Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 06 October 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. २४३ सदस्यीय बिहार विधानसभेचा
कार्यकाळ २२ नोव्हेंबरला संपणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा आठ
तारखेला नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. येत्या डिसेंबर पासून
या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र शहरी आणि औद्योगिक विकास महामंडळाचे
उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली. विमानतळाला ३०
सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मिळाला आहे.
****
देशामध्ये यंदा सुमारे ३५० लाख मेट्रिक
टन साखर उत्पादन होईल असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ - इस्मा यांनी
केंद्र सरकारला दिला आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा साधारण २५ ते ३० लाख मेट्रिक
टनाने जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आगामी हंगामामध्ये जादा उत्पादित होणाऱ्या साखरेची निर्यात करण्यास परवानगी द्यावी,
अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन
पाटील यांनी केली आहे.
****
जयपूर इथल्या सवाई मानसिंग रुग्णालयाच्या
ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये काल रात्री उशिरा लागलेल्या आगीत सात रुग्णांचा मृत्यू
झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना
घडल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ट्रॉमा सेंटरमधली आग अत्यंत दुर्दैवी
असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. स्थानिक प्रशासन रुग्णांची
सुरक्षा, उपचार
आणि प्रभावित लोकांची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं शहा यांनी म्हटलं
आहे.
आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनीही
या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याशी बोलून आरोग्य
सुविधा आणि मदत कार्यांबद्दल विचारपूस केली.
****
मध्यस्थीच्या माध्यमातून जास्तीत
जास्त प्रकरणं निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असं आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश
आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्ष रेवती मोहिते - डेरे
यांनी केलं. पुण्यात आयोजित विभागीय मध्यस्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत
होत्या. मध्यस्थी ही केवळ प्रक्रिया नसून ते न्यायाचं तत्वज्ञान आहे, वाद निवारणाला मानवी चेहरा देण्याचं काम यातून होत असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात
शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला.
मृतांमध्ये एक विद्यार्थी दहावीचा तर दोन विद्यार्थी बारावी वर्गात शिकत होते. काल
दिवसभरानंतरही ते घरी न पोहोचल्याने पालकांनी त्यांचा शोध घेतला, याचदरम्यान गावातल्या एका गुराख्याला तलावात त्यांचे मृतदेह आढळले. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार
संजय पुराम यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करुन, या विद्यार्थ्यांच्या
कुटुंबियांना शासन स्तरावर शक्य ती मदत दिली जाईल, असं आश्वासन
दिलं.
****
बीडसह जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या
अध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत परवा आठ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. सोडत जाहीर झाल्यानंतर
९ ते १४ ऑक्टोबर दरम्यान त्यासंदर्भात हरकती आणि सूचना सादर करता येतील, असं बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश
पडसे यांनी अधिसूचनेद्वारे सांगितलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या
पदवीधर मतदार नोंदणीबाबत आमदार सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी आमदार अमरसिंह पंडित
यांनी आढावा घेतला. गेल्या एक ऑक्टोबरपासून छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघातील
मतदार नोंदणी अभियान सुरु आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या मसलगा सिंचन
प्रकल्पाची त्वरित दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी
दिले आहेत. प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करून याबाबतचा प्रस्ताव
लवकरात लवकर सादर करावा, असे
निर्देश भोसले यांनी प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पाटबंधारे विभागाला दिले आहेत.
****
परभणी शहरासह परिसरात आज पहाटे मुसळधार
पाऊस झाला. या पावसाने सखल भाग पूर्णतः जलमय झाला. ठिकठिकाणी नागरिकांनी महानगरपालिका, अग्निशामक दल, आणि पोलीस प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा
व्यक्त केली.
लातूर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी
काल पुन्हा पाऊस झाला. लातूर तालुक्यात मुरुड परिसरात काल दुपारच्या सुमारास मुसळधार
पाऊस पडला असून, शेती
पिकांचं मोठं नुकसान झालं.
धाराशिव जिल्ह्यातही पाच दिवसांच्या
खंडानंतर पुन्हा जोरदार पाऊस झाला. कळंब, भूम, धाराशिव आणि वाशी
तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
नांदेड जिल्ह्यातही पहाटेपासून मुसळधार
पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भ विभागात उद्यापर्यंत
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
****
विभागात अनेक ठिकाणी पाऊस पुन्हा
सुरु झाल्यानं धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून नऊ हजार
४३२, माजलगाव
धरणातून दहा हजार २५, येलदरी धरणातून सहा हजार ९२०, तर उर्ध्व मानार प्रकल्पातून चार हजार ८५९ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment