Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 October 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
निवडणूक आयोग आज बिहार विधानसभा निवडणुकीचा
कार्यक्रम जाहिर करणार आहे. २४३ सदस्यीय बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबरला
संपणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा आठ तारखेला
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. येत्या डिसेंबर पासून या
विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र शहरी आणि औद्योगिक विकास महामंडळाचे
उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली. विमानतळाला ३०
सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मिळाला आहे.
****
प्रगत शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञानाधारित
संपर्करहित युद्धांच्या नव्या युगाकडे लक्ष वेधताना अलीकडच्या काळात युद्धाच्या स्वरुपात
मूलभूत बदल झाल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं.
दिल्ली आयोजित कौटिल्य आर्थिक परिषदेत ते काल बोलत होते. अलीकडच्या गुंतागुंतीच्या
वातावरणात भारताच्या स्थानाबद्दल बोलताना, देशाची ताकद ही अंतर्गत क्षमता बांधणीमध्ये असल्याचं ते
म्हणाले. परस्पर संबंधांना विशेष स्थान न देताही जागतिक भागीदारांशी रचानात्मक संवाद
साधत, धोरणात्मक स्वायत्तता सुनिश्चित करणं
आणि उत्पादक संबंध राखणं या दृष्टीकोनावर भारताचा भर असेल असं जयशंकर यांनी सांगितलं.
****
कफ सिरपमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानात
बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने
कोल्र्डिफ सिरप नावाचं औषध विकणे, वितरीत करण्यावर तत्काळ
बंदी घातली आहे. या कफ सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल नावाचा विषारी घटक भेसळ करण्यात
आल्याचा आरोप आहे. या औषधाच्या एस आर 13 या बॅचचा वापर करण्यास
बंदी घालण्यात आली असून, या औषधाचा साठा स्थानिक
औषद नियंत्रण प्राधिकरणाकडे जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत
वापरावर केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत राज्यं आणि केंद्रशासित
प्रदेशांच्या आरोग्य तसंच मुख्य सचिवांची बैठक झाली. सर्व औषध उत्पादकांनी सुधारित
शेड्युल ‘एम’ चं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य सचिवांनी या बैठकीत अधोरेखित
केलं. नियमांचे पालन न करणाऱ्या युनिट्सचे परवाने रद्द करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यांना
विशेषतः मुलांमध्ये कफ सिरपचा तर्कसंगत वापर करायचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना
अटी शर्तीचा विचार न करता राज्य शासन मदत देईल त्याचप्रमाणे कांदा उत्पादकांचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांनाही योग्य ती भरपाई दिली जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी सांगितलं. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक इथं शिवसेनेच्या
बुथ प्रमुखांचा मेळावा काल शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला, त्यानंतर ते बोलत होते. राज्यात स्थानिक
स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीच विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आरोग्य शिबिरं घेतली जात असून, विविध प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक
उपाययोजना करण्यात येत आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी एक कोटी रुपयांची
तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार नऊ आरोग्य
शिबिरं, तसंच साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना
करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत कोणत्याही भागामध्ये साथरोगजन्य परिस्थिती नसल्याचं
आरोग्य विभागानं कळवलं आहे.
****
विभागात अनेक ठिकाणी पाऊस पुन्हा
सुरु झाल्यानं धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून नऊ हजार
४३२, माजलगाव धरणातून दहा हजार २५, येलदरी धरणातून सहा हजार ९२०, तर उर्ध्व मानार प्रकल्पातून चार
हजार ८५९ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
मराठवाडा पदवीधर मतदार संघ मतदार
नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदारांना येत्या सहा नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदवता येतील.
मतदार हा मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातला कोणत्याही वयाचा, कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि रहिवासी
असावा. तर, एक नोव्हेंबर २०२२ पूर्वीचा तो पदवीधर
असावा. तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतदार अर्ज जमा करता येतील.
****
अबू धाबी इथं सुरू असलेल्या अल ऐन
मास्टर्स २०२५ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची उदयोन्मुख महिला बॅडमिंटनपटू श्रियान्शी वलिशेट्टी
हिनं महिला एकेरीचं, तर हरिहरन अम्साकरुणन
आणि अर्जुन मादथिल रामचंद्रन जोडीनं, पुरुष दुहेरीचं विजेतेपद
पटकावलं आहे. अंतिम फेरीत श्रियान्शीनं भारताच्याच तसनीम हिचा १५-२१, २२-२०,२२-२० असा तीन गेम्समध्ये पराभव केला.
****
दिव्यांगांच्या जागतिक अॅथलेटिक्स
अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सिमरन शर्मानं काल महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या टी-12 प्रकारात कांस्य पदक पटकावलं. तिनं
२४ पूर्णांक ४६ सेकंदांत धाव पूर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला. कोलंबियाच्या पेरेझ लोपेझ
आणि ब्राझीलच्या बारोस दा सिल्वा यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकं पटकावली. भारताची
एकूण पदकसंख्या आता १९ झाली आहे.
****
No comments:
Post a Comment