Tuesday, 23 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 23 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात अतिवृष्टीमुळे ७० लाख एकर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. शेती, पशुधनासह ग्रामीण भागात रस्ते आणि घरांचं अतोनात नुकसान झालं असून, युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू असल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. स्थानिक प्रशासनाला तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहचवण्यात येणार असल्याची ग्वाही भरणे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच पूरग्रस्त भागांना भेट देणार असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पालकमंत्र्यांनी आपल्या नेमून दिलेल्या जिल्ह्यात आणि आमदारांनी आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर, गावोगावी नुकसानग्रस्त भागात जाऊन बाधित नागरिकांना त्वरित दिलासा आणि मदत द्यावी, तसंच प्रशासनाने त्वरित पंचनामे करण्यास सुरुवात करावी असे निर्देश पवार यांनी दिले.

****

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. धाराशिव, बीड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे.

धाराशिव जिल्ह्यात पंडरा तालुक्यातली अनेक गावं मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. पुरात अडकेलल्या ९९ नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे खोंदला गावातली २० कुटुंब ग्रामपंचायत कार्यालयात आसरा घेत आहेत. वागेगव्हण, कारंजा याठिकाणी देखील जोरदार पाऊस सुरु आहे.

**

बीड जिल्ह्यातल्या २९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला. बिंदूसरा, गोदावरी, करपरा आणि सिंधफणा नदीला पुर आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. खरिपातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि तुरीसारखी पिकं पूर्णपणे उध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज बीड जिल्ह्यात कामखेडा, हिंगणी हवेली, पेंडगाव सह सिंधफना नदी काठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या. आमदार संदीप क्षीरसागर यांनीही पूग्रस्त भागाचा दौरा करुन नागरीकांची मदत केली.

**

हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि औंढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. औंढा तालुक्यात पिंपळदरी इथल्या गावालगतच्या ओढ्याला आलेल्या पुरात नामदेव रिठे हा तरुण वाहून गेला. त्यांचा मृतदेह आज आढळून आला. कुरुंदा गावात महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्रात पाणी शिरल्यानं परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. पांगरा शिंदे गावातही ढगफुटी सदॄश्य पावसामुळे गावात पाणी शिरलं असून, जवळपास १०० शेतकरी आणि शेतमजूर अडकले होते, त्यांना ग्रामस्थांनी गावात परत आणलं.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड, कन्नड वैजापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती आहे. बाभुळगाव आणि टाकळी इथं प्रत्येकी एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं वृत्त आहे.

**

नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं, विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणातून सध्या दोन हजार २७२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं असून, धरणात सध्या ९२ हजार ३९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून सध्या एक लाख तीन हजार ७५२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

मांजरा धरणातून ४३ हजार ५१६, माजलगाव धरणातून एक लाख १५ हजार २४३, तर सिना कोळेगाव प्रकल्पातून ७० हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे.

**

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं मदत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या नुकसानीची राज्य सरकारनं गांभीर्यानं दाखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करावे, तर केंद्र सरकारनं देखील नैसर्गिक आपत्ती निवारणातून मदत करावी, असं पवार म्हणाले.

****

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही, राज्यात ओला दुष्कळ जाहिर करण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

****

वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत सुधारीत दर लागू करण्यात आले आहेत. ग्राहकांना या सुधारणांचा लाभ मिळत नसल्यास राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक १९१५ या क्रमांकावर किंवा ८८ ०० ०० १९ १५ या वॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असं आवाहन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालायनं केलं आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नदी दिल्लीत ७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार आहेत. मल्याळी चित्रपट अभिनेता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

****

No comments:

Post a Comment