Wednesday, 8 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर

·      खरडलेल्या शेतीसाठी हेक्टरी साडे तीन लाख तर रबी हंगामासाठी हेक्टरी १० हजार रुपये मदत

·      मदत पॅकेज तुटपुंजे असल्याची विरोधकांची टीका-कर्जमाफीच्या मागणीचा पुनरुच्चार

·      कुणबी नोंदीसाठी ओबीसी प्रमाणपत्र वाटपाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

आणि

·      धाराशिवच्या समर्थ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे सहा महिन्यांसाठी निर्बंध

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून...

‘‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुंबई मेट्रो च्या तिसऱ्या टप्प्याचं तसंच मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व सार्वजनिक वाहतुक सेवेचं तिकीट देणाऱ्या ‘मुंबई वन’, या देशातल्या पहिल्या मोबिलिटी ॲपचं, लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नवयुगीन आणि पारंपारिक अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या तुकडीला पंतप्रधानांच्या हस्ते आजपासून प्रारंभ होणार आहे. हा उपक्रम राज्यातली चारशे तंत्रनिकेतन महाविद्यालयं तसंच दीडशे शासकीय तांत्रिक माध्यमिक विद्यालयांमधे राबवला जाणार आहे.’’

****

महाराष्ट्रासह चार राज्यांतल्या रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तथा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. यामध्ये राज्यातल्या गोंदिया-डोंगरगड या ८४ किलोमीटरच्या तसंच भुसावळ-वर्धा या ३१४ किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गांचा समावेश आहे. भुसावळ वर्धा प्रकल्पाबाबत अधिक माहिती देतांना वैष्णव म्हणाले...

बाईट - अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तथा रेल्वेमंत्री

****

फिनटेक कंपन्यांनी उत्पन्न वाढ, अभिनव उत्पादनं, जोखीम व्यवस्थापन या मूलभूत क्षेत्रावर भर द्यावा, असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या काल मुंबईत सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करताना बोलत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमतेत वाढ होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो, मात्र तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून नव्हे, तर थेट लाभ हस्तांतरण योजनेप्रमाणे, जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे असं सीतारामन यांनी नमूद केलं.

****

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या ६८ लाख ६९ हजार ७५३ हेक्टर पिकाचं नुकसान झालं आहे. या नुकसानापोटी २९ जिल्ह्यांच्या २५३ तालुक्यांतल्या दोन हजार ५९ मंडळांतल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. कोरडवाहू, हंगामी बागायती तसंच बागायती शेतकऱ्यांसाठीच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पायाभूत सुविधांसह विहिरी, घरं, दुकानं, गोठे, तसंच जनावरांच्या नुकसानापोटीही अर्थसहाय्य देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खरडून गेलेल्या जमिनीसाठी ४७ हजार रुपये प्रति हेक्टर नुकसानभरपाई, तर तीन लाख रुपये प्रति हेक्टर इतकी भरपाई मनरेगाच्या माध्यमातून देणार असून, दुष्काळाच्या तरतुदींनुसार कार्यवाही करण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. तीन हेक्टर मर्यादेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून, रबी हंगामासाठी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी दहा हजार रुपये मदत देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दिवाळीपूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

**

राज्य सरकारचं मदत पॅकेज ही दिलासादायक आणि वेळेवरची घोषणा असल्याचं मत भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले युवा शेतकरी यज्ञेश कातबने यांनी या पॅकेजबद्दल समाधान व्यक्त करत, सरकारचे आभार मानले...

बाईट - यज्ञेश कातबने, शेतकरी

**

ही मदत तुटपूंजी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी आणि कर्जमाफी करावी अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या दोन्ही मागण्यांसह पीक विम्याचे निकष शिथील करण्याची मागणी केली. आपल्या मागण्यांसाठी पक्षाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल इतरही अनेक निर्णय घेण्यात आले.

राज्याचं रत्नं तसंच दागिने धोरण, नागरी भागातील सांडपाणी प्रक्रिया धोरण, तसंच तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. व्हीजेएनटी प्रवर्गाच्या तसंच ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा आणि विद्यानिकेतन आश्रमशाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ९८० आश्रमशाळांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

****

कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सदर याचिकांवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं उत्तर द्यावं, असे आदेश मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं काल दिले.

****

रिझर्व्ह बँकेनं राज्यातल्या काही सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत. साताऱ्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असून, या बँकेच्या खातेधारकांना ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतील. सोलापूरची समर्थ सहकारी बँक आणि धाराशिव इथल्या समर्थ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवरही सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले असून, शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेवरच्या निर्बंधांची मुदत ८ जानेवारी २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मंडळाकडून ही माहिती देण्यात आली.

****

राज्यातल्या तीनही वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या प्रक्रियेच्या निषेधार्थ राज्यातले वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांनी उद्या एकदिवसीय संप पुकारला आहे. दरम्यान, धनगर समाजानं आपल्या मागण्यांसाठी काल बीड जिल्ह्यात गेवराई तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. परभणी इथं बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं निदर्शनं करण्यात आली.

****

मुंबईतल्या इंदू मिल इथं उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल आढावा घेतला. पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं, शिरसाट यांनी सांगितलं.

****

२०२७ मध्ये नाशिकला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं फेर सादरीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. सुमारे आठ हजार कोटी रुपयांच्या या आराखड्यात सर्वसमावेशक नियोजनावर भर देण्याची सूचना स्वामी यांनी केली.

****

तुळजापूर इथं अश्विन पौर्णिमेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी डिजिटल मल्टिमीडिया प्रदर्शन भरवण्यात आलं होतं, केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या विषयावरच्या या प्रदर्शनाला सुमारे दहा लाख भाविकांनी भेट दिली.

****

जालन्यात महावितरणच्या अत्याधुनिक स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून नऊ लाख रुपये वीजचोरीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ६६ ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

****

हवामान 

मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना हवामान विभागाने आज पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

****

No comments:

Post a Comment