Tuesday, 23 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत २५ लाख पात्र महिलांना मोफत नवीन गॅस जोडणी देण्याचा सरकारचा निर्णय

·      वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा लागू, यामुळे जीडीपीमध्ये सुमारे २० लाख कोटी रुपयांची वाढ होईल-केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन

·      शारदीय नवरात्रोत्सवाला सर्वत्र भक्तिभावाने प्रारंभ

·      मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

आणि

·      पुढील दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता, जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु

****

केंद्र शासनानं पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत २५ लाख पात्र कुटुंबांना मोफत नवीन जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल समाज माध्यमांवर ही माहिती दिली. सर्व महिलांना शुभेच्छा देत सणासुदीच्या काळात सरकारचं हे पाऊल महिलांना फक्त आनंदच देणार नाही तर महिला सक्षमीकरणाचा संकल्पही बळकट करेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा कालपासून लागू झाल्या. जीएसटी सुधारणांमुळे जीडीपीमध्ये सुमारे २० लाख कोटी रुपयांची वाढ होईल, असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. या सुधारणांमुळे व्यापाऱ्यांपासून ते सामान्य नोकरदारांपर्यंत सर्वजण सुखावतील, असं वैष्णव यांनी सांगितलं, ते म्हणाले...

बाईट – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

**

जीएसटी करप्रणालीतल्या या सुधारणा हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

नवीन दर आकारणीसंदर्भात नांदेड इथं खासदार अशोक चव्हाण यांनी दुकानांना भेट देऊन दुकानमालक आणि ग्राहकांशी संवाद साधला. दुकानांच्या बाहेर जीएसटीचे दर कमी झाल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे स्टिकर्सही यावेळी लावण्यात आले.

****

सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्त विशेष मालिकेच्या आजच्या भागात, सरकारने कल्याणकारी उपाययोजना, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनातून असंघटीत क्षेत्रासाठी केलेल्या उपाययोजनांविषयी जाणून घेऊ.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित केले होतं. यावेळी ते म्हणाले होत, जर तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काही नसेल तर काळजी करु नका, मोदी हीच तुमची हमी आहे.

(बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी)

सकल राष्ट्रीय उत्पादनात ४५ टक्के योगदान असलेले असंघटीत क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत एक महत्त्वाचा घटक आहे. सरकारनं असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी घेतली आहे. पीएम स्ट्रीट व्हेंडर अर्थात फेरीवाले यांच्यासाठीची स्वनिधी योजना भांडवल कर्ज आणि डिजिटल पेमेंटसाठी रोख परतावा म्हणजेच कॅशबॅक ही सुविधा देते. ई-श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस आहे, जो सामाजिक सुरक्षा योजनांच्या लक्ष्यित वितरणाला मदत करत आहे. पीएम श्रम योगी मान-धन योजना ही असंघटित कामगारांसाठी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये सरकारचे ५० टक्के योगदान आहे. सरकारच्या विविध उपक्रमांमुळे कामगारांना लाभ, कर्ज आणि प्रशिक्षणाची हमी मिळते आहे.’’

****

नवरात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. यावेळी संबळ, शंख आणि तुतारीच्या निनादात, कल्लोळतीर्थापासून तीन घट डोक्यावर घेऊन देवीच्या सिंह गाभाऱ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात माहूरगडावर श्री रेणुका मातेची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक महापूजा केली. माहूरगडावर रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला काल घटस्थापना आणि महापूजेने प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी देवीची विधीवत महापूजा केली.

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला कालपासून सुरुवात झाली. नागरिकांनी विशेषत: महिलांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. वैजापूर तालुक्यातल्या लासूर इथं देवी दाक्षायणी मंदिरात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याहस्ते वस्त्रालंकार पूजा करण्यात आली.

****

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीचे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल मुंबईत प्रदान करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते १०९ शिक्षकांना यावेळी गौरवण्यात आलं.

****

राज्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मराठवाड्यातल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून तत्काळ मदत पुरवण्याचं सूचित केलं. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूम आणि परंडा तालुक्यात अनेक गावं महापूराच्या विळख्यात आली आहेत. ९२ गावं बाधित होऊन ६२ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रावरच्या शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

पूरग्रस्त भागात लष्कर, राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान दाखल झाले असून हेलिकॉप्टर आणि बोटींच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत एकूण ६५ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. देवगाव इथं परंडाचे आमदार तानाजी सावंत यांनी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.

दरम्यान, पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात आज सर्व शाळांना सुटी जाहिर करण्यात आली आहे.

**

लातूर जिल्ह्यातही काल मोठा पाऊस झाला. जिल्ह्यात नदी, नाले, ओढ्यांना पूर आला, त्यामुळे अनेक मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने निलंगा, औसा तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला होता. औराद शहाजनी इथल्या लातूर -जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याचं स्वरूप आलं होतं.

**

बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असून, शिरुर, पाटोदा तालुक्यातल्या शंभराहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं. जिल्ह्यातल्या २९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

**

जालना तालूक्यातल्या सेवली मंडळात अतिवृष्टीमुळे उखळी इथला पाझर तलाव फुटल्याने याठिकाणच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आमदार अर्जुन खोतकर आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काल जालना तालुक्यात विरेगाव, सेवली आणि नेर मंडळाचा दौरा करुन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि संबधीतांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

**

छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी काल वैजापूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी बांधवाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं असून, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागात जवळपास १७ लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीष चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

****

मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजांसह नऊ आपत्कालिन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून ९९ हजार ३६ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

माजलगाव धरणातून ८८ हजार ५९४, तर मांजरा धरणातून २२ हजार ९२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

येत्या दोन दिवसात कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

‘‘स्वस्थ नारी - सशक्त परिवार” या अभियानांतर्गत नांदेड जिल्हा रुग्णालयाच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. यात ८५ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

****

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २९ नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आली. यात एक हजार ५३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

****

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त डॉ कलाम आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन कडून नवी दिल्ली इथं १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी डॉ अंजली चिंचोलीकर यांच्याशी ७७ ७६ ०३ २९ ९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment