Friday, 17 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 17 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता

****

भारताचं स्वदेशी लढाऊ विमान तेजस एमके-1ए आज अधिकृतपणे भारतीय वायुदलाला सुपूर्द करण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नाशिकमधल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड केंद्रात हा कार्यक्रम पार पडणार आहे. तेजस एमके-1ए हे तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टचं अपग्रेडेड व्हर्जन असून, यात अत्याधुनिक रडार, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स, आणि हवेत असतानाच इंधन भरण्याची क्षमता आहे. हे विमान ताशी दोन हजार २०० किलोमीटर वेगानं उड्डाण करू शकतं. हा टप्पा आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या बळकटीकरणासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे. प्रशिक्षणासाठीच्या विमान उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटनही यावेळी होणार आहे.

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात पाटणा, दरभंगासह १२१ मतदारसंघात सहा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षानं आपल्या ४८ उमेदवारांची पहिली यादी काल जाहिर केली.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. सुरुवातीच्या काळात अपक्ष आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांनी पाच वेळा विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत ‌कर्डिले यांनी मोठा विजय मिळवला होता. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदही ते भूषवत होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रस्थापितांच्या राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता.

आमदार कर्डीले यांच्या निधनानं एक लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग माध्यमातून महाराष्ट्राला तंत्रज्ञानात जागतिक नकाशावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन,  अमेरिकेची आय ओ एन क्यू आणि स्वीडनची स्कैंडियन एबी या दोन नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आता क्वांटम कॉम्प्युटिंग नकाशावर येत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हा उपक्रम राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवेल, शासन या प्रवासात सर्वतोपरी सहकार्य करेल आणि उद्योगांना अखंड वाढीसाठी सुलभ वातावरण उपलब्ध करून देईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

दरम्यान, पुण्यात काल ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे  ‘रिव्होल्यूशन ऑन व्हील’  असून त्यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल, असं ते म्हणाले. 

****

राज्यातल्या सर्व शाळांमध्ये वापरला जाणारा सामाजिक उत्तरदायित्व निधी, शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वापरण्याचं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. याबाबत विविध उद्योगांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते काल बोलत होते. या निधीद्वारे शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहं, प्रयोगशाळा यासारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्योगांनी योगदान देण्याचं आवाहन भुसे यांनी केलं.

****

राज्यातल्या चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे, नियमित अधिकारी-कर्मचाऱ्यांना १६ हजार ८०० रुपये सानुग्रह अनुदान आणि ३० हजार रुपये दिवाळी भत्ता, तसंच इतर कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी भत्ता देण्यात येणार आहे.

****

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी आतापासूनच नियोजन केलं जाईल, तसंच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल असंही वाघमारे यांनी सांगितलं. 

****

छत्रपती संभाजीनगर इथं कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे काव्य मंचचा ‘कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे काव्यभूषण गौरव पुरस्कार, कवी डॉ. ललित अधाने यांच्या 'माही गोधडी छप्पन भोकी' या कवितासंग्रहाला काल प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कवी डॉ. प्रभाकर शेळके यांच्या हस्ते पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन अधाने यांना सन्मानित करण्यात आलं.

****

लातूर इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि राजर्षी शाहू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. तरुणांनी अंमली पदार्थाच्या व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घ्यावी, असं आवाहन यावेळी करण्यात आले.

****

No comments:

Post a Comment