Saturday, 4 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑक्टोबर २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं तरुणांसाठीच्या ६२ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतासंबंधीत योजना आणि उपक्रमांचं उद्घघाटन करतील. विज्ञान भवन इथं थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरु होईल.

***

२०१४ मध्ये ६०० कोटी रुपये असलेली भारताची संरक्षण निर्यात आज २४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असून २०२९ पर्यंत संरक्षण क्षेत्रातील निर्यात ५० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. हैदराबाद इथं एका कार्यक्रमात काल ते बोलत होते. तेजस लढाऊ विमानांपासून ते आकाश क्षेपणास्त्रं आणि अर्जुन टँकपर्यंत, आपल्या सशस्त्र दलांना मेड-इन-इंडिया उत्पादनांनी सुसज्ज केलं जात असल्याचं ते म्हणाले.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून ६४ टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह ९७ हलकी लढाऊ विमानं खरेदी करण्याचा अलिकडचा करार हे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचं द्योतक आहे. भारत आज खेळण्यांपासून टँक्सपर्यंत सर्व वस्तूंची निर्मिती करत आहे आणि लवकरच भारत जगाची फॅक्टरी अर्थात उत्पादन केंद्र बनेल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

***

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला, लोकनेते दि. बा. पाटील, पुणे विमानतळाला जगद्गगुरु संत तुकाराम तर छत्रपती संभाजीनगर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार असून लवकरच या विमानतळांचा नामविस्तार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं आहे. तिन्ही प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असून राज्य शासनाच्या मागणीनुसार तसंच नवीन धोरणानुसार नामविस्तारांना लवकरच मान्यता मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

***

नंदुरबार इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं "जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार" असं  नामांतर करण्यात आलं आहे. आदिवासी समाजानं ही मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतर वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या कालच्या शासन निर्णयान्वये या नामांतरास मान्यता देण्यात आली.

***

राज्यसरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावं, वीज बिलाची थकबाकी माफ करावी आणि खरवडून गेलेल्या शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षानं काल राज्यभर तीव्र आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगरसह जालना, लातूर , अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, रत्नागिरी, चंद्रपूर तसंच राज्यातील इतर जिल्ह्यात आणि तालुकास्तरावरही आंदोलन करून शेतकरी विरोधी भाजप-महायुती सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आलं.

***

ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि कॅश ऑन डिलिव्हरीसाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या ई-कॉमर्स संकेतस्थळांवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलं आहे. समाज माध्यमावर एका वापरकर्त्यानं ई-कॉमर्स संकेतस्थळ विविध पद्धतीनं छुपी शुल्कं आकारतं, याविषयी तक्रार मांडली होती.  त्यात अन्नपदार्थांचं वितरण करणाऱ्या अॅप्लिकेशनकडून आकारल्या जाणाऱ्या, पावसामुळं विलंब झाल्याच्या शुल्काचाही समावेश होता. या विरोधात ग्राहक संरक्षण विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याची सविस्तर चौकशीही सुरू झाल्याचं मंत्री जोशी म्हणाले.

***

आयात निर्यात व्यवसायासाठी ई बॉण्ड प्रणाली सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. यामुळे व्यापार प्रक्रिया सुलभ होणं, गतीशील व्यवहार यांबरोबरच व्यावसायिक कामकाजातील पारदर्शकता वृद्धिंगत होणार आहे. डिजीटल बॉण्ड प्रणाली स्वीकार करणारं महाराष्ट्र हे देशातील सोळावं राज्य ठरलं असून, व्यापार प्रशासनाच्या आधुनिकीकरणातील हे एक मोठं पाऊल आहे.

***

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या ३१ हजार ५४१ दशलक्ष घनफूट प्रति सेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे तर ४७ हजार १६० दधलक्ष घनफूट प्रति सेकंद या वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

***

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या कोलंबो इथं भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय संघाचं पाकिस्तानविरुद्धच्या  एकदिवसीय सामन्यात ११-० असं रेकॉर्ड आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा ७ खेळाडू राखत पराभव केला आहे.

***

No comments:

Post a Comment