Friday, 17 October 2025

Text-आकाशवाणी मुंबई – दिनांक 16.10.2025 रोजीचे रात्री 08.05 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक राजधानी - सिंबॉयसिसच्या पदवी प्रदान सोहळ्यात संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार, आज नाशिकमध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानाचं लोकार्पण

·      भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि दहशतवादाविरोधात सरकारचं शून्य सहिष्णुता धोरण - केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

·      राज्यातली मंदिरं, किल्ले आणि बारवांच्या संवर्धनाचं काम दोन वर्षात होणार, मंत्री आशिष शेलार यांची माहिती

आणि

·      जालना महानगरपालिका आयुक्तांना १० लाख रुपयांची लाच घेताना अटक

****

महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक राजधानी असल्याचे गौरवोद्गार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काढले आहेत. ते काल पुण्यात सिंबॉयसिस कौशल्य विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य ते लोकमान्य टिळक यांच्या पूर्ण स्वराज्यापर्यंतचा प्रवास या भूमीने अनुभवल्याचं राजनाथसिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - संरक्षणमंत्री राजनाथसिंह

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचं ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, राजनाथ सिंह आज नाशिक इथं ‘तेजस एमके-1 ए’ या लढाऊ विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंग लाईनचं लोकार्पण करणार आहेत. काल सायंकाळी त्यांचं ओझर विमानतळावर आगमन झालं.

****

भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि दहशतवादाविरोधात सरकारने शून्य सहिष्णुता धोरण अवलंबलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्ली इथं ‘फरारांचं प्रत्यार्पण - आव्हानं आणि धोरण’ या परिषदेत ते बोलत होते. सध्या भारताशी संबंधित ३०० हून अधिक प्रत्यर्पण प्रकरणं विविध देशांमध्ये प्रलंबित आहेत. या गुन्हेगारांना परत आणण्यासाठी कायदेशीर आणि धोरणात्मक उपायांवर या संमेलनात सखोल चर्चा होत असून, त्यातून समोर येणारे उपाय हे लाभदायक ठरतील, असं शहा यांनी सांगितलं.

****

राज्यातली ५०० मंदिरं, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि १८०० बारवांच्या संवर्धनासाठी बृहद् आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात मुंबईत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक तीन जिल्ह्यांतली ऐतिहासिक स्थळं, मंदिरं, गडकिल्ले यांचा स्वतंत्र एकात्मिक बृहत् आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात संरक्षित नसलेल्या ३५० किल्ल्यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. हे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचं उद्दीष्ट असून, मार्च २०२७ पर्यंत पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणांचं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही शेलार यांनी दिल्या.

****

इतर मागास वर्ग - ओबीसीला खाजगी क्षेत्रातही आरक्षण मिळायला हवं अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. ते काल नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. पक्षाच्या जागा निवडून आल्यास आरपीआयला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. येत्या आठ मार्च रोजी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

****

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं सर्व अन्न व्यावसायिक कंपन्यांना, अन्न उत्पादनांच्या नावातून, ओ आर एस हा शब्द काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत विहित केलेल्या चिन्ह आणि जाहिरातींच्या नियमांचं पालन करण्याचे निर्देशही प्राधिकरणाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत काल काढण्यात आली. वैजापूर पंचायत समितीचं सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव, सोयगाव मागास प्रवर्ग तर खुलताबाद मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव झालं आहे. फुलंब्री, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर या तीन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर पैठण, सिल्लोड आणि कन्नड सभापती पद, सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालं आहे.

****

आज वसुबारस. सवत्स धेनू अर्थात गायवासराच्या पूजेनं दिवाळीला आजपासून प्रारंभ होतो. शेतकऱ्यांना दूध आणि शेतात कष्टासाठी बैलासारखा मेहनती पशू देणाऱ्या गायीप्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगर इथं बीड वळण रस्त्यावरच्या शारदा गोशाळेत आज सायंकाळी सवत्स धेनू पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

**

बीड इथल्या बालरंगभुमी परिषदेच्या वतीनं दिवाळीनिमित्त उद्या धनत्रयोदशीला सकाळी बालकलावंताची सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राष्ट्रीय पोषण माह अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या दैठणा गावात जनजागृतीपर कार्यक्रम काल घेण्यात आला. किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांच्यासह लहान बालकांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासंदर्भात यावेळी उपमुख्य कार्यकारी महिला आणि बालविकास अधिकारी रेखा काळम यांनी मार्गदर्शन केलं. या अभियानाअंतर्गत योग्य प्रकारे आहाराविषयी माहिती मिळाली, तसंच इतरही अनेक प्रकारे मदत मिळाल्याचं स्तनदा माता शिल्पा कछवे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,

बाईट - शिल्पा कछवे

****

जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना दहा लाख रुपयांची लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगहाथ अटक केली. खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील इमारतीच्या बांधकामाचं देयक अदा करण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे ही लाच मागितली होती.

****

लातूर महानगरपालिकेनं नागरिकांकडून दीपावली निमित्त घराची स्वच्छता करताना निघालेल्या अनावश्यक वस्तू संकलनाचा अनोखा उपक्रम राबवला. यामध्ये कपडे, सतरंज्या, १५ इलेक्ट्रॉनिक वस्तू, पादत्राणांचे जोड तसंच अनेक लोखंडी वस्तू जमा झाल्या. हे साहित्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोचवलं जाणार आहे.

****

गोवर आणि रुबेला निर्मूलन माहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातल्या ६२ आश्रमशाळा आणि १५ मदरशांमधल्या आठ हजार ८३६ बालकांना गोवर-रुबेला लसीचा डोस देण्यात आला. केंद्रीय आरोग्य विभागातर्फे डिसेंबर २०२६ पर्यंत गोवर आणि रुबेला आजारांचे संपूर्ण निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे.

****

क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून काल लातूरमध्ये सोयाबीन ऊस परिषद घेण्यात आली. सोयाबीनचे भाव सोयापेंड निर्यातीवर अवलंबून असल्यामुळे सरकारने सोयापेंड निर्यातीस परवानगी द्यावी, परदेशातून तेल आणि कापूस आयात करू नये, तसंच सरकारने तातडीने शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करावी आणि नुकसानभरपाई म्हणून एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, आदी मागण्या संघाटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी केल्या.

****

लातूर इथं आय डी बी आय बँकेच्या सीएसआर फंडातून मनपाच्या गौतम नगर इथल्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राला आवश्यक उपकरणं देण्यात आली. मनपा आयुक्त मानसी यांच्या उपस्थितीत या उपकरणांचं लोकार्पण करण्यात आलं.

****

पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नुकसानभरपाई विरोधात शेतकरी संघटनेनं काल हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ही नुकसानभरपाई तुटपुंजी असल्याचं सांगत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाची होळी केली.

****

हवामान

मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

 

No comments:

Post a Comment