Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 23 October 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना
आज भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ बहिणींमधल्या स्नेह आणि विश्वासाचं प्रतीक
असलेल्या भाऊबीजेचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, या नात्याची वीण आणखीन घट्ट व्हावी, अशी कामना पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा
संदेशात व्यक्त केली आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
हस्ते तिरुअनंतपूरम येथील राज भवनात माजी राष्ट्रपती दिवंगत के आर नारायणन यांच्या
पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. नारायणन यांचा पुतळा आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी
ठरेल, असं राष्ट्रपती म्हणाल्या.
****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी
दिल्ली इथं होणाऱ्या द्वैवार्षिक नौदल कमांडर्स परिषदेला संबोधित करणार आहेत. आपल्या
भाषणात संरक्षणमंत्री २०४७ पर्यंत व्यापक
राष्ट्रीय हितसंबंध आणि विकसित भारताचं व्हिजन डॉक्युमेंट सादर करतील. काल सुरू झालेली
तीन दिवसांची परिषद ऑपरेशन सिंदूरनंतर नौदलाच्या भविष्यातील कारवाया आणि तयारीच्या
दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
****
भारतात निर्मित आकाश क्षेपणास्त्र
खरेदी करण्यासाठी ६ ते ७ देश प्रयत्नरत असून आर्मेनियासोबत आकाश, पिनाका आणि १५५ मिमी तोफांसारख्या
संरक्षण साहित्याचे करारही झाले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली
आहे. या करारानंतर ब्राझीलसह इजिप्त, व्हिएतनाम, फिलिपीन्स आणि युएई या देशांमध्येही
आकाश क्षेपणास्त्रासंबंधी रुची आणि खरेदीप्रती
गती वाढल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आकाश क्षेपणास्त्राच्या
प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानवर विजय मिळवणं सुलभ झालं, आणि ते जगानं पाहिलं आहे. आखाती देश, आसियान भागातील राष्ट्रं आणि इतर बाजारपेठांमध्ये आकाशची
मागणी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाजही संरक्षण
सूत्रांनी व्यक्त केला आहे.
****
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री
पियुष गोयल आजपासून जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ही भेट भारताचे जर्मनीशी असलेले
संबंध वृद्धिंगत करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 2025 हे वर्ष भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीचे
रौप्य महोत्स्वी वर्ष आहे, त्यामुळं ही भेट द्विपक्षीय
संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने विशेष महत्वाची
आहे. गोयल यांच्या बैठकांदरम्यान दोन्ही देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक
आणि व्यावसायिक संघटनांच्या उच्च पदस्थ अशा सर्वांशी संवाद साधण्यात येणार आहे.
****
सरकारनं माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये
बदल प्रस्तावित केले आहेत. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या सामग्रीचे
स्पष्ट लेबलिंग अनिवार्य करण्यात आलं आहे. डीपफेक आणि चुकीच्या माहितीमुळे होणारे नुकसान
रोखण्यासाठी फेसबुक आणि यूट्यूब सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी जबाबदारी वाढवणे हा
या बदलांचा उद्देश आहे.
****
उत्तराखंड मधील श्री केदारनाथ मंदिर
आणि श्री यमुनोत्री धामची द्वारं शीतकालासाठी आजपासून बंद करण्यात आली. केदारनाथ मंदिराचं
द्वार सकाळी साडे आठ वाजता तर यनुमोत्री धामचं
द्वार साडे बारा वाजता बंद करण्यात आलं. शीतकालात केदारनाथांची प्रतिमा उखीमठ इथल्या
ओंकारेश्वर मंदिरात आणि देवी यमुनेची प्रतिमा खारसाली इथे ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान या वर्षी १० लाख ७४ हजारांहून
अधिक भाविकांनी श्री केदारनाथ धाम आणि सहा लाख ४४ हजारांहून अधिक भाविकांनी श्री यमुनोत्री
धामचं दर्शन घेतलं.
****
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग
आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं वाशिम इथं काल “दीपोत्सव २०२५” हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथले कुणाल वराळे, मुंबईचे मयुर सुकाळे आणि गायिका पौर्णिमा
कांबळे यांनी या कार्यक्रमात विविध गीतांनी मैफिल सजवली. तसंच वाशिम इथले कलाकार शाहिर
संतोष खडसे यांच्या नृत्य समूहानं आपली कला सादर केली. या कार्यक्रमात भक्तीगीत, भावगीत, चित्रपट संगीत अशा गीतांचं सादरीकरण
करण्यात आलं.
****
नंदुरबार जिल्ह्यात छत्रपती संभाजी
महाराज महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी जागेचं भूमिपूजन विधान परिषद आमदार चंद्रकांत
रघुवंशी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर पुतळ्याचं
लोकार्पण करण्यात येणार आहे. जागेच्या सुशोभीकरणासाठी आमदार रघुवंशी यांच्या स्थानिक
विकास निधीतून ३० लाख रुपये निधी देण्यात आला आहे.
****
अॅडलेड इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या
एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं
भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर
बाद झाला. कर्णधार शुभमन गिल ९ धावा करुन बाद झाला. सुरुवातीच्या पडझडीनंतर रोहित शर्मा
आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सांभाळला. रोहित शर्मानं अर्धशतकी खेळी केली.
****
No comments:
Post a Comment