Monday, 22 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

वस्तु आणि सेवा कराच्या दुसर्या टप्प्यातल्या सुधारणा आजपासून लागू होत आहेत. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पासूनच देशभरात जीएसटी बचत उत्सव सुरु होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

जीएसटी बचत उत्सवाअंतर्गत मिळणार्या लाभांची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. ते म्हणाले:

बाईट – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

वस्तू आणि सेवा करातल्या या सुधारणा, भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही नवरात्री खास असून, जीएसटी बचतच्या उत्सवासोबतच, स्वदेशीचा मंत्र या काळात एक नवीन ऊर्जा प्राप्त करेल. विकसित आणि स्वावलंबी भारताचा आपला संकल्प साध्य करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया, असं पंतप्रधान म्हणाले.

राज्यात तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, नांदेड जिल्हातल्या माहुरचं रेणुका माता मंदिर तसंच वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे.

श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्राला उत्साहात प्रारंभ झाला असून, भाविकांनी सकाळपासून मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे.

श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात दुपारी १२ वाजता घटस्थापना होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी देवीची महापुजा करण्यात आली. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर दोन ऑक्टोबर पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. लोखंडी पुल, कोकणवाडी चौक, महावीर चौकापासून उड्डाणपुलाखालून जाणारा मार्ग आणि रेल्वेस्थानक ते पंचवटी चौक हे मार्ग बंद राहणार आहेत.

****

आयआयएम मुंबईचं केंद्र आता पुण्यातही सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. देशातल्या नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्था म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या आयआयएम मुंबईचं केंद्र पुण्यात व्हावं, यासाठी मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला, संस्थेच्या अधिष्ठाता समिती आणि त्यानंतर विद्यापरिषदेने मान्यता दिली.

****

नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारनं ६८९ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल ही घोषणा केली. जून ते ऑगस्ट २०२५ या काळात अतिवृष्टीनं बाधित या चार जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेने तातडीनं पंचनामे करून अहवाल पाठवल्यामुळे ही मदत त्वरित मंजूर केल्याचं ते म्हणाले. या मदतीचं वाटप करताना शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मदतनिधीचा वापर करू नये आणि मंजूर केलेला सर्व निधी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात द्यावा अशा सूचना बँकांना दिल्या असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

गडचिरोली जिल्ह्यात हालूर गावात महिलांच्या पुढाकारानं सर्व ग्रामस्थांनी मिळून गावात दारुबंदीचा ठराव मंजूर केला. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या पाठिंब्यानं गावाच्या समग्र विकासासाठी गावातल्या महिलांनी हे ऐतिहासिक पाऊल उचललं.

****

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधन मानावं लागलं. शेनझेन इथं काल अंतिम सामन्यात किम वॉन हो आणि सेओ सेउंग जे या कोरियाच्या जोडीनं त्यांचा २१-१९, २१-१५ असा पराभव केला.

****

लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसह जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १११ टक्के इतका पाऊस झाला. निलंगा तालुक्यातल्या काटेजवळगा, केदारपूर परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात काल दोन जण वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं, तर दुसऱ्याचा मृतदेह सापडला. अन्य एका घटनेत सांगवी गावात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला.

****

विभागात जवळपास सर्वच धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

पैठणच्या जायकवाडी धरणातून २४ हजार १०४, मांजरा धरणातून १७ हजार ३३३, येलदरी धरणातून सहा हजार ९२०, तर निम्न तेरणा प्रकल्पातून २० हजार ४१६, दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

****

No comments:

Post a Comment