Friday, 3 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारांना कराचं अग्रीम हस्तांतरण करण्यात आलं असून, त्यापैकी महाराष्ट्राला सहा हजार ४१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण १० ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. सणासुदीच्या हंगामासाठी, राज्याच्या भांडवली खर्चासाठी तसंच कल्याणकारी आणि विकास योजनांसाठी या निधीचा उपयोग होणार आहे.

****

विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा विकास दर आठ टक्के गाठण्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भर दिला आहे. आज नवी दिल्ली इथं कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सत्रात त्या बोलत होत्या. जागतिक अस्थिरतेमध्ये देशांतर्गत घटकांमुळे देशाचा विकास दर मजबूत राहिला असून, जागतिक चढउतारांना तोंड देण्याची देशाची पुरेशी क्षमता असल्याचं त्या म्हणाल्या. भारतीय अर्थव्यवस्था लवचिक आहे आणि ती सतत वाढत आहे. जागतिक स्तरावर भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक संस्थांना सुधारणांची आवश्यकता असल्याचंही सीतारामन यांनी नमूद केलं.

****

नाविन्य निर्मीतीतल्या भारताच्या कामगिरीचं मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलं आहे. सिएटलमध्ये भारतीय महावाणिज्य दूतावास आणि गेट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात ते काल संबोधित करत होते. भारताने विकसित केलेल्या उपाययोजनांमुळे ग्लोबल साऊथ राष्ट्रातल्या लाखो लोकांचं जीवन बदलवण्याची क्षमता आहे, असं गेट्स यांनी म्हटलं आहे. भारताच्या विकसीत भारत २०४७ या उद्दिष्टाच्या प्रवासात त्यांनी भारतासोबत भागीदारी सुरू ठेवण्याची आशा व्यक्त केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' ला आज ११ वर्षे पूर्ण झाली. 'मन की बात' चा पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या निमित्ताने प्रसारित झाला होता. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या १२६ व्या भागात देशाला संबोधित केलं. हा कार्यक्रम केवळ एक रेडिओ कार्यक्रम नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक बदलाचं प्रतीक असून, तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. हा कार्यक्रम सरकार आणि नागरिकांमध्ये थेट संवाद स्थापित करतो, सामाजिक बदलांना प्रेरणा देतो आणि राष्ट्रीय एकता मजबूत करतो. 'मन की बात' ने धोरणांचं केवळ जनआंदोलनांमध्ये रूपांतर केलं नाही, तर नेत्याचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचू शकतो हे देखील दाखवून दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपीसोबत साखरेची एमएसपी जोडल्यास साखर उद्योगाला स्थैर्य येईल आणि शेतकऱ्यांना अधिक दर देता येईल असं मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर इथं व्यक्त केलं. मुंबईमध्ये नुकत्याच मंत्री समितीच्या बैठकीत साखर उद्योगासंदर्भातील विविध प्रश्नांवर झालेल्या चर्चेची त्यांनी माहिती दिली. ऊसाची एफआरपीची रक्कम गेल्या सहा वर्षापासून वाढत्या उत्पादन खर्चामुळे प्रति टन सुमारे ६५० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्या तुलनेत साखरेच्या किमान विक्री दरामध्ये वाढ करण्यासाठी एफआरपी आणि एमएसपी यांना जोडणं आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनानं केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असं मंत्री समितीच्या बैठकीत ठरल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

****

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” निमित्त पालघर जिल्ह्यातल्या कंचाड जिल्हा परिषद शाळेत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कंचाड इथं आदी कर्मयोगी सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. त्यासोबतच पात्र कुटुंबांना अतिक्रमित रहिवासी जागांचं हक्कपत्र वाटप, शाळा तिथे दाखला अभियानांतर्गत प्रातिनिधिक दाखल्यांचं वाटप, नवीन घरकुल बांधकाम आणि रस्ते सीमांकनाची पाहणी, पीएम जनमन योजनेअंतर्गत कातकरी बांधवांच्या घरकुल गृहप्रवेशास उपस्थित राहून कातकरी स्नेहसंवाद यासारखे कार्यक्रम पार पडले. यावेळी मान्यवरांनी हमरापूर मध्ये समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बचत गटांच्या विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट दिली.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान अहमदाबाद इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या डावात चार बाद २६६ धावा झाल्या होत्या. दोन बाद १२१ धावांपासून भारताने आज पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. काल या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर संपुष्टात आला होता. भारत सध्या १०४ धावांनी आघाडीवर आहे.

****

नवी दिल्लीत सुरु असलेल्या १२व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताने आणखी दोन पदकांची कमाई केली. त्यामुळे चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. काल धरमबीर नैन यानं पुरुषांच्या एफ 51 क्लब थ्रो मध्ये रौपध पदक जिंकलं. तर एफ 57 प्रकारात अतुल कौशिकनं कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत जवळपास १०४ देशांमधले दोन हजारांहून अधिक ॲथलिट १८६ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत.

****

No comments:

Post a Comment