रस्ते स्वच्छ आणि सुरक्षित
होत आहेत. स्मार्ट सिटी मिशनला दहा वर्षे पूर्ण होत असताना, त्याचा परिणाम देशभर दिसून येत आहे.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाड्यातील
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. बीड, धाराशिव, लातूर,
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी
दूरध्वनीवरून संवाद साधून तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. धाराशिव
जिल्ह्यात परंडा तालुक्यातील ढगपिंपरी आणि साकत गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या
नागरिकांना सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश
दिले.
परंडा तालुक्यात आज सकाळपर्यंत १०९ मिलिमीटर तर भूम तालुक्यात १०६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
परिणामी परंडा तालुक्यातील प्रमुख नद्यांना पूर आला आहे. या पुरात एका महिलेचा
मृत्यू झाला. तर अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीचे क्रांतीज्योती सावित्रीमाई
फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचं आज मुंबईत वितरण करण्यात आलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते १०९ शिक्षक पुरस्कारांसह दोन विशेष पुरस्कार
यावेळी प्रदान करण्यात आले.
****
नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. आदिशक्तीच्या
साडेतीन शक्तीपिठांसह राज्यात ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये घटस्थापनेसह विविध
पारंपरिक विधींना सुरुवात झाली.
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची धाराशिवचे
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत
घटस्थापना करण्यात आली. यावेळी संबळ, शंख आणि तुतारीच्या
निनादात,
कल्लोळतीर्थापासून तीन घट डोक्यावर घेऊन देवीच्या सिंह
गाभाऱ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात माहूरगडावर रेणुका देवीच्या दर्शनासाठी
भाविकांनी आज मोठी गर्दी केली आहे.
अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला
आज सकाळी १० वाजता घटस्थापना आणि महापूजेने प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी
अश्विनी जिरगे सोनवणे आणि त्यांचे पती हरिश्चंद्र सोनवणे यांनी देवीची विधीवत
महापूजा केली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
कोल्हापूर इथल्या श्री अंबाबाई देवीच्या मंदीरात अभिषेक, पूजा
झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. आज पहिल्या दिवशी अंबाबाईची महाविद्या
श्रीकमलालक्ष्मी मातेच्या रुपात पूजा बांधण्यात आली.
नाशिक जिल्ह्यात वणीच्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये
आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळातर्फे भाविकांसाठी
जादा बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत,
धुळ्यातील कुलस्वामीनी एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना
करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई तसेच फुलांच्या माळांनी
सजवण्यात आलं आहे
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला
आजपासून सुरुवात झाली. नागरिकांनी विशेषत: महिलांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी
गर्दी केली आहे.
****
स्थानिकांचा पाठिंबा मिळाल्यास, उद्योग
क्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळते, असं प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योजक तसंच सीएसन फर्स्ट संघटनेचे अध्यक्ष मुकूंद कुलकर्णी यांनी केलं आहे. आकाशवाणीच्या विशेष कार्यक्रमात
कुलकर्णी म्हणाले.
बाईट - ज्येष्ठ उद्योजक मुकूंद कुलकर्णी
उद्योग आणि विकास या विषयावर केलेलं मुकूंद कुलकर्णी यांचं
हे सविस्तर विवेचन, विशेष प्रासंगिकच्या उद्या सकाळी दहा
वाजून ४५ मिनिटांनी सादर होणाऱ्या पाचव्या भागात आपण ऐकणार आहोत.
****
“स्वस्थ नारी - सशक्त परिवार” या अभियानांतर्गत नांदेड जिल्हा
रुग्णालयाच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात
आलं. यात ८५ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
****
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यात
आतापर्यंत २९ नेत्र तपासणी शिबीरं
घेण्यात आली. यात एक हजार ५३३ रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
****
शेतकरी बांधवाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे
निर्देश खासदार संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी
शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, धीर दिला.
****
छत्रपती संभाजीनगर विभागातील जवळपास १७ लाख हेक्टरवरील पिके
बाधित झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात ओला
दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे
आमदार सतीष चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी, शेवगाव
आणि जामखेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शालेय
विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
बुलडाणा तालुक्यातील पाडळी परीसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य
पावसामुळे पैनगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे.
****
मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच धरणांमधून पाण्याचा मोठ्या
प्रमाणात विसर्ग सुरु आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातू ५६ हजार ५९२, मांजरा धरणातून २१ हजार १६७, निम्न तेरणा प्रकल्पातून २०
हजार ४१६,
माजलगाव धरणातून ६४ हजार ५२३ तर सिना कोळेगाव प्रकल्पातून
३२ हजार ३०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment