Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 October 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या
टप्प्यासाठी अधिसूचना आज जारी करण्यात
आली. या टप्प्यात १२१ मतदारसंघात
सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू होईल
आणि १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अर्जांची छाननी १८ ऑक्टोबरला होईल तर अर्ज
मागे घेण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबर ही आहे. सुमारे साडे आठ लाख निवडणूक अधिकारी तैनात केले जाणार आहेत.
****
साहित्य निर्मितीसाठीचा नोबेल पुरस्कार
यंदा हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या काही पुस्तकांवर
चित्रपट तयार झाले आहेत. २०१५ मध्ये त्यांना मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला
होता.
****
‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत दीड हजारापेक्षा जास्त ठिकाणं
स्वच्छ केल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सांगितलं. या मोहिमेत स्वच्छता मोहिम, घरोघरी स्वच्छता, चित्रकला स्पर्धा, स्वच्छ रॅली आणि विविध सांस्कृतिक
कार्यक्रमांसारखे २ हजार ७६६ कार्यक्रम घेतले. त्यात ५९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी
भाग घेतला. २५ सप्टेंबरला ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ अंतर्गत विशेष कार्यक्रम, तर दोन ऑक्टोबरला स्वच्छ भारत दिवस
आयोजित केल्याचं मंत्रालयानं सांगितलं.
****
राज्याच्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीत
“स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णयप्रक्रिया
आणि जबाबदार अंमलबजावणी” हे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
म्हटलं आहे. मुंबईत काल ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये क्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी
कुणाल शाह यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. २०३० पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन
डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचं सरकारचं ध्येय असून, त्यासाठी ‘एमएमआर ग्रोथ हब इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून
मुंबई महानगर प्रदेशाला दीड ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान राज्यातल्या
सर्व क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवत असल्याचंही ते म्हणाले. राज्य सरकारने शेती क्षेत्रासाठी ५०० कोटी रुपयांचं
‘एआय मिशन’ हाती घेतलं असून, शेतकऱ्यांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत एआय चॅटबॉट
विकसित करण्यात आले आहेत. हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी
तंत्रज्ञानाचा उपयोग करून शाश्वत शेतीचा नवा मार्ग शोधला जात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या
सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी आजपासून वितरित केला जाणार
आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
****
राज्य शिक्षण मंडळासह इतर सर्व मंडळांच्या
शाळांमध्ये मराठी भाषेचं अध्ययन-अध्यापन आणि राज्यगीत गायन अनिवार्य करण्याचे निर्देश
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात
सूचना देण्यात आल्या. सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणपत्रिकेत मराठी
विषयाचा समावेश करण्यासाठी विविध मंडळांशी पत्रव्यवहार केला जाईल. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा
अभ्यासक्रम सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये असावा, असा सल्लाही त्यांनी दिला. शिक्षण हक्क अधिनियमातील प्रवेश
आणि इतर उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही भुसे यांनी दिले असून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये
सांस्कृतिक ओळख आणि भाषेची जाण वृद्धिंगत होईल.
****
नांदेड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची आरक्षण आणि लातूर
जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद तसंच पंचायत
समिती सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला होणार आहे. लातूरच्या आरक्षणाचे प्रारूप
१४ तारखेला प्रसिद्ध केले जाईल. प्रारुपासंदर्भातील
हरकती १४ ते १७ ऑक्टोबर दरम्यान दाखल करता येतील.
****
महिला तसंच बालकांच्या सर्वांगीण
विकासासाठी महिला आणि बालकांचे हक्क-कल्याण समिती कटिबद्ध असल्याचं समितीच्या प्रमुख
मोनिका राजळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल मुंबईत महिला कारागृह, सुधारगृह तसंच काही संस्थांना भेट
देऊन पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असा विश्वास समिती सदस्यांनी यावेळी
व्यक्त केला.
****
दिवाळीनिमित्त येत्या १५ ऑक्टोबर
ते ५ नोव्हेंबर दरम्यान पुणे विभागातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या ५९८ जादा
गाड्या सोडण्यात येणार आहेत. मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महराष्ट्रात या गाड्या सोडल्या जाणार आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या
श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंदतीर्थ महाविद्यालयात येत्या १३
ऑक्टोबरला स्वर्गीय प्राचार्य बी.के.सबनीस यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा
घेण्यात येणार आहे. स्पर्धेचं हे विसावं वर्ष आहे. राज्यभरातल्या महाविद्यालयातून दरवर्षी
अनेक विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होतात.
****
No comments:
Post a Comment