Wednesday, 22 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

दिवाळी, प्रकाशाचा उत्सव, केवळ भारतातच नाही तर जगभरात साजरा केला जातो. यंदाही नेपाळपासून अमेरिकेपर्यंत, अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी दीपोत्सव करण्यात आला. आनंदाने फटाके फोडण्यात आले. सर्वत्र शांती, आशा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. अमिरेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. जगातील सर्वात उंच असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीवरही दिवाळीनिमित्त रोषणाई करून भारतीयांना शुभेच्छा संदेश देण्यात आला.

दिवाळीच्या सणानिमित्त भारतातील घरे आणि रस्ते लाखो दिव्यांनी उजळून निघाले, तेव्हा अमेरिका, इस्रायल, कॅनडा आणि संयुक्त अरब अमिरातीतील जागतिक नेत्यांनीही या उत्सवात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि अनेक राजदूतांनी भारतीयांना शुभेच्छा देत दिवाळी साजरी केली.

युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या अलिकडच्या भारत भेटीची आठवण करून दिली. समाजमाध्यमांवरील संदेशात स्टारमर यांनी ब्रिटनमधील हिंदू, जैन आणि शीख बांधवांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या महिन्याच्या प्रारंभी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत हिंदीमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरमधील नेत्यांनीही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातीलवसमत-परभणी मार्गावरील तेलगाव फाट्याजवळ काल रात्री वसमतकडे जाणारी चारचाकी आणि परभणीकडे जाणारी ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ऑटोमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑटोचालक गजानन रामराव चोपडे, महेश माधव कुलकर्णी आणि बंडू माणिकराव भालेराव अशी मृतांची नावं आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी नांदेड इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथल्या विविध विकास कामासाठी गेल्या आठवड्यात मंजूर झालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीमध्ये आणखी ५ कोटी रुपयांच्या निधीची भर पडली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून रेणापूर इथे नवीन पाणीपुरवठा योजना, श्री रेणुका देवी मंदिर भक्तनिवास, अशोक सम्राट बौद्ध विहार, मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना, बालाजी मंदिर परिसरात भव्य सभागृह, रेणा नदीवर घाटाचा विकास, श्री रेणुका देवी मंदिर परिसराचा विकास, अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर, रेड्डी समाज भवन, हनुमान मंदिर सभागृह, अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, पथदिवे, अंगणवाडी बांधकाम यासह विविध विकास कामं करण्यात येणार आहेत. यातील काही कामं झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथील मैदानावर होणार आहे. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सात गडी राखून पराभव केला होता. या मालिकेत भारतीय संघ १ - ० असा पिछाडीवर आहे. उद्याचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

****

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना उद्या न्यूझिलंडच्या संघासोबत होणार आहे. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर हा सामना दुपारी तीन वाजता होणार आहे. भारताचा यानंतरचा सामना २६ ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी भारतीय संघाला हे दोन्ही सामना जिंकणे आवश्यक आहे. स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने जिंकून भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली होती. परंतु त्यानंतरचे तीनही सामने गमावल्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला आहे. त्यामुळे पुढचे दोन्ही सामने त्यांना जिंकावेच लागतील.

****

भारताने जगाच्या एकूण वनक्षेत्रात नववं स्थान पटकावलं आहे, यामुळे जागतिक पर्यावरण संरक्षण क्षेत्रात भारतानं महत्वपूर्ण उपलब्धी मिळवली आहे. इंडोनेशियाच्या बाली इथे खाद्य आणि कृषी संघटनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वैश्विक वन संसाधन आकलन २०२५ मध्ये याबद्दल ची माहिती नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी भारत या क्षेत्रात दहाव्या स्थानी होता. यावर्षी भारतानं नववं स्थान मिळवणं हे भारताचं मोठं यश आणि प्रगती असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.

ही प्रगती वन संरक्षण, वन्यीकरण आणि सामुहिक प्रयत्नांमधून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेनं सरकारचे उपक्रम आणि धोरणांना मिळालेली सफलता अधोरेखित करत असल्याचं ते म्हणाले.

****

No comments:

Post a Comment