Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
संस्थात्मकदृष्ट्या बळकट
प्रशासनच गतीशील,
संवेदनशील आणि लोकाभिमुख होऊ शकतं-मुख्यमंत्र्यांचं
प्रतिपादन
·
अनुकंपाधारक तसंच राज्य
लोकसेवा आयोगाच्या सुमारे दहा हजारावर उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रं
प्रदान
·
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या
शांताराम यांच्या पार्थिव देहावर मुंबईत अंत्यसंस्कार
आणि
·
वेस्ट इंडीजला एक डाव आणि
१४० धावांनी पराभूत करत अहमदाबाद कसोटीत भारताचा विजय
****
संस्थात्मकदृष्ट्या बळकट प्रशासनच गतीशील, संवेदनशील
आणि लोकाभिमुख होऊ शकतं,
असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
आज मुंबईत,
अनुकंपा तत्वावरील गट क आणि गट ड मधल्या तसंच राज्य लोकसेवा
आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
अनुकंपा तत्वावरल्या ८० टक्के जागा भरल्या असून उरलेल्या जागा काही दिवसात भरल्या
जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले. प्रशासन बळकट करायला सरकारचं प्राधान्य असून, या
दृष्टीनं अनुकंपा तत्वावरील शासन निर्णयात सुधारणा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३०३ उमेदवारांना आज
समारंभपूर्वक सामाजिक न्याय मंत्री तसेच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते
नियुक्तीपत्र प्रदान केले. राज्यभरात आज एकाच दिवशी १० हजार ३०९ उमेदवारांना
नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. आपल्याला मिळालेली सरकारी नोकरी ही जनतेच्या
सेवेची संधी आहे,
असं मत व्यक्त करत, पालकमंत्री शिरसाट यांनी
नवनियुक्त उमेदवारांना या पदापेक्षा वरच्या पदांवर जाण्यासाठी प्रयत्न करण्याचा
सल्ला दिला –
बाईट - संजय शिरसाट,
पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर
हिंगोली जिल्ह्यात ७१ अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा
आयोगाचे ३८ अशा १०९ उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्यात आले. लातूर
जिल्ह्यात १७४ उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली. परभणी जिल्ह्यात
१३७, बीड जिल्ह्यात १०८ तर नांदेड जिल्ह्यातही अनुकंपा नियुक्त्यांसह राज्य लोकसेवा
आयोगाने शिफारस केलेल्या ३७८ उमेदवारांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली.
****
ओबीसींसह कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, प्रत्येक
समाजाला न्याय देण्यासाठी शासन प्रतिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज मुंबई इथं ओबीसी शिष्टमंडळासोबत बैठक झाली
त्यावेळी ते बोलत होते. मराठवाडा हा एकमेव प्रदेश होता, जिथे
इंग्रजांचं नव्हे,
तर निजामाचं राज्य होतं. त्यामुळे हैदराबाद गॅझेट ग्राह्य
धरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, सरकारनं
काढलेला हा शासन निर्णय रद्द करावा तसंच २०१४ पासून राज्यात दिले गेलेले
जातप्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी, या
प्रमुख मागण्या ओबीसी संघटनांनी केल्या. मात्र या दोन्ही मागण्यांबाबत सरकारकडून
सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे येत्या १० ऑक्टोबरला सकल ओबीसी समाजाचा
मोर्चा निघणार असल्याचं संघटनानी सांगितलं आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थींची
ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार योजनेतील
अविवाहित लाभार्थींना वडिलांची तर विवाहितांना त्यांच्या पतीची देखील ई- केवायसी
करावी लागणार आहे. यातून लाभार्थी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली
जाणार असून,
लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास, त्या महिलेचा लाभ बंद होईल.
लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील दोन कोटी ५९ लाख महिलांनी अर्ज केले आहेत.
****
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या पार्थिव देहावर
आज मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे
सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी यावेळी संध्या यांना श्रद्धांजली अर्पण
केली. संध्या यांचं काल निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. संध्या यांच्या
कारकिर्दीचा वेध घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत...
अमर भूपाळी या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या
विजया देशमुख उर्फ संध्या यांनी तीन बत्ती चार रास्ता, दो आंखे बाराह हाथ, नवरंग
जल बिन मछली नृत्यबिन बिजली, या
हिंदी चित्रपटांसोबत पिंजरा आणि चंदनाची चोळी अंग अंग जाळी असे मोजकेच चित्रपट
केले. या बहुतांश चित्रपटातल्या व्यक्तिरेखा चंदेरी पडद्यावर त्यांनी जिवंत
केल्या.
त्यांच्यावर चित्रीत झालेलं
हे गाणं अनेक शाळांचं प्रार्थना गीत झालं, तर नवरंग चित्रपटातल्या गाण्याशिवाय रंगपंचमीचा सण साजरा झाल्यासारखं वाटत
नाही.
फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या पिंजरा चित्रपटातली
संध्याबाईंनी साकारलेली चंद्रकला रसिकांच्या चीरकाल स्मरणात राहिल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संध्या यांच्या
निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
त्यांच्या निधनाने सिने जगताची मोठी हानी झाली असून, त्यांच्या
भूमिका अजरामर राहतील,
असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
नागपूर हे देशाच्या मध्यभागी असून नागपूरमधे देशाच्या हवाई
वाहतूक क्षेत्राचं केंद्र होण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतामधे हवाई वाहतूक क्षेत्राची भूमिका या
विषयावर नागपूरमधे इथं ते आज एका परिसंवादात बोलत होते. हवाई वाहतूक क्षेत्राच्या
सुरक्षिततेबद्दल कुठलीही तडजोड न करता या क्षेत्राला आत्मनिर्भर करावं असं आवाहन
गडकरी यांनी केलं.
****
भारतानं वेस्ट इंडिजविरूद्धच्या दोन कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना एक डाव आणि १४० धावांनी जिंकून
मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. भारतानं आज तिसऱ्या दिवशीच वेस्ट इंडिजचा
पराभव केला. आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारतानं आपला पहिला डाव ५ बाद
४४८ धावांवर घोषित केला. त्यावेळी भारताकडे २८६ धावांची आघाडी होती. त्यांनतर
फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजच्या अलिक अथानाझे याच्या ३८ धावा वगळता इतर कोणताही
खेळाडू आपली चमक दाखवू शकला नाही. १४६ धावांवर पाहुणा संघ बाद झाला. रविंद्र
जडेजानं चार,
मोहम्मद सिराजनं तीन, कुलदीप यादवने दोन, तर
वॉशिंग्टन सुंदरनं एक गडी बाद केला.
****
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज
करण्यात आली. एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वातल्या संघात रोहित शर्मा
तसंच विराट कोहलीचा समावेश करण्यात आला आहे. टी ट्वेंटी संघाचं कर्णधारपद
सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलं आहे.
१९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान, तीन एकदिवसीय सामने
तर २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत पाच टी ट्वेंटी सामने होणार आहेत.
****
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना पारंपरिक
प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर उद्या होणार आहे. श्रीलंकेतल्या कोलंबो इथल्या आर
प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पाकिस्तान बरोबर आतापर्यंत
झालेल्या सर्व प्रकारच्या सामन्यांमध्ये भारतानं २७ पैकी २४ सामन्यांमध्ये विजय
मिळवला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ हॉकी खेळाडू लक्ष्मीनारायण
गारोल यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गारोल यांनी ‘राईट
इन’ या स्थानावरून जिल्हा तसंच राज्य संघात पाच वेळा प्रतिनिधित्व केलं होतं. मेजर
ध्यानचंद यांनीही गारोल यांच्या उत्कृष्ट खेळाचे कौतुक केले होते. निवृत्तीनंतरही
ते हॉकी संघटनांमध्ये सक्रिय होते. गारोल यांच्या निधनाने राज्याच्या हॉकी विश्वात
मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
****
“शक्ती” चक्रीवादळामुळे तीन ते सात ऑक्टोबर
दरम्यान मराठवाड्यासह राज्यातल्या इतर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला
आहे.
****
No comments:
Post a Comment