Saturday, 18 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      धनत्रयोदशीनिमित्त सर्वत्र उत्साह-दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

·      देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात-जागतिक शिखर परिषदेत पंतप्रधानांची ग्वाही

·      वस्तू आणि सेवा करातल्या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती

·      नंदुरबार जिल्ह्यात खासगी वाहनाच्या अपघातात आठ ठार तर २८ जण जखमी

आणि

·      भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेला उद्यापासून प्रारंभ

****

धनत्रयोदशीचा सण आज साजरा होत आहे. समुद्र मंथनातून अमृतकुंभ घेऊन प्रकटलेले भगवान धन्वंतरी यांची आज पूजा करून, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी कामना केली जाते. आज सायंकाळी यमदीपदान करण्याचाही प्रघात आहे. कपडे आणि गृहसजावटीच्या साहित्यासह आज सोन्या-चांदीच्या वस्तू तसंच आभुषणांचीही खरेदीही केली जाते. या खरेदीसाठी सगळीकडच्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं सराफा बाजारपेठेमध्ये आज नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. इलेक्ट्रानिक वस्तू, दुचाकी, चारचाकी तसंच कपडे खरेदीसाठी देखील आबालवृद्धांचा बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी धनत्रयोदशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि आरोग्य राहो अशी प्रार्थना मोदी यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीचा सण अंधकारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. या निमित्त सर्वांना स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचे आवाहन करतो. पर्यावरण रक्षण, नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवन मूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

****

देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं एका खासगी वृत्तसंस्थेच्या जागतिक शिखर परिषदेत बोलत होते. आपल्या सरकारनं सुरुवातीपासूनच दिशाभूल झालेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेनं काम केलं आहे. त्यामुळेच आज देशात नक्षलवादानं प्रभावीत जिल्ह्यांची संख्या केवळ ११ वर आली असून, मागच्या काही दिवसांतच ३०३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची सणासुदीच्या काळात मोठी खरेदी झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह नवी दिल्लीत  वार्ताहर परिषदेला त्या संबोधित करत होत्या. या दरकपातीचे फायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा नवरात्रीमध्ये विक्रमी संख्येनं विक्रीत वाढ झाली. गेल्या नवरात्रीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विक्री २५ टक्क्यांनी वाढल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

बाईट – माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

यंदा सणासुदीच्या काळातली उलाढाल १० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज असून यामुळं अर्थव्यवस्थेत २० लाख कोटी रुपये अतिरीक्त येतील, असंही वैष्णव म्हणाले.

जागतिक पातळीवर अस्थिर वातावरण असताना देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर मजबूत आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही आर्थिक वृद्धीचा अंदाज सुधारुन ६ पूर्णांक ६ दशांश टक्के केला असल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितलं.

****

उत्तरप्रदेशात लखनौ इथं तयार झालेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत राष्ट्रार्पण झालं. ब्राह्मोस हे फक्त क्षेपणास्त्र नाही तर भारताच्या वाढत्या स्वदेशी उत्पादन क्षमतेचं प्रतीक आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. अत्याधुनिक प्रणाली तसंच लांब पल्ल्यावर मारा करण्याची क्षमता असलेलं हे क्षेपणास्त्र, वेग, अचूकता आणि शक्ती यांचा संगम असल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले.

****

फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याला भारताच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोकसीला केलेली अटक योग्य असल्याचा निर्वाळा बेल्जियमच्या एका न्यायालयानं दिला आहे. त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेतलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोकसी आरोपी आहे. सीबीआयच्या विनंतीवरून अँटवर्प पोलिसांनी त्याला ११ एप्रिल रोजी अटक केली होती. आता ही अटक योग्य असल्याच्या निर्णयाविरोधात १५ दिवसांच्या आत बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. त्यावर त्याचं भारतात प्रत्यार्पण होणार की नाही, हे ठरणार आहे.

****

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबाग जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवून पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसंच, एक वर्षाचं चांगल्या वर्तणुकीचं हमीपत्र लिहून देण्याचा आदेश दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या हर्षद कशाळकर या पत्रकाराला जयंत पाटील यांनी मारहाण केली होती.

****

नंदुरबार जिल्ह्यात एका खासगी वाहनाला झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. यापैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अस्तंबा यात्रेहून परत येत असताना हा अपघात झाला. या खासगी वाहनात चाळीसहून अधिक प्रवासी होते, यात नंदुरबार तालुक्यातील घोटाणा, समशेरपूर, आणि नंदुरबार शहरातल्या शबरी हट्टी इथल्या रहिवाशांचा समावेश आहे.

ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असून, अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, असंही पवार यांनी सांगितलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका उद्यापासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये हे सामने खेळवले जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली, दीर्घ विश्रांतीनंतर भारतीय जर्सीमध्ये मैदानावर परतणार आहेत. हे दोन्ही अनुभवी पहिल्यांदाच क्रिकेटपटू शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत.

****

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा इंग्लंडसोबत सामना होणार आहे. इंदूर इथं दुपारी तीन वाजता या सामन्याला प्रारंभ होईल.

****

ग्रीस मधल्या अथेन्स इथं झालेल्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप शॉटगन २०२५, पुरुषांच्या ट्रॅपमध्ये कांस्यपदक जिंकून भारतीय नेमबाज झोरावर सिंग संधूनं इतिहास घडवला. झोरावरनं अंतिम सामन्यात ५० पैकी ३१ गुण मिळवत कांस्यपदक जिंकलं. शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ट्रॅप शूटिंग इव्हेंटमध्ये देशाचं हे तिसरं पदक आहे.

****

चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती  सुरेखा वेण्णम हिनं कांस्यपदक पटकावलं आहे. या स्पर्धेत पदक मिळवणारी ती कंपाऊंड प्रकारातली पहिलीच भारतीय तीरंदाज ठरली आहे.

****

गुवाहाटी इथं झालेल्या BWF वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ मध्ये, भारताच्या तन्वी शर्मानं मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इथं झालेल्या उपांत्य फेरीत चीनच्या लिऊ सी या हिच्याविरुद्ध १५-११, १५-९ असा सहज विजय मिळवत, तन्वी वर्ल्ड ज्युनियर फायनलमध्ये पोहचणारी केवळ पाचवी भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. १६ वर्षीय तन्वीनं महिला शटलर अपर्णा पोपट, सायना नेहवाल आणि पुरुष खेळाडू सिरिल वर्मा, शंकर मुथुस्वामी यांचा समावेश असलेल्या एलिट गटात प्रवेश केला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरातल्या एसटी आगारात आठ नवीन इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. या बस ३५ आसनी असून, पूर्णपणे वातानुकूलित आहेत.

****

No comments:

Post a Comment