Friday, 24 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 24 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता

****

आंध्र प्रदेशातल्या कुरनूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी आहेत. हैदराबादहून बंगळुरूला जात असलेल्या या बसने उलिंदाकुंडा जवळ अचानक पेट घेतला. बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी होते. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहिर केली आहे.

****

१७व्या रोजगार मेळाव्याचं आज देशभरात आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये ५१ हजारांहून अधिक युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत, तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे.

****

केंद्र सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये जीएसटी दर कमी केल्याचा लाभ देशभरातल्या नागरीकांना झाला आहे. कृषी क्षेत्रातल्या कर कपातीमुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विविध कृषी उपकरणांवरील कर १२ टक्क्यांवरुन पाच टक्के करण्यात आला असल्यामुळे शेतकर्यांना किफायतशीर दरात ही उपकरणे खरेदी करत येत आहेत. जैव - किटकनाशकांना पाच टक्के जीएसटीमध्ये ठेवण्यात आल्यामुळे जैविक शेतीला प्रोत्साहन मिळत असून, खत उत्पादनात वापरल्या जाणार्या कच्च्या मालावरील जीएसटी देखील पाच टक्क्यांवर आल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आहे.

****

देशभरात दहा कोटी स्मार्ट वीज मीटर बसवण्याचं उद्दीष्ट असून, त्यापैकी एक कोटी आधीच बसवण्यात आल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी दिली. ते हरियाणातल्या रोहतक इथं माध्यमांशी बोलत होते. स्मार्ट मीटर बसवल्यानं ग्राहकांच्या तक्रारी दूर होतील, तसंच ग्राहकांना त्यांचा वीज वापर नियंत्रित करता येऊन, वीज वाचवता येईल, असं ते म्हणाले. देशभरात आतापर्यंत अकराशे किलोमीटर मेट्रो रेल्वे लाईन बांधण्यात आल्या असून, मेट्रो रेल्वेच्या बाबतीत भारत जगात दुसर्या क्रमांकावर पोहोचेल, असं मंत्री मनोहर लाल यांनी यावेळी सांगितलं.

****

भारतात डिजिटल पेमेंट लँडस्केपचा झपाट्यानं विस्तार सुरु असून, या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत डिजिटल व्यवहारांचा वाटा एकंदर पेमेंट व्यवहारांच्या ९९ पूर्णांक आठ दशांश टक्के आणि एकूण मूल्याच्या ९७ पूर्णांक सात दशांश टक्के आहे, असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं एका अहवालात म्हटलं आहे. युपीआय हा प्रमुख पेमेंट प्लॅटफॉर्म असल्याचं दिसून आलं असून, त्याचा वाटा एकंदर व्यवहारांच्या प्रमाणात ८५ टक्के आणि मूल्याच्या नऊ टक्के असल्याचं या अहवालात नमूद आहे. या कालावधीत युपीआयद्वारे १४३ लाख ३० हजार कोटी रुपयांचे दहा हजार ६०० कोटीहून अधिक व्यवहार करण्यात आले आहेत.

****

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी काल अकोला आकाशवाणी केंद्राला भेट देऊन तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला. या केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या किसानवाणी, लोकसंगीत यासह विविध कार्यक्रमांची माहिती घेतली. अकोला आकाशवाणीच्या माध्यमातून स्थानिक जाहिरात संकलनाच्या कार्याला गती द्यावी, प्रेरणादायी कार्यक्रमाची निर्मिती करावी, बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीद सार्थकी ठरवावं असे निर्देश त्यांनी केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले.

****

केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या सामग्रीचं स्पष्ट लेबलिंग अनिवार्य करण्यात आलं आहे. डीपफेक आणि चुकीच्या माहितीमुळे होणारं नुकसान रोखण्यासाठी फेसबुक आणि यूट्यूबसारख्या मोठ्या मंचांसाठी वाढीव जबाबदारी देखील या बदलांमध्ये समाविष्ट आहे. माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ मधल्या प्रस्तावित सुधारणांमुळे चुकीच्या माहितीच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्याकरता स्पष्ट कायदेशीर आधार मिळणार आहे.

****

दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगाव मध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो पर्यटक तसंच भक्तांनी शेगावनगरी फुलून गेली आहे. दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, बारी महाप्रसाद पारायण व्यवस्था केली असून, भक्तांच्या सोयीनुसार भक्तनिवासामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संस्थांनच्या वतीने देण्यात आली.

****

बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सध्या धरणातून एक हजार ७४७ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

No comments:

Post a Comment