Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 19
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
श्रीराम जन्मभूमी अयोध्या, दीपोत्सव २०२५ साठीच्या सर्वाधिक भव्य आयोजनासाठी पूर्णपणे सज्ज झाली असून
शरयू तटावर आज मातीचे लाखो दीप उजळणार आहेत. अयोध्या
प्रशासन,
काही सांस्कृतिक संघटना आणि विशेषत्वानं डॉक्टर राम मनोहर
लोहिया अवध विश्वविद्यालय हा उपक्रम घेत आहे. ६० टक्क्यांहून अधिक दीपक शरयु तटावर
रचण्यात आले असून संध्याकाळी शरयू नदीची महाआरती केली जाणार आहे.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा
अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे
****
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतल्या स्वामी रामानंद तीर्थ
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळावर, राज्यशासनाच्या
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या वतीनं सात अशासकीय सदस्यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार बजरंग सोनवणे, आमदार
नमिता मुंदडा,
राष्ट्रीय वर्तमानपत्राचे प्रतिनिधी म्हणून वसंत मुंडे, महिला मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून अंजली घाडगे, महिला
प्रतिनिधी म्हणून संजिवनी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते म्हणून
राजकिशोर मोदी,
माजी आमदार संजय दौंड आदींचा यात समावेश असल्याचं
शासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट
सामन्यांच्या मालिकेत आजचा पहिला सामना प्रत्येकी ३२ षटकांचा करण्यात आला आहे.
पर्थ इथं सुरू सामन्यात भारतानं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा
पंधराव्या षटकांत चार बाद ४६ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारताच्या डावाला
प्रारंभीच धक्के दिले. त्यात विराट कोहली शून्य तर रोहित शर्मा आठ आणि कर्णधार
शुभमन गील दहा तर श्रेयर अय्यर अकरा धावांवर बाद झाले.
****
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंदुर इथे यजमान भारत
आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. दुपारी ३ वाजता हा सामना होईल. या स्पर्धेत
हरमनप्रीत कौर च्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २ सामन्यात पराभूत झाल्यामुळं
गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे.
****
नांदेड शहर बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या आठव्या
राष्ट्रीय पोषण महिन्याचा समारोप काल झाला. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यावेळी
उपस्थित होते. बालक आणि महिलांच्या
सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी कर्डीले यांनी यावेळी
नमूद केलं. नांदेड जिल्ह्यातल्या अंगणवाडी केंद्राना सक्षम करण्यासाठी खेळणी, इतर साहित्य पुरवलं जाईल. शहरातल्या महापालिका शाळांमध्ये वर्ग उपलब्ध असल्यास
तिथं अंगणवाडी भरवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कर्डीले
यांनी यानिमित्त सांगितलं.
****
दिवाळीनिमित्त २३ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती संभाजी
नगर इथला मोंढा बंद राहणार आहे. व्यावसायिक आणि ग्राहकांनी या दिवसात खरेदीसाठी
येऊ नये,
असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, या कालावधीत जुना मोंढा इथल्या दि जनरल किराणा मर्चेंट असोसिएशनतर्फे कामगार, हमाल,
रिक्षावाले आणि हातगाडी चालकांसाठी आयोजित अनोख्या 'आनंदाची दिवाळी'अंतर्गत, कष्ट करणाऱ्या सर्वांना
सुट्यांसह,
भेटवस्तू आणि कौटुंबिक गेट टुगेदरची मेजवानी देण्यात येत
असल्याची अशी माहिती किराणा असोसिएशनतर्फे देण्यात आली. येत्या २७ तारखेपासून
कामकाज पुन्हा पूर्ववत सुरु होईल, असं व्यापारी महासंधाचे
अध्यक्ष संजय कांकरिया यांनी सांगितलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यात डाबली धांदरणे
इथल्या जिल्हा परिषद मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या पूर ग्रस्तांसाठी निधी गोळा केला. शाळेच्या
विद्यार्थी,
शिक्षकांनी गोळा केलेला पाच हजार १३० रुपयांचा निधी धुळे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांच्याकडे सुपूर्द केला.
****
मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारच्या रक्सौलकडे
जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ तीन युवक खाली पडून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर
एक युवक गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री झालेल्या या अपघातातल्या गंभीर जखमी
युवकावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची आणि जखमी प्रवाशाची ओळख
पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
****
नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती इथं काल
शनिवारपासून सलग २५ तास दोसे बनवण्याचा
विक्रम केला आहे. त्यांनी या काळात १५ हजार ७७३ दोसे तयार केले आणि त्यांना
नागरिकांना सेवनासाठी उपलब्ध करुन दिलं. मनोहर यांनी नागपूर इथं गेल्या वर्षी सलग
२४ तास दोसे निर्मितीचा स्वतःचाच विक्रम यावेळी मोडला.
****
No comments:
Post a Comment