Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
मानसिक
आरोग्यावर मोकळेपणाने बोलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त
·
प्रधानमंत्री
धन धान्य कृषी योजनेला उद्या प्रारंभ-पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन
·
वीज
कर्मचारी संघटनांनी पुकारलेला ७२ तासांचा संप मागे
·
नांदेड
जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापती पदाचं आरक्षण जाहीर
आणि
·
वेस्ट
इंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या ३१८ धावा
****
मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने
बोलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज जागतिक मानसिक
आरोग्य दिनी, समाज
माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी मानसिक आरोग्य हा सर्वांच्या
आरोग्याचा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात कार्यरत
असणाऱ्या सर्वांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे.
****
प्रधानमंत्री धन धान्य कृषी
योजनेला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रारंभ होणार
आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक योजना राबवून
पिकांची उत्पादकता वाढवणं, पीक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणं, तसंच काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि
पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या १०० जिल्ह्यांची निवड
केंद्र सरकारनं केली आहे. त्यात राज्यातल्या पालघर,
रायगड,
धुळे, छत्रपती
संभाजीनगर, बीड, नांदेड,
यवतमाळ,
चंद्रपूर,
गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड
झाली आहे. या योजनेची माहिती देतांना केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, कडधान्यांचं उत्पादन कमी असलेल्या
जिल्ह्यांचं उत्पादन सरासरीएवढं झालं तरीही,
ती या क्षेत्रात मोठी वाढ ठरेल, असं सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
देशात विविध ठिकाणी होणाऱ्या या
कार्यक्रमांत सहभागी शेतकरी दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. राज्यस्तरीय कार्यक्रम
पुण्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या
कार्यक्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील आणि प्रगतिशील कामगिरी करणारे ३०० हून अधिक
शेतकरी सहभागी होणार असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं.
दरम्यान,
सोलापूर इथं द्राक्ष
बागायतदारांच्या चर्चासत्राचं भरणे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. द्राक्ष बागायतदारांच्या सर्व मागण्याचा
शासनस्तरावर सकारात्मक विचार करून, त्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भरणे
यांनी सांगितलं.
****
नागपुरात जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी
स्पेन मधल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभारण्यात येणारे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ साठी निवडण्यात येणारी जागा सर्व
परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी,
अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केली. नागपूरचा इतिहास ‘कन्व्हेन्शन सेंटर’
ला भेट देणाऱ्या प्रत्येकाला
समजावा, अशा
पद्धतीने कन्व्हेन्शन सेंटरची अंतर्गत रचना असावी,
असं ते म्हणाले. मुंबई हे भारताचंच
नव्हे, तर
दक्षिण आशियाचं ‘पावर हाऊस’ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रसोबत काम करायला स्पेन उत्सुक
असल्याचं राजदूत जुआन अँटोनियो यांनी म्हटलं आहे.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज
छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसंच
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांचं स्वागत केलं. खासदार संदिपान भुमरे तसंच
आमदार विलास भुमरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी विमानतळावर उपस्थित होते. शिवसेना
पदाधिकारी मेळाव्याला उपमुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत, तर शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचं
शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
****
आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दोन
सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी संघटनांनी आज
नागपुरात महामोर्चा काढला. ओबीसी नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले.
संविधान चौकात एका सभेत हा मोर्चा विसर्जित झाला. सदर शासन निर्णय रद्द
केल्याशिवाय ओबीसी बांधव आता हटणार नाही, असा इशारा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी
दिला. सकल ओबीसी संघटनांनी आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केलं.
****
वीज कर्मचारी संघटनांनी आपला संप
मागे घेतला आहे. कालपासून सुरू झालेल्या या ७२ तासांच्या संपाविरोधात वीज महावितरण
कंपनीने मुंबई औद्योगिक न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या
सुनावणी दरम्यान संयुक्त कृती समितीने संपातून २४ तासानंतर माघार घेत असल्याचं
जाहीर केलं. महवितरणमधील २९ पैकी ७ संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आपल्या विविध
मागण्यांसाठी या ७२ तासांच्या संपाची नोटीस दिली होती. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीतले
जवळपास ३७ टक्के कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या १६ पंचायत
समितीच्या सभापती पदांची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोडतीत,
भोकर पंचायत समितीचं सभापती पद
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे. हिमायतनगर तसंच किनवट
अनुसूचित जाती, उमरी
अनुसूचित जमाती, मुदखेड
अनुसूचित जमाती महिला, नांदेड आणि हदगाव पंचायत समितीचं सभापती पद मागास
प्रवर्गासाठी तर नायगाव आणि लोहा सभापती पद मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला
आहे. देगलूर, मुखेड, बिलोली आणि धर्माबाद सर्वसाधारण
महिला प्रवर्गासाठी राखीव तर कंधार, अर्धापूर आणि माहूर सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी
राखीव झालं आहे.
दरम्यान,
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद
आणि पंचायत समिती आरक्षण सोडत येत्या सोमवारी काढण्यात येणार आहे.
****
यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार
व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये
नागरिकांच्या लोकशाही हक्कांचं रक्षण आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे देशाची वाटचाल
शांततेत व्हावी, यासाठी
त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नॉर्वेच्या नोबेल
समितीनं केली.
****
क्रिकेट
भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान
दुसरा आणि मालिकेतला अखेरचा कसोटी क्रिकेट सामना आजपासून सुरू झाला. दिल्लीत अरुण
जेटली क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने
पहिल्या दिवशी दोन गड्यांच्या बदल्यात ३१८ धावा केल्या. के एल राहुल ३८ तर साई
सुदर्शन ८७ धावांवर तंबूत परतले. आजचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी
जैस्वाल १७३ तर शुभमन गिल २० धावांवर खेळत होते.
****
मराठवाडा साहित्य परिषदेनं या
वर्षापासून बालवाङ्मयासाठी रघुनाथ शिवराम बोरसे हा विशेष पुरस्कार सुरू केला आहे.
पहिला पुरस्कार पुण्यातले पत्रकार संजय ऐलवाड यांच्या ‘झिब्राच्या कथा’ ह्या बाल कथासंग्रहाला जाहीर झाला
आहे. येत्या रविवारी १२ ऑक्टोबरला संध्याकाळी मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर
सभागृहात हा पुरस्कार ऐलवाड यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचं, मसापकडून सांगण्यात आलं आहे.
****
धाराशिव इथले ज्येष्ठ साहित्यिक
राजेंद्र अत्रे यांचा परवा रविवारी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जाहीर नागरी सत्कार
करण्यात येणार आहे. साहित्य भारती, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, कलाविष्कार अकादमी, आणि पर्यटन जनजागृती संस्था
यांच्या संयुक्त विद्यमाने व्यंकटेश महाजन महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात
अत्रे यांची ग्रंथतुला, गौरव ग्रंथाचं प्रकाशन तसंच त्यांच्या निवडक कवितांचं वाचन
केलं जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातील सर्व पात्र
पदवीधर मतदारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज भरून पदवीधर मतदार नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी महाइलेक्शन
डॉट जीओव्ही डॉट इन या लिंकचा वापर करावा तर ऑफलाईनसाठी फार्म नंबर १८ सह आवश्यक
कागदपत्रं तहसिल कार्यालयात स्विकारण्यात येतील.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सेवा
पंधरवड्यादरम्यान राबवण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी,
सशक्त परिवार अभियानाला’ नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
महिलांचं आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब,
समाज आणि देशाच्या प्रगतीचं
केंद्रस्थान मानून राबवलेल्या या राष्ट्रीय अभियानात महिलांचा सहभाग लक्षणीय
ठरल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment