Sunday, 19 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन

·      सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तीन हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची मदत जाहिर 

·      दिवाळीचा सर्वत्र उत्साह; खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

·      राज्यात 'सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा' हे विशेष तपासणी अभियान

आणि

·      जागतिक शॉटगन स्पर्धेत नेमबाज झोरावर सिंग संधूला, तर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत ज्योती सुरेखा वेण्णम हिला कांस्य पदक

****

जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असून, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची सणासुदीच्या काळात मोठी खरेदी झाल्याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. काल दिल्लीत, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह त्या वार्ताहर परिषदेला संबोधित करत होत्या. या दरकपातीचे फायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा नवरात्रकाळात विक्रमी संख्येनं विक्रीत वाढ झाली, गेल्या नवरात्राच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विक्री २५ टक्क्यांनी वाढल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

पीयूष गोयल यांनी यावेळी, जागतिक पातळीवर अस्थिर वातावरण असताना देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर मजबूत असल्याने, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही आर्थिक वृद्धीचा अंदाज सुधारून ६ पूर्णांक ६ दशांश टक्के केल्याकडे लक्ष वेधलं. अप्रत्यक्ष करांच्या क्षेत्रात केलेल्या या सुधारणांमुळे देशात होणारी गुंतवणूक, उद्योगातली उलाढाल, पायाभूत सुविधांवर होणार खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, स्वातंत्र्यानंतर हा मोठा बदल असल्याचं गोयल यांनी नमूद केलं. ते म्हणाले.

बाईट - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

****

उत्तरप्रदेशात लखनौ इथं तयार झालेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रार्पण झालं. ब्राह्मोस हे फक्त क्षेपणास्त्र नाही तर भारताच्या वाढत्या स्वदेशी उत्पादन क्षमतेचं प्रतीक असल्याचं, त्यांनी यावेळी नमूद केलं. अत्याधुनिक प्रणाली तसंच लांब पल्ल्यावर मारा करण्याची क्षमता असलेलं हे क्षेपणास्त्र, वेग, अचूकता आणि शक्ती यांचा संगम असल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले.

****

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तीन हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं काल जारी केला. राज्यभरातल्या २३ जिल्ह्यांतल्या ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातले हे शेतकरी आहेत. या जिल्ह्यांमधल्या २७ लाख ५९ हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यापोटी ही भरपाई दिली जाणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी आतापर्यंत एकूण साडे सात हजार कोटी रुपये मदत वितरणाला मान्यता दिल्याची माहिती, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

****

धनत्रयोदशीचा सण काल साजरा झाला. काल सायंकाळी यमदीपदानही करण्यात आलं. कपडे आणि गृहसजावटीच्या साहित्यासह सोन्या-चांदीच्या वस्तू तसंच आभुषणांची काल मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. सगळीकडच्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर इथं सराफा बाजारपेठेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. इलेक्ट्रानिक वस्तू, दुचाकी, चारचाकी तसंच कपडे खरेदीसाठी देखील आबालवृद्धांचा बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. सायंकाळनंतर आसमंत आतिषबाजीने उजळून निघाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

****

भारताने आपलं पहिलं देशांतर्गत प्रतिजैविक : नॅफी-थ्रोमायसिन विकसित केलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत एका वैद्यकीय कार्यशाळेचं उद्घाटन करताना ही माहिती दिली. श्वसन संसर्ग, विशेषतः कर्करुग्ण आणि मधुमेह नियंत्रणाबाहेर असलेल्या रुग्णांसाठी हे प्रतिजैविक प्रभावी ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अन्न आणि औषध प्रशासनामार्फत राज्यात 'सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा' हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत असून, याअंतर्गत १२ ऑक्टोबरपर्यंत तीन हजार ४५८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. याअंतर्गत विविध खाद्यपदार्थांचे एकंदर चार हजार ६७६ नमुने तपासण्यात आले आणि अनियमितता आढळलेल्या एक हजार ४३१ आस्थापनांना सुधारणा नोटिस देण्यात आली. तसंच ४८ आस्थापनांचे परवाने निलंबित केल्याची, तर एका आस्थापनेचा परवाना रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यात एक खासगी वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. यापैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. अस्तंबा यात्रेहून परत येत असताना चांदशैली घाटात हे वाहन दरीत कोसळून हा अपघात झाला. जखमींवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या खासगी वाहनात चाळीसहून अधिक प्रवासी होते. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असून, अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

****

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबाग जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवून पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसंच, एक वर्षाचं चांगल्या वर्तणुकीचं हमीपत्र लिहून देण्याचा आदेश दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या हर्षद कशाळकर या पत्रकाराला जयंत पाटील यांनी मारहाण केली होती.

****

लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ आणि नांदेड महानगर भाजप, यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून नांदेडच्या पंचवटी हनुमान मंदिराजवळ 'भाऊचा माणुसकीचा फ्रिज' हा उपक्रम चालवला जातो. या फ्रीजमधून दररोज सुमारे शंभर गरजूंना जेवण पुरवलं जातं. दिवाळीच्या काळात या फ्रिजमधून सुमारे शंभर क्विंटल मिठाई वाटपही केलं जात आहे. याबाबत या उपक्रमाचे संयोजक दिलीप ठाकूर यांनी अधिक माहिती दिली....

बाईट - दिलीप ठाकूर

****

क्रिकेट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये हे सामने खेळवले जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली, दीर्घ विश्रांतीनंतर भारतीय जर्सीमध्ये मैदानावर परतणार आहेत. हे दोन्ही अनुभवी पहिल्यांदाच क्रिकेटपटू शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत.

****

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा आज इंग्लंडसोबत सामना होणार आहे. इंदूर इथं दुपारी तीन वाजता या सामन्याला प्रारंभ होईल.

****

ग्रीस मधल्या अथेन्स इथं झालेल्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप शॉटगन २०२५ स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅपमध्ये कांस्यपदक जिंकून भारतीय नेमबाज झोरावर सिंग संधूनं इतिहास घडवला. झोरावरनं अंतिम सामन्यात ५० पैकी ३१ गुण मिळवत कांस्यपदक जिंकलं. शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ट्रॅप शूटिंग इव्हेंटमध्ये देशाचं हे तिसरं पदक आहे.

****

चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्यपदक पटकावलं आहे. या स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात पदक मिळवणारी ती पहिलीच भारतीय तीरंदाज ठरली आहे. 

****

गुवाहाटी इथं झालेल्या BWF वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ मध्ये, भारताच्या तन्वी शर्मानं मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. उपांत्य फेरीत चीनच्या लिऊ सी या हिच्याविरुद्ध १५-११, १५-९ असा सहज विजय मिळवत, तन्वी वर्ल्ड ज्युनियर फायनलमध्ये पोहचणारी पाचवी भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

****

आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी या जमातींना जात प्रमाणपत्र मिळावं, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जगताप यांनी काल उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माजलगाव आणि बीडचे जिल्हाधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी केली.

****

No comments:

Post a Comment