Tuesday, 21 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 21 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑक्टोबर २०२ सकाळी .०० वाजता

****

दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल. व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बाजारपेठा, घरं आणि कार्यालयं आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली आहेत. सर्वत्र आनंदाचं आणि मंगलमय वातावरण दिसत आहे. दिवाळीनिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत असून, घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळी पहाटनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.

****

आज लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात विशेष दिवाळी मुहूर्त सौद्यांचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी मुहूर्ताच्या सौद्यांची वेळ दिवसा करण्यात आली आहे. शेअर बाजार आज दुपारी पावणे दोन वाजता सुरू होईल आणि दुपारी पावणे तीन वाजता बंद होईल. याआधी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी मुहूर्ताचे सौदे होत असत. मात्र, सायंकाळी घराघरात लक्ष्मीपूजन केले जात असल्यामुळे अनेक नागरिकांना यापासून वंचित राहावे लागत असे. हे लक्षात घेऊन शेअर बाजाराच्या मुहूर्ताच्या सौद्यांची वेळ यावर्षीपासून बदलण्यात आली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण केले. समाज माध्यमांवरील संदेशामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, पोलिसांच्या दृढ समर्पणामुळे देश आणि जनता सुरक्षित राहते. संकटाच्या आणि गरजेच्या वेळी त्यांचे शौर्य आणि वचनबद्धता कौतुकास्पद आहे.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पोलीस कर्मचारी अंतर्गत सुरक्षेच्या धोक्यांना उधळून लावत आहेत आणि अनुकरणीय धैर्य आणि वचनबद्धतेने नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करत आहेत. देशाच्या सेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात पोलिसांच्या बलीदानाचे स्मरण करीत त्यांनी आदरांजली वाहिली.

****

परभणी इथल्या पोलिस मुख्यालयात आज पोलिस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतीय वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून स्फूर्ती मिळावी तसंच आपल्या कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी यासाठी हा स्मृतिदिन पाळला जात असल्याचं सांगत पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांच्यासह उपस्थितांनी पोलिस स्मृती स्तंभांला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यानंतर पथकानं हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. याप्रंसंगी जिल्हाधिकारी संतोष चव्हाण, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथूर यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

****

महाराष्ट्राचं 'व्हिजन डॉक्युमेंट' विकसित भारताचं स्वप्न साकारणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला मान्यता देण्यात आली. हा मसुदा लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये २०२९, २०३५ आणि २०४७ अशा तीन टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा 'रोडमॅप' दिला आहे. यंत्रणांनी यापुढे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रस्ताव स्वीकार्यतेची यंत्रणा निर्माण करावी. राज्याला पुढे नेत असताना भविष्यात कुठलीही अडचण न येणारं शाश्वत विकासाचंच मॉडेल निर्माण करावं, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

साडेदहा किलो अंमली पदार्थ बाळगणाऱ्या प्रवाशाला सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. बँकॉकहून येणाऱ्या या प्रवाशानं मारिजुआना हा अंमली पदार्थ बॅगेत लपवला होता. या पदार्थाची किंमत साडेदहा कोटी रुपये आहे. याच विमानतळावर दुसऱ्या एका घटनेत अवैधरित्या सुमारे दोनशे ग्रॅम सोनं आणणाऱ्या प्रवाशाला सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली. मस्कतहून येणाऱ्या या प्रवाशानं सुमारे चोवीस लाख रुपयांचं हे सोनं आपल्या अंगावर लपवून आणलं होतं.

****

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे आसरानी यांची, 'शोले' चित्रपटात जेलरची भूमिका, आणि 'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं' हा त्यांचा संवाद आजही चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहे.

****

No comments:

Post a Comment