Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 04 October 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
नवी दिल्ली इथं ६२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध युवा उपक्रमांचा शुभारंभ
केला. या युवा-केंद्रित उपक्रमांमुळे देशात शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला चालना मिळणार आहे. विज्ञान
भवन इथं आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था
-आयटीआयद्वारे प्रधानमंत्री कौशल्य आणि रोजगार परिवर्तन पीएम-सेतू सुरू केला आहे. ही
केंद्र पुरस्कृत योजना असून यामध्ये ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. देशभरातील
१ हजार सरकारी आयटीआयना अद्यावत करणं हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.
****
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला इस्राईल आणि हमास दरम्यान युद्धविराम व्हावा
यासाठी एक २० सूत्रीय योजनेचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर या संघर्षाला नवीन वळण
मिळालं असून गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती
होत आहे. या पार्श्वभूमीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचं
स्वागत केलं आहे. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे सध्या सुरू असलेल्या मानवतावादी आणि
राजनैतिक प्रयत्नांतील एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. “या प्रदेशात शाश्वत आणि
न्याय्य शांततेसाठी योगदान देणाऱ्या सर्व उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर
भारत दृढ आहे,” याचा पंतप्रधानांनी आपल्या एक्स या प्रसार माध्यमावरील
संदेशाद्वारे पुनरुच्चार केला आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
उपस्थितीत मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात अनुकंपा तत्वारील गट क, गट ड मधील तसंच राज्य लोकसेवा आयोगातर्फे
सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या एकूण दहा हजारांवर उमेदवारांना नियुक्तीपत्रं वितरीत
केली जात आहेत.
संस्थात्मकदृष्ट्या प्रशासनाला बळकट
केलं तरच प्रशासन गतीशील, संवेदनशील
आणि लोकाभिमुख होऊ शकतं या दृष्टीनं अनुकंपा तत्वावरील शासन निर्णयात सुधारणा केल्याचं
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. अनुकंपा तत्वावरील पात्र पाल्य सरकारी कार्यालयं,
आमदार मंत्र्यांकडे नोकरीचा पाठपुरावा करत होते, हा मुद्दा लक्षात घेत सरकारची जबाबदारी ओळखून शासन निर्णयात बदल करुन क्लिष्ट
प्रक्रीया सोपी केल्याचं फडमवीस यांनी सांगितलं.
****
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही राज्याचे सामाजिक
न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत संत एकनाथ रंगमंदिरात
इथं आयोजित कार्यक्रमात २९६ जणांना नियुक्तीपत्र दिली जात आहेत.
****
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री
अमित शहा आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. शहा यांच्या उपस्थितीत आज आणि उद्या लोणी
तसंच कोपरगाव इथं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी
निवडणूक आयोग बिहारमधील १२ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत पाटणा इथं बैठक घेत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून त्यांच्या
नेतृत्वाखाली आयोगाचं एक पथक पाटणा इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. या पथकात निवडणूक
आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांचा समावेश आहे. राजकीय पक्षांच्या
प्रतिनिधींसोबतच्या बैठकीनंतर, आयोग प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठका घेईल.
****
जम्मू आणि काश्मीरमधील खराब हवामानामुळं, श्री माता वैष्णोदेवी यात्रा उद्यापासून
सात ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षितता आणि आरोग्याचा
विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही यात्रा आठ ऑक्टोबरपासून पुर्ववत होईल. या
काळात भाविकांना श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डानं त्यांच्या संकेतस्थळ आणि इतर
अधिकृत संवाद माध्यमांद्वारे जारी केलेल्या अधिकृत सूचना, मार्गदर्शक
तत्वांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
****
“शक्ती” चक्रीवादळामुळे तीन ते सात ऑक्टोबर
दरम्यान मराठवाड्यासह राज्यातल्या इतर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या काळात मराठवाड्याच्या काही भागांसह पूर्व विदर्भ आणि उत्तर कोकणात काही ठिकाणी सखल
भागात पूर येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनांनी आपत्ती प्रतिसाद यंत्रणा सज्ज आणि
सक्रीय ठेवावी, संवेदनशील किनारी आणि सखल भागात स्थलांतर योजनांचा
आढावा घ्यावा असा सल्ला ही हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना दिला आहे. मुंबई,
ठाणे, पालघर, रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये
उद्या पाच तारखेपर्यंत ४५ ते ६५ किलोमीटर प्रतितास या वेगानं वारे वाहतील, उत्तर महाराष्ट्रात समुद्र खवळलेला राहील, त्यामुळं मच्छिमारांनी
समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment