Thursday, 16 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक राजधानी-सिंबॉयसिसच्या पदवी प्रदान सोहळ्यात संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार 

·      भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि दहशतवादाविरोधात सरकारचं शून्य सहिष्णुता धोरण-केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

·      सर्व अन्न व्यावसायिक कंपन्यांना उत्पादनांच्या नावातून ओआरएस शब्द वगळण्याचे निर्देश

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत जाहीर

आणि

·      विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाचा यलो अलर्ट

****

महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक राजधानी असल्याचे गौरवोद्गार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काढले आहेत. ते आज पुण्यात सिंबॉयसिस कौशल्य विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य ते लोकमान्य टिळक यांच्या पूर्ण स्वराज्यापर्यंतचा प्रवास या भूमीने अनुभवल्याचं राजनाथसिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट – संरक्षणमंत्री राजनाथसिंह

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं, ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि दहशतवादाविरोधात सरकारने शून्य सहिष्णुता धोरण अवलंबलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्ली इथं ‘फरारांचं प्रत्यार्पण - आव्हानं आणि धोरण’ या परिषदेत ते बोलत होते. भारताबाहेर राहून जे लोक अशी कारस्थानं करतात त्यांच्याबद्दलही देशाचं शून्य सहिष्णू धोरण असल्याचं शहा यांनी नमूद केलं. सध्या भारताशी संबंधित ३०० हून अधिक प्रत्यर्पण प्रकरणं विविध देशांमध्ये प्रलंबित आहेत. या गुन्हेगारांना परत आणण्यासाठी कायदेशीर आणि धोरणात्मक उपायांवर या संमेलनात सखोल चर्चा होत असून, त्यातून समोर येणारे उपाय हे लाभदायक ठरतील, असं शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील कुरनूल इथं सुमारे १३ हजार ४३० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केलं. उद्योग, वीज पारेषण, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासारख्या क्षेत्रांमधील प्रकल्पांचा यात समावेश आहे. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी श्रीशैलम इथल्या श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानात जाऊन प्रार्थना केली. तसंच छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ति केंद्राला भेट दिली.

****

राज्यातली ५०० मंदिरं, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि १८०० बारवांच्या संवर्धनासाठी बृहद् आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात मुंबईत आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून हा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत सर्व ऐतिहासिक स्थळांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन वाढवण्याचं उद्दीष्ट असल्याचं शेलार यांनी सांगितलं. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक तीन जिल्ह्यांतील ऐतहासिक स्थळे, मंदिरे, गडकिल्ले यांचा स्वतंत्र एकात्मिक बृहत् आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात संरक्षित नसलेल्या ३५० किल्ल्यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. हे कार्य दोन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असून मार्च २०२७ पर्यंत पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणांचे सर्वेक्षण करून निधी उभारणीचे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही शेलार यांनी दिल्या.

****

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबईत घेण्यात आलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळेतही शेलार यांनी मार्गदर्शन केलं. सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी फक्त तांत्रिक कौशल्य नव्हे तर योग्य मानसिकता विकसित होण्याची गरज, शेलार यांनी नमूद केली.

****

राज्यातल्या चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे, सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी ही घोषणा केली. महामंडळातील नियमित अधिकारी-कर्मचाऱ्यांना १६ हजार ८०० रूपये सानुग्रह अनुदान आणि ३० हजार रूपये दिवाळी भत्ता, तसंच इतर कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी भत्ता देण्यात येणार असल्याचं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सर्व शाळांमध्ये वापरला जाणारा सामाजिक उत्तरदायित्व निधी, शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वापरण्याचं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे. भुसे यांनी आज याबाबत विविध उद्योगांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या निधीद्वारे शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहं, प्रयोगशाळा यासारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्योगांनी योगदान देण्याचं आवाहन भुसे यांनी केलं.

****

इतर मागास वर्ग ओबीसीला खाजगी क्षेत्रातही आरक्षण मिळायला हवं अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे, ते आज नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. पक्षाच्या जागा निवडून आल्यास आरपीआयला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आठवले यांनी सांगितले. येत्या आठ मार्च रोजी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने सर्व अन्न व्यावसायिक कंपन्यांना अन्न उत्पादनांच्या नावातून ओआरएस हा शब्द काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत विहित केलेल्या चिन्ह आणि जाहिरातींच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देशही प्राधिकरणाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. वैजापूर पंचायत समितीचं सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव, सोयगाव मागास प्रवर्ग तर खुलताबाद मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव झालं आहे. फुलंब्री, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर या तीन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर पैठण, सिल्लोड आणि कन्नड सभापती पद, सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालं आहे.

****

कोकणातल्या सहा भारतरत्नांच्या रत्नागिरी इथं उभारलेल्या शिल्पांचं अनावरण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण परिसरात ही शिल्पं उभारण्यात आली आहेत. यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पांडुरंग काणे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या सहा भारतरत्नांच्या शिल्पांचा यात समावेश आहे. मोडीत काढलेल्या वाहनांच्या सुट्या भागांपासून, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या १५ विद्यार्थ्यांनी ही शिल्पं साकारली आहेत.

****

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव नुकताच पार पडला. यात अमरावती विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या महोत्सवात राज्यातल्या आठ विभागीय केंद्रातील १०४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील विजेत्या ४८ विद्यार्थ्यांची यंदा जळगाव इथं होणाऱ्या आंतर राज्य युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२५’ साठी निवड झाली आहे.

****

मराठवाड्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील शल्यचिकित्सकांची दुसरी शल्यचिकित्सक परिषद बीड इथं पार पडली. या परिषदेत अडीचशेहून अधिक शल्यचिकित्सक सहभागी झाले. यावेळी राज्यातल्या १३ प्रमुख शस्त्रक्रियांचे जीवनज्योत रुग्णालयात थेट प्रात्यक्षिक करण्यात आलं.

****

हवामान

राज्यात आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशासह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच बीड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात आज आणि उद्या जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

गोवर आणि रुबेला निर्मूलन माहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातल्या ६२ आश्रमशाळा आणि १५ मदरशांमधील ८ हजार ८३६ बालकांना गोवर-रुबेला लसीचा डोस देण्यात आला. सर्व आश्रमशाळा आणि मदरशांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन “गोवर-मुक्त, रुबेला-मुक्त जिल्हा” उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य विभागातर्फे डिसेंबर २०२६ पर्यंत गोवर आणि रुबेला आजारांचे संपूर्ण निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment