Tuesday, 7 October 2025

TEXT -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ सकाळी ७.१० मि.

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर

·      अधिकाधिक गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·      मराठवाड्यासह विदर्भात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि मदर डेअरीच्या सहकार्यानं दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार

आणि

·      नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

****

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यात २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत, काल मुंबईत काढण्यात आली. १४७ नगर पंचायतींपैकी, अनुसूचित जमातींसाठी १३, इतर मागास वर्गासाठी ४०, खुल्या प्रवर्गासाठी ७६ जागात आरक्षित झाल्या आहेत. ३३ नगरपरिषदा, अनुसूचित जातीसाठी तर ६७ नगरपरिषदा, ओबीसीसाठी आरक्षित झाल्या आहेत. नगर पंचायतींच्या उर्वरित ७६ जागांवर खुल्या प्रवर्गातून नगराध्यक्ष निवडून येतील. तर सर्व गटातल्या अर्ध्या जागा महिलांसाठी राखीव असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाबाबत हा संक्षिप्त वृत्तांत...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, फुलंब्री आणि सिल्लोडचं नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी राखीव झालं असून, कन्नड, खुलताबाद आणि पैठण या नगर परिषदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तर वैजापूर नगर परिषदेचं अध्यक्षपद इतर मागासवर्गासाठी राखीव झालं आहे.

बीड जिल्ह्यात बीड नगरपालिका अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी, माजलगाव इतर मागास महिला प्रवर्गासाठी, गेवराई तसंच परळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी, धारूर सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर अंबाजोगाईचं नगराध्यक्ष पद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झालं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या १६ पंचायत समितींच्या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत येत्या १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर लातूर जिल्ह्यात उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाची आरक्षण सोडत उद्या काढण्यात येणार आहे.

****

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून, गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ट्वेंटी-ट्वेंटी गुंतवणूक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत ते काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन उद्योग वाढीबरोबरच प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी काम करत असून, मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, राज्यात ग्रीन स्टील संदर्भात धोरण तयार करण्यासाठी एका समितीचं गठन करण्यात येत असल्याचं सांगितलं. 

****

विदर्भातल्या ११ आणि मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि मदर डेअरीच्या सहकार्याने दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प दुग्धव्यवसायाला चालना देऊन शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोलाचा ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींचं वाटप केलं जाणार आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या उपाययोजनांसह विविध विकासकामांसाठी गडकरी यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं.

****

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणारी सर्व कामं वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. त्या काल मुंबईत बोलत होत्या. प्रत्येक प्रकल्पाच्या तांत्रिक आणि भौगोलिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, या कामांमुळे अंतर कमी होणार आहे. वेळ आणि इंधनाची बचत होऊन प्रवास सुखकर होण्यास मदत होणार असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात काल प्रसिद्ध केली. या अंतर्गत ९३८ पदांसाठी ४ जानेवारी २०२६ रोजी परीक्षा होईल. यासाठी ७ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान अर्ज करता येईल. यामध्ये उद्योग निरीक्षक संवर्गातली नऊ पदं, तांत्रिक सहायक संवर्गासाठी ४ पदं, कर सहायक संवर्गासाठी ७३ पदं, तसंच लिपिक-टंकलेखक संवर्गासाठीच्या ८५२ पदांचा समावेश आहे. विविध श्रेणीत १८ ते ४३ वयोगटातले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

****

बिहार राज्य विधानसभा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने काल जाहीर केला. सहा आणि ११ नोव्हेंबर, असं दोन टप्प्यात मतदान होणार असून, मतमोजणी १४ नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत मतदान यंत्रांवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रं असणार आहेत.

****

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन उद्या आठ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या डिसेंबर पासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल, अशी माहिती महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. विमानतळाला ३० सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मिळाला आहे.

****

राज्यातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नवयुगीन आणि पारंपारिक अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या तुकडीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यभरात ६०० ठिकाणी हे उद्घाटनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत जवळपास अडीच हजारहून अधिक तुकड्यांमध्ये प्रशिक्षण सुरू होणार आहे.

**

नांदेड इथं सर्व शाळांमधले शिक्षक, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसंच विविध संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं अश्विन पौर्णिमेनिमित्तची यात्रा आज होत असून, मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले आहेत. नवरात्रौत्सवानंतर सुरु झालेली देवीची मंचकी निद्रा संपली असून, मध्यरात्री देवी पुन्हा सिंहासनारुढ झाली. आज मानाच्या काठ्यांसह छबिना मिरवणूक निघणार आहे.

****

बीड तालुक्यात कपिलधारवाडी इथल्या भूस्खलनाच्या गंभीर परिस्थितीबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी काल पवार यांची भेट घेऊन, या समस्येकडे लक्ष वेधलं.

दरम्यान, बीड शहराजवळील कामखेडा इथं प्रस्तावित विमानतळाच्या जागेची काल भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि राज्य विमानतळ विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.

****

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या आपदग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी, आमदार राजेश विटेकर आणि आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. काल त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला असून, त्यात या पॅकेजची विशेष बाब म्हणून नोंद घेऊन शिफारस करावी असं विटेकर यांनी म्हटलं आहे.

****

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपार्इ मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. अतिवृष्टीच्या अनुषंगाने राज्य सरकार तसंच प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर त्यांनी यावेळी टीका केली...

बाईट- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

 

दरम्यान, पक्षाच्या वतीनं नुकसान भरपाईच्या मागणीसाठी काल जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं आंदोलन करण्यात आलं. 

****

अनुसूचित जमाती प्रवर्गात इतर कोणत्याही जातींचा समावेश करू नये या मागणीसाठी नांदेडमध्ये काल आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या नवा मोंढा मैदानातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.

****

मैदानी स्पर्धांमुळे खेळाडूंची निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो, असं मत नांदेडच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी व्यक्त केलं आहे. विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते.

****

जालना जिल्ह्यात महाकाळा फाट्याजवळ कंटेनर आणि दोन दुचाकींच्या अपघातात तीघांना मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गावर काल सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

****

परभणी शहर आणि परिसरात काल पहाटे मुसळधार पाऊस झाला. परभणीत एकाच दिवसात तब्बल ९८ पूर्णांक दोन दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं दिली आहे. 

****

.

No comments:

Post a Comment