Tuesday, 7 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑक्टोबर २०२ सकाळी .०० वाजता

****

सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा प्रारंभ आजपासून मुंबईत होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक जगासाठी वित्तीय उपलब्धता ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर येत्या गुरुवारी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांशी ते संवादही साधणार आहेत.

****

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज विविध राजकीय पक्षांच्या राज्यसभेतल्या नेत्यांना भेटणार आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून राज्यसभा खासदारांबरोबरची त्यांची ही पहिली औपचारिक बैठक आहे. पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे.

****

राज्य शासनाचा कृषी विभाग आणि एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन, तसंच ग्रामविकास विभाग आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाले. पारंपरिक आणि स्थानिक भरड धान्यांच्या उत्पादन आणि प्रक्रिया शेती उद्योगांना प्रोत्साहन देणं, राज्यातल्या १० आकांक्षित तालुक्यांमधल्या ६३ ग्रामपंचायतींमध्ये हा एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रम राबवणं हे या कराराचं उद्दिष्ट आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्याचा इतिहास सर्वांपुढे यावा यासाठी तंजावर इथं मराठी भाषा भवन उभारणार असून, दोन दिवसीय उपक्रम सुरू करणार असल्याचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. नागपूर इथल्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार सामंत यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अमराठी माणसांना मराठी भाषा शिकायची असल्यास ॲप तयार करण्यात येणार असून, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती स्थापन करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

****

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात काल अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या ११ भाषांच्या प्रतिनिधींच्या परिषदेला सुरूवात झाली. या कार्यक्रमात बोलताना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, अडीच हजार वर्षांचा इतिहास लाभलेल्या मराठी भाषेत संशोधन होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं.

****

नाशिक जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं बाहेरून येणाऱ्या भाविकांकडून वसुल करण्यात येणारी प्रवेश फी रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. देशभरातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी येतात. काही वर्षांपासून वाहनांकडून प्रवेश फ़ी आकारली जात होती आणि यासाठी निविदेद्वारे ठेकेदार नेमण्यात आला होता. मात्र, या कर्मचाऱ्यांकडून भाविकांशी अरेरावी आणि गुंडगिरीच्या तक्रारी वाढत होत्या, या घटनांमुळे  उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेत प्रवेश फ़ी रद्द करण्याचे आदेश दिले.

****

मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिकमध्ये चित्रनगरी उभारायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. या चित्रनगरीसाठी प्रस्तावित असलेला नाशिक जिल्ह्यातला इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुसंपन्न आणि सुंदर आहे. इगतपुरी ते मुंबई अंतरसुद्धा आता लक्षणीयरित्या कमी झालं आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात मौजे मुंढेगाव इथं चित्रनगरी उभारणं उचित ठरेल, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्यातल्या १६ पंचायत समितींच्या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत येत्या १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर लातूर जिल्ह्यात उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाची आरक्षण सोडत उद्या काढण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरु असल्यानं या मार्गावरील वाहतुक येत्या १८ तारखेपर्यंत दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहनं कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी एन्ड्युरन्स कंपनीजवळून- शेकटा फाटा मार्गाने वळवण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे त्रिधारा वाडी, मुरंबा, वांगी शिवारात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढ्यांना नद्यांचं रूप आल्याने सर्व परिसर जलमय झाला. वांगी, मुरंबा, त्रिधारा वाडी भागातल्या काही प्रमाणात पाणी ओसरत आहे. मात्र शेती पिकांचं नुकसान झालं तर पुरात शेतातली माती खरडून गेली. झिरोफाटा - पूर्णा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

****

जागतिक पॅरा ऍथलिटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण पदकासह २२ पदकं जिंकली आहेत. या स्पर्धेत शंभर देशातल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 

No comments:

Post a Comment