Sunday, 5 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      संस्थात्मकदृष्ट्या बळकट प्रशासनच गतीशील, संवेदनशील आणि लोकाभिमुख होऊ शकतं-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      अनुकंपाधारक तसंच राज्य लोकसेवा आयोगाच्या सुमारे दहा हजारावर उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रं प्रदान

·      ओबीसींसह कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही - ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासान

·      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थींची ई-केवायसी बंधनकारक

·      ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या पार्थिव देहावर मुंबईत अंत्यसंस्कार

आणि

·      वेस्ट इंडीजला एक डाव आणि १४० धावांनी पराभूत करत अहमदाबाद कसोटीत भारताचा विजय

****

संस्थात्मकदृष्ट्या बळकट प्रशासनच गतीशील, संवेदनशील आणि लोकाभिमुख होऊ शकतं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल मुंबईत, अनुकंपा तत्वावरील गट क आणि गट ड मधल्या तसंच राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. अनुकंपा तत्वावरल्या ८० टक्के जागा भरल्या असून, उरलेल्या जागा काही दिवसात भरल्या जातील असंही ते म्हणाले. प्रशासन बळकट करायला सरकारचं प्राधान्य असून, या दृष्टीनं अनुकंपा तत्वावरील शासन निर्णयात सुधारणा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बाइट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ३०३ उमेदवारांना सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आपल्याला मिळालेली सरकारी नोकरी ही जनतेच्या सेवेची संधी असून, उमेदवारांनी या पदापेक्षा वरच्या पदांवर जाण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

हिंगोली इथं १०९ उमेदवारांना, लातूर इथं १७४, परभणी १३७, बीड १०८ तर नांदेड इथं ३७८ उमेदवारांना काल नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत अधिक माहिती दिली...

बाइट - राहुल कर्डिले (जिल्हाधिकारी नांदेड)

****

ओबीसींसह कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन प्रतिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल मुंबई इथं ओबीसी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठवाडा हा एकमेव प्रदेश होता, जिथे इंग्रजांचं नव्हे, तर निजामाचं राज्य होतं. त्यामुळे हैदराबाद गॅझेट ग्राह्य धरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, सरकारनं काढलेला हा शासन निर्णय रद्द करावा तसंच २०१४ पासून राज्यात दिले गेलेले जातप्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी, या प्रमुख मागण्या ओबीसी संघटनांनी केल्या. मात्र या दोन्ही मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे येत्या १० ऑक्टोबरला सकल ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार असल्याचं संघटनानी सांगितलं आहे.

**

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरलं जाईल, असं महसूलमंत्री आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्याचबरोबर, राज्यातली पूरस्थिती लक्षात घेता १० ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा मागे घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी ओबीसी शिष्टमंडळाला केल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थींची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार योजनेतल्या अविवाहित लाभार्थींना वडिलांची तर विवाहितांना त्यांच्या पतीची देखील ई- केवायसी करावी लागणार आहे. यातून लाभार्थी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार असून, लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचं उत्पन्न वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास, त्या महिलेचा लाभ बंद होईल. लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातल्या दोन कोटी ५९ लाख महिलांनी अर्ज केले आहेत.

****

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी संध्या यांना श्रद्धांजली अर्पण केली. संध्या यांचं परवा निधन झालं, त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत...

‘‘अमर भूपाळी या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या विजया देशमुख उर्फ संध्या यांनी तीन बत्ती चार रास्ता, दो आंखे बाराह हाथ, नवरंग, जल बिन मछली नृत्यबिन बिजली, या हिंदी चित्रपटांसोबत पिंजरा आणि चंदनाची चोळी अंग अंग जाळी असे मोजकेच चित्रपट केले. या बहुतांश चित्रपटातल्या व्यक्तिरेखा चंदेरी पडद्यावर त्यांनी जिवंत केल्या. 

त्यांच्यावर चित्रीत हे गाणं अनेक शाळांचं प्रार्थना गीत झालं, तर नवरंग चित्रपटातल्या या गाण्याशिवाय रंगपंचमीचा सण साजरा झाल्यासारखं वाटत नाही...

फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या पिंजरा चित्रपटातली संध्याबाईंनी साकारलेली चंद्रकला रसिकांच्या चीरकाल स्मरणात राहिल...’’

****

भारतानं वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला अहमदाबाद इथला पहिला सामना एक डाव आणि १४० धावांनी जिंकून मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. भारतानं काल तिसऱ्या दिवशी आपला पहिला डाव ५ बाद ४४८ धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजच्या अलिक अथानाझे याच्या ३८ धावा वगळता इतर कोणताही खेळाडू खेळपट्टीवर टिकू शकला नाही. दुसऱ्या डावात अवघ्या १४६ धावांवर पाहुणा संघ बाद झाला. रविंद्र जडेजानं चार, मोहम्मद सिराजनं तीन, कुलदीप यादवने दोन, तर वॉशिंग्टन सुंदरनं एक गडी बाद केला.

****

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. श्रीलंकेतल्या कोलंबो इथं भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

****

छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ हॉकी खेळाडू लक्ष्मीनारायण गारोल यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. गारोल यांनी ‘राईट इन’ या स्थानावरून जिल्हा तसंच राज्य संघात पाच वेळा प्रतिनिधित्व केलं होतं. मेजर ध्यानचंद यांनीही गारोल यांच्या उत्कृष्ट खेळाचं कौतुक केलं होतं. गारोल यांच्या निधनाने राज्याच्या हॉकी विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

****

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पंचनामे संवेदनशीलपणे करावेत, तसंच यापूर्वी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यालाही प्राधान्य द्यावं, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भोसले यांनी काल रेणापूर तालुक्यातल्या हरवाडी आणि लातूर तालुक्यातल्या महापूर इथं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर - पैठण रस्त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेट्टी यांनी पैठण तालुक्यात अनेक गावात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. राज्य सरकारने उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेल्या प्रतिटन १५ रुपये कपातीच्या निर्णयावर त्यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाचे १८ दरवाजे दीड फुटापर्यंत स्थीर करुन २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, मांजरा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून, सध्या धरणातून आठ हजार ७३५ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे.

****

हवामान

राज्यात आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मराठवाड्यात जोरदार वाऱ्यांसह काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment