Sunday, 19 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता

****

श्रीराम जन्मभूमी अयोध्या, दीपोत्सव २०२५ साठीच्या सर्वाधिक भव्य आयोजनासाठी पूर्णपणे सज्ज झाली असून शरयू तटावर आज मातीचे लाखो दीप उजळणार आहेत. अयोध्या प्रशासन, काही सांस्कृतिक संघटना आणि विशेषत्वानं डॉक्टर राम मनोहर लोहिया अवध विश्वविद्यालय हा उपक्रम घेत आहे. ६० टक्क्यांहून अधिक दीपक शरयु तटावर रचण्यात आले असून संध्याकाळी शरयू नदीची महाआरती केली जाणार आहे. दरम्यान, काल दिल्लीत प्रथमच अयोध्येच्या धर्तीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. कर्तव्यपथावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या उत्सवाचं उद्घाटन केलं. हा केवळ दीपोत्सव नाही तर एका नव्या जागृतीचा अग्रदूत असल्याचं त्या म्हणाल्या. या दीपोत्सवाच्या माध्यमातून दिल्लीनं एक अध्याय रचला असून हा दीपोत्सव म्हणजे आस्था आणि आधुनिकतेचा अद्भुत संगम असल्याचंही त्यांनी सांगितलं. या दीपोत्सवात जवळपास एक लाख ५१ हजार दिवे उजळवण्यात आले आणि हजारो ड्रोन्सच्या सहाय्याने रामायणाच्या दिव्य गाथेचं सृजन करण्यात आलं.

****

सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्‍या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. नेट परीक्षा दिनांक ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.  NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही माहिती दिली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर आहे. परीक्षा कोणत्या शहरांमध्ये आणि कोणत्या केंद्रांवर होईल, याची यादी परीक्षेच्या १० दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. याबाबत सविस्‍तर माहिती यूजीसीच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्ध आहे.

****

रेल्वेच्या कामकाजाशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या चित्रफीती सामायिक करणाऱ्या सामाजिक प्रसार माध्यमांवरील खात्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. सणासुदीच्या काळात काही सोशल मीडिया हँडल जुन्या किंवा दिशाभूल करणाऱ्या चित्रफीती प्रसारित करत असल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला असल्याचं रेल्वे मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं

आहे.  अशा २० हून अधिक सोशल मीडिया हँडलची ओळख पटवण्यात आली असून  रेल्वे प्रशासनानं त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रवाशांना रेल्वेच्या अधिकृत सूचना आणि मंत्रालयाच्या सामाजिक संपर्क माध्यमांवर अवलंबून राहण्याचं आवाहनही रेल्वे मंत्रालयानं केलं आहे.

****

जगन्नाथ पुरीच्या दर्शनासाठी म्यानमार हून आलेल्या ६ विदेशी पर्यटकांपैकी २ पर्यटकांचा वाशिम इथं समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात काल मृत्यु झाला तर चालकासह इतर ४ जण जखमी झाले. ३३ वर्षीय मिन ओंग आणि त्यांचा मुलगा १३ वर्षाचा मिन चित या अपघातात जागीच ठार झाले. पहाटे दोन वाजताच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्यान हे वाहन समृद्धी महामार्गाच्या कठड्यावर जाऊन आदळल्यामुळं हा अपघात झाला. जखमींवर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण आगारात आठ नवीन इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. या बस छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर धावणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं स्वरयोग संगीत विद्यालयाच्या वतीने काल गोविंदभाई श्रॉफ ललित कला सभागृहात दीपावली संगीत महोत्सव घेण्यात आला. यावेळी विविध प्रकाराच्या गीतांचं सादरीकरण करण्यात आलं.

****

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात आज भारतानं बाराव्या षटकात तीन बाद ३७ धावा केल्या आहेत. पर्थ इथं सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. विराट कोहली शून्य तर रोहित शर्मा आठ आणि कर्णधार शुभमन गीलही केवळ दहा धावांवर बाद झाले. पावसाच्या व्यत्ययामुळं खेळ सध्या थांबवण्यात आला आहे.

****

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंदुर इथे यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. दुपारी ३ वाजता हा सामना होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर च्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २ सामन्यात पराभूत झाल्यामुळे गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे.  दरम्यान काल कोलंबो इथे नियोजित न्युझीलंड आणि पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पाकिस्तानने या स्पर्धेत अद्याप एकही सामना जिंकला नसून गुणतालिकेत पाकिस्तानचा महिला क्रिकेटचा संघ आठव्या आणि अंतिम स्थानी आहे.

****

No comments:

Post a Comment