Monday, 20 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली - पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      दिवाळीचा सर्वत्र उत्साह, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन

·      महाराष्ट्राचं 'व्हिजन डॉक्युमेंट' विकसित भारताचं स्वप्न साकारणार - मुख्यमंत्र्यांची माहिती; विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला मान्यता 

आणि

·      हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं नागरिकांना ‘फटाकेमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी’ साजरी करण्याचं आवाहन

****

देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली, त्यावेळी ते बोलत होते. आयएनएस विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक असून, ही केवळ एक युद्धनौका नाही, तर एकविसाव्या शतकातल्या भारताच्या परिश्रम, प्रतिभा आणि वचनबद्धतेचंही प्रतीक आहे, असं ते म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

गेल्या दशकभरात भारतीय सेना आत्मनिर्भरतेकडे मार्गक्रमण करत असल्याचं सांगत, तिन्ही सेनादलांसाठी शस्त्र आणि उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यावर भर दिला जात असून, भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा हा सण अंध:कारावर प्रकाशाच्या, अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक असून, देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. महाराष्ट्रात आज नरक चतुर्दशीनिमित्त घरोघरी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करुन, फटाके वाजवून आणि दिवाळीचा फराळ करून आनंद साजरा करण्यात आला. सणानिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत असून, घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळी पहाटनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथल्या शास्त्रीनगर परिसरात पंडित शौनक अभिषेकी यांचा दिवाळी पहाट कार्यक्रम आज झाला. अभिषेकी यांनी शास्त्रीय गायनासह सादर केलेल्या अभंगांना श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

लक्ष्मीपूजनानिमित्त उद्या मुंबईच्या शेअर बाजारांमधे मुहूर्ताचे सौदे दुपारी पावणे दोन ते पावणेतीन  या वेळात होणार आहेत.

राज्याच्या काही भागात दिवाळीवर पूर आणि अतिवृष्टीचं सावट आहे. त्यादृष्टीने आपद्ग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रमही दिवाळीनिमित्त राबवले जात आहेत.

****

 

 

 

महाराष्ट्राचं 'व्हिजन डॉक्युमेंट' विकसित भारताचं स्वप्न साकारणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला मान्यता देण्यात आली. हा मसुदा लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये २०२९, २०३५ आणि २०४७ अशा तीन टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा 'रोडमॅप' दिला आहे. यंत्रणांनी यापुढे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रस्ताव स्वीकार्यतेची यंत्रणा निर्माण करावी. राज्याला पुढे नेत असताना भविष्यात कुठलीही अडचण न येणारं शाश्वत विकासाचंच मॉडेल निर्माण करावं, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने एक हजार ५६६ कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. यामुळे पूरग्रस्तांना मदत देण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग येणार असून, त्यांच्यापर्यंत ही अतिरिक्त मदत लवकरात लवकर पोहचवणं शक्य होणार असल्याचं शिंदे म्हणाले.

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधल्या १२१ जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून भरलेल्या दोन हजार ४९६ अर्जांपैकी, ४८७ अर्ज रद्दबातल झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतही आज संपली. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान ११ नोव्हेंबरला २० जिल्ह्यांमधल्या १२२ जागांवर होणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत अशा शेतकऱ्यांना १७८ कोटी रुपयांचा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देण्यास मान्यता देण्यात आली आहे, तर, सुमारे एक लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकशे एक्केचाळीस कोटी पंधरा लाख रुपये अनुदान जमा करण्यात आलं आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ही माहिती दिली. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानासाठी शासनानं हिंगोली जिल्ह्यासाठी दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार तीनशे पस्तीस रुपयांची मदत मंजूर केली आहे.

****

हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं नागरिकांना ‘फटाकेमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी’ साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या उपस्थितीत आज हिंगोलीच्या नगर परिषद कार्यालयात याबाबत एक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. याशिवाय, प्लास्टिकविरहित, ऊर्जा-बचतीची आणि स्वच्छतेचा संदेश देणारी दिवाळी साजरी करण्यावर भर द्यावा, असं आवाहनही या कार्यक्रमातून करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचं आज गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं वार्धक्यानं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थखात्याची जबाबदारी सांभाळली होती. आमगाव विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आले होते, तसंच चिमूर मतदारसंघातून एकदा लोकसभेवरही निवडून गेले होते. गोंदिया जिल्हानिर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

शिवणकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून त्यांना आदरांजली वाहिली.

****

दिवाळी सणानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तसंच २३ तारखेला भाऊबिजेच्या दिवशी बंद राहणार आहे. इतर दिवशी नियमित सेवांसह आपत्कालीन आरोग्य सेवा सुरू राहणार असल्याचं घाटी प्रशासनानं कळवलं आहे.

****

व्हिएतनाममध्ये हाय फोंग इथं झालेल्या आशियायी नौकानयन स्पर्धेत भारतानं शानदार प्रदर्शन करत तीन सुवर्ण, पाच रजत आणि दोन कांस्यपदकांसह एकूण दहा पदकं जिंकली आहेत.

****

जालना शहरातल्या माऊलीनगर भागात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. परी दीपक गोस्वामी असं या मुलीचं नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

****

रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या १४ गावातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे सातबारे कोरे झाले आहेत. आमदार रमेश बोरनारे यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ ते मुंबई, अशी विशेष वंदे भारत एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहून ही मागणी केल्याचं त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या मागणीसोबतच, लातूर-मुंबई एक्सप्रेस आठवड्यातून किमान चार वेळेस नांदेडपर्यंत वाढवण्यात यावी, राज्यातल्या ज्योतिर्लिंगांना जोडणारी विशेष ज्योतिर्लिंग एक्सप्रेस गाडी सुरू करावी, नांदेड पनवेल एक्सप्रेस गाडीचे एसी डबे वाढवण्यात यावेत, या मागण्याही मुंडे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment