Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 22 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
जीएसटी दरातील सुधारणांमुळे देशाच्या विकास गाथेला वेग
येईल-पंतप्रधानांचं प्रतिपादन, आजपासून सुधारीत जीएसटी दरांची अंमलबजावणी
·
सेवा पर्व उपक्रमांतर्गत राज्यात नमो युवा रन फॉर नशा
मुक्त भारत या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन
·
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ, बहुतांश ठिकाणी
गर्दी व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर
·
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मध्ये भारताचा पाकिस्तानवर
सहा गडी राखून विजय
आणि
·
विभागात जायकवाडीसह सर्वच धरणांमधून मोठा विसर्ग
****
केंद्र
आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे देश अनेक करांच्या जाळ्यातून मुक्त झाला आणि ‘एक
देश, एक कर’ हे स्वप्न साकार झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं. वस्तु आणि सेवा कर - जीएसटीमध्ये काही महत्वाच्या सुधारणा आजपासून
लागू होत आहेत, यानिमित्त काल देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान
बोलत होते.
जीएसटी
सुधारणांमुळे नागरिक आता आपल्या पसंतीच्या वस्तु कमी किमतीत खरेदी करु शकतील, असं ते म्हणाले.
या सुधारांमुळे देशाच्या विकास गाथेला वेग येईल, युवक,
मध्यमवर्ग, महिला आणि उद्योगांना या सुधारणांचा
मोठा लाभ होईल, असं त्यांनी सांगितलं. पुढच्या पिढीच्या या जीएसटी
सुधारणा, बचत उत्सव आणि नवरात्रीच्या पंतप्रधानांनी देशवासियांना
शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या
११ वर्षात केंद्र शासनाने कररचनेत केलेल्या बदलांची आणि त्याची समाजावर झालेल्या परिणामांची
पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली.
****
या सुधारणांमुळे
दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होऊन नागरिकांची क्रयशक्ती वाढेल, असा विश्वास
छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी नागरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी व्यक्त
केला. ते म्हणाले...
बाईट – किशोर शितोळे
****
सेवा आणि
सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार
परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्तच्या
विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं नागरिकांच्या सुलभतेसाठी मेट्रो रेल्वे आणि
उच्च प्रतिची घरं पुरवण्याच्या योजनांविषयी जाणून घेऊ.
मेट्रो
रेल्वे आपल्या देशात फक्त प्रवासाची सुविधा नसे तर देशाच्या
विकासगाथेची जीवनरेखा ठरती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नेतृतवात आज जगातल्या तिसऱ्या
क्रमाकांचे मेट्रो रेल्वेचे जाळे देशात विस्तारलं आहे. २०१४
पूर्वी देशात अवघ्या २५० किलोमीटर पर्यंत असलेल्या मेट्रो रेल्वेसेवेचा आता एक
हजार किलोमीटरहून अधिक विस्तार झाला आहे.
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नागरी
क्षेत्रात सरकारनं उत्तम दर्जाची घरं उपलब्ध करुन दिली आहेत. गेल्या ११ वर्षांत एक
कोटी १६ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीला मंजूरी दिली आहे. त्यापैकी ९३ लाख
घरांचे काम पूर्ण झालं आहे.
सरकारनं
नागरिकांच्या जीवमानात सुलभता घडवून आणण्यासाठी मेट्रो रेल्वेसेवा आणि किफायतशीर
दरात उच्च दर्जाची घरं पुरवण्याकडं लक्ष केंद्रित केलं आहे.
****
सायबर सुरक्षेबरोबरच
अंमली पदार्थ संदर्भातल्या गुन्ह्यांप्रकरणी राज्य शासनानं ‘झिरो टॉलरन्स धोरण’ अवलंबलं
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजप युवा मोर्चाच्या ‘नमो
युवा रन फॉर नशा मुक्त भारत’ या कार्यक्रमाचा प्रारंभ काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. या मॅरेथॉनमुळे आपली तरुणाई देशभक्तीला
प्राधान्य देईल, तसंच देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याच्या आणि
देशाला आत्मनिर्भर करण्याच्या ध्यासानं प्रेरित होईल, असा विश्वास
मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
**
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्तानं सुरु करण्यात आलेल्या ‘सेवा पर्व’
अंतर्गत ‘नमो युवा रन’ हा उपक्रम देशभरात विविध ठिकाणी राबवला जात आहे.
छत्रपती
संभाजीनगर इथं नमो रन मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना
टीशर्ट, मेडल, प्रमाणपत्र तसंच महिला पुरुष गटातील
विजेत्यांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आलं.
परभणी इथंही
झालेल्या या मॅरेथॉन मध्ये सहाशे युवक सहभागी झाले होते. यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात
आलं.
बीड जिल्हात
या मॅरेथॉनला भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखून सुरुवात केली.
****
स्वस्थ
नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेने काल सिडको परिसरात
घेतलेल्या आरोग्य शिबीराचं उद्घाटन बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं.
१२८ रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
****
शारदीय
नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचं
अंबाबाई मंदिर, नांदेड जिल्हातल्या माहूरचं रेणुका माता मंदिर
तसंच नाशिक जिल्ह्यात वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी
करण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानी
मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्य पर्यटन महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, यंदा प्रथमच
या महोत्सवात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स - एआयचा वापर करण्यात येणार आहे. याविषयी अधिक
माहिती देत आहेत आमचे वार्ताहर देविदास पाठक:
बाईट – कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी
धाराशिव
नांदेड
जिल्ह्यातल्या माहूर गडावर श्री रेणुका मातेची महापूजा केली जात आहे. मंदिर प्रशासनाने
या महोत्सवाची जय्यत तयारी केली असून, सुरक्षेच्या अनुषंगाने ९० सीसीटीव्ही
कॅमेरे, मुख दर्शन घेण्यासाठी ६ एलसीडी स्क्रीन बसवण्यात आल्या
आहेत.
अंबाजोगाई
इथं श्री योगेश्वरी देवी मंदिरात आज सकाळी दहा वाजता घटस्थापना होणार आहे. या उत्सवामध्ये
दररोज कीर्तन, प्रवचन, भजन, गायन,
इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
छत्रपती
संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या यात्रेच्या
पार्श्वभूमीवर दोन ऑक्टोबर पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
****
आशिया चषक
क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मध्ये भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. काल
दुबईत झालेल्या सामन्यात, पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करत १७२ धावांचं लक्ष्य दिलं,
भारताने ते सात चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं. ७४ धावा करणारा अभिषेक
शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
कन्नड तालुक्यातल्या बरकतपूर आणि शेलगांव भागात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची
पाहणी केली.
**
लातूर, उदगीर आणि
देवणी तालुक्यातल्या नुकसानग्रस्त शेतीपिकांची काल आमदार अमित देशमुख यांनी पाहणी केली.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५०
हजार रुपये सरसकट मदत देण्याची मागणी देशमुख यांनी केली.
**
दरम्यान, लातूर जिल्ह्यात
ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसह जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १११ टक्के इतका पाऊस झाला आहे.
विभागात
जवळपास सर्वच धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.
पैठणच्या
जायकवाडी धरणातून २४ हजार १०४, मांजरा धरणातून १७ हजार ३३३, येलदरी धरणातून सहा हजार ९२०, निम्न तेरणा प्रकल्पातून
२० हजार ४१६, माजलगाव धरणातून १७ हजार ९०० तर सिना कोळेगाव प्रकल्पातून
३२ हजार ३०० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment