Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21 October 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
दिवाळीनिमित्त देशातील नागरिकांना उद्देशून शुभेच्छा पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रतिसाद
दिल्याबद्दल ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूरने न्याय आणि सुरक्षेप्रती भारताची
वचनबद्धता दर्शविली आहे.
मोदी पुढे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिराच्या भव्य उभारणीनंतर
ही दुसरी दिवाळी आहे. भगवान श्री राम आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य देतात.
काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण याचे जिवंत उदाहरण पाहिले आहे,"
याशिवाय, यावर्षीची दिवाळी खास आहे कारण,
पहिल्यांदाच, देशभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये,
दुर्गम भागांमध्ये दिपोत्सव होत आहे. हे असे जिल्हे आहेत जिथे नक्षलवाद
आणि माओवादी दहशतवाद मुळापासून नष्ट झाला आहे."
"आपण नजीकच्या भविष्यात जगातील तिसरी
सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत. 'विकसित'
आणि 'आत्मनिर्भर भारताच्या या प्रवासात,
नागरिक म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी म्हणजे राष्ट्राप्रती असलेली आपली
कर्तव्ये पार पाडणे," असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
****
दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने
साजरा होत आहे. आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार
पडेल. व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आज लक्ष्मीपूजनाच्या
पार्श्वभूमीवर मुबई शेअर बाजारात विशेष दिवाळी मुहूर्त सौद्यांचे सत्र आयोजित करण्यात
आले आहे. यावर्षी मुहूर्ताच्या सौद्यांची वेळ दिवसा करण्यात आली आहे. शेअर बाजार आज
दुपारी पावणे दोन वाजता सुरू होईल आणि दुपारी पावणे तीन वाजता बंद होईल.
****
दुबईतल्या जगातील सर्वात उंच इमारत
बुर्ज खलिफावर दिवाळीच्या निमित्तानं रात्री एक विशेष लाइट शोचं आयोजन करण्यात आले
होते, यादरम्यान
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६
ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशशावासियांशी संवाद साधणार
आहेत. हा या कार्यक्रमाचा १२७ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार व
सूचना १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर किंवा माय जीओव्ही फोरम द्वारेही सादर करू
शकतील. आगामी भागासाठी येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत सूचना स्विकारल्या जातील.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना मुंबई इथल्या नायगाव
पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
गेल्या वर्षभरात देशातील ३४ पोलीस अधिकारी आणि १५७ पोलीस अंमलदार अशा एकूण १९१ वीर
शहीदांना त्यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल त्यांनी श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी पोलिसांतर्फे
अभिवादन म्हणून बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी
निमंत्रित देश-विदेशी पाहुणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
****
कर्तव्य बजावत असतांना धारातीर्थी
पडलेल्या पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी छत्रपती
संभाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आज पोलीस स्मृतिदिन आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी
हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय
शिरसाट, मंत्री
अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
****
नंदूरबार जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालयातील
शहीद स्मारकावर आज पोलीस शहीद दिना निमित्ताने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे
यांच्या उपस्थितीमध्ये शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रद्धांजली देण्यात
आली.
****
पंजाब पोलिसांनी आज अमृतसरमध्ये
दोन अतिरेक्यांना शस्त्रांसह अटक केली. पोलिस सूत्रांनुसार, हे दोन्ही अतिरेकी पाकिस्तानी आयएसआय
एजंटच्या संपर्कात होते. त्याच्याकडूनच या अतिरेक्यांना ही शस्त्रे मिळाली होती. पंजाबमध्ये
दहशतवादी हल्ला करण्याची त्यांची योजना होती. पंजाब पोलिसांकडून या दोघांचीही चौकशी
सुरू आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय
चित्रपट अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. असरानी यांचे
काल निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. समाज माध्यमांवरील संदेशात पंतप्रधान मोदी यांनी
म्हटले की, एक
प्रतिभावान कलाकार असरानी यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांनी
त्यांच्या अविस्मरणीय अभिनयाने अनेकांच्या जीवनात आनंद आणला. भारतीय चित्रपटसृष्टीतील
त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील.
****
कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात आज
तुरळक ठिकाणी तर येत्या २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान विदर्भात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट
होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यादरम्यान शेतकऱ्यांनी तांदूळ, मका, भुईमूग,
आणि सोयाबीनचे कापणी केलेले पीक सुरक्षित ठेवण्याचा सल्ला हवामान खात्यानं
दिला आहे.
****
No comments:
Post a Comment