Saturday, 25 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      सर्वज्ञ चक्रधर स्वामींची समाजात समता स्थापन करण्याची विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्त्वाची-अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन 

·      सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला

·      ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं मूत्रपिंडाच्या विकाराने निधन

·      छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाला आरक्षणासाठी CPSN हा नवीन सांकेतांक

·      शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुनरुच्चार

आणि

·      तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून विजय

****

सर्वज्ञ चक्रधर स्वामींची समाजात समता स्थापन करण्याची विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक इथं, अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनात ते आज बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं योगदान महत्त्वाचं होतं, असं सांगत, रिध्दपूर इथं स्थापन मराठी भाषा विद्यापीठ जागतिक कीर्तीचं व्हावं, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली, ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

शीख धर्मियांचे गुरु श्री तेग बहादुर साहेब यांच्या साडेतीनशेव्या हौतात्म्य दिनानिमित्त आज मुंबईत झालेल्या शहिदी समागम या कार्यक्रमातही मुख्यमंत्री सहभागी झाले. राज्यातल्या घराघरांत गुरु तेगबहादूर साहेब यांच्या बलिदाना गाथा पोहोचवणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राज्यातली महायुती ही विचारांची युती असून महायुतीत कोणताही बेबनाव नाही, याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा १२७ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

****

एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युपीएस अर्थात युनिफाइड पेन्शन योजनेतल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आता Life Cycle 75 आणि Balanced Life Cycle या पर्यायांचा अवलंब करता येणार आहे. आतापर्यंत फक्त खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध होत्या. LC 75 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक शेअर बाजारात करता येईल. हे नवे पर्याय खुले झाल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना युपीएस आणि एनपीएसमधल्या गुंतवणुकीसाठी अधिकाधिक मार्ग उपलब्ध होतील, शेअर बाजारातली गुंतवणूक वाढवण्याचा पर्याय असल्यानं त्यांना अधिक परतावा मिळवता येईल.

****

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते मूत्रपिंड विकाराने त्रस्त होते. मुंबईत हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं आज निधन झालं. जाने भी दो यारो, शक्ती, हम आपके है कौन, हम साथ साथ हैं, मैं हूं ना, कल हो ना हो, फना, ओम शांती ओम आणि इतर चित्रपटांसह दूरचित्रवाणीच्या अनेक मालिका, अनेक जाहिरातपट तसंच विविध नाटकांतूनही त्यांनी काम केलं होतं. साराभाई वर्सेस साराभाई मालिकेतील इंद्रवदन ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा रसिकांच्या आजही स्मरणात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतीश शाह यांना श्रद्धांजली अर्पण करतांना, सहज-सुंदर अभिनयातून साकारलेल्या भूमिकांच्या रुपांमध्ये ते रसिकांच्या मनात चिरंतन राहतील, अशी भावना व्यक्त केली.

****

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक करण्याची प्रक्रिया रेल्वे विभागाने पूर्ण केली आहे. याबाबतचं परिपत्रक आज जारी झालं. आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा पूर्वी असलेला AWB हा सांकेतांक आता CPSN असा करण्यात आला आहे. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केलं आहे.

****

महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफीचं वचन दिलं असून शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. ते आज नांदेड जिल्ह्यात उमरी इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. कर्जमाफीसाठी शासनानं समिती स्थापन केली आहे. या समितीकडून कर्जमाफी कशी करता येईल, याचा अभ्यास सुरू असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आपल्या पक्षाची भूमिका ही सर्व जाती वर्गाला सामावून घेणारी असून, फुले, शाहू, आंबेडकरी विचारावरच वाटचाल करीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या मेळाव्याला माजी मंत्री नवाब मलिक, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यात आज दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान, भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. भूगर्भातून मोठा आवाज येऊन जमीन हादरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या तीन तालुक्यातील २५ ते ३० गावात सलग दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला असून, रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ९ एवढी नोंदवली गेल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं कळवली आहे.

****

सातारा जिल्ह्यात फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातला दुसरा आरोपी पोलीस कर्मचारी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. संबंधित महिला डॉक्टरचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्या प्रकरणी या दोन्ही आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई इथले वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कुलपती आचार्य देवव्रत यांनी याबाबतचे आदेश जारी केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे हे पद रिक्त झालं आहे.

****

राज्यातील तरुण खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली कामगिरी ही क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी असल्याचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. बहरीनमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय मुलींच्या कबड्डी संघातल्या सेरेना सचिन म्हसकर हिच्यासह संपूर्ण संघाचं अभिनंदन करतांना कोकाटे बोलत होते. अशा प्रतिभावंत खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन कोकाटे यांनी दिलं.

दरम्यान, कोकाटे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत मराठवाडा विभागाचा युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रम पार पडला. शालेयस्तर तसंच तालुकास्तरावर क्रीडा सुविधांचा विकास तसंच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीच्या सुविधा, सवलतींचा क्रीडा धोरणात समावेश करण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचं, कोकाटे यांनी सांगितलं.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या  सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखत पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं ४६ पूर्णांक ४ षटकांत २३६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल रोहित शर्मानं शतक आणि कोहलीनं अर्धशतक झळकावलं. यामुळे भारताला निर्धारित लक्ष्य सहज साध्य करता आलं. दरम्यान, तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियानं २-१ अशी जिंकली आहे.

या दोन्ही संघादरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेला येत्या बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. पहिला सामना कॅनबेरा इथल्या ओव्हल मैदानावर होणार आहे.

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारताचा उद्या बांगलादेशसोबत सामना होणार आहे.

****

सर्बियामध्ये सुरू असलेल्या जागतिक अंडर-२३ कुस्ती स्पर्धेत, भारतीय महिला कुस्तीगीर हंसिका लांबा हिनं ५३ किलो वजनी गटात आणि सारिका मलिक हिनं ६९ किलो वजनी गटाच्या अंतीम फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांची जपानी प्रतिस्पर्ध्यांशी सुवर्णपदकासाठी लढत होईल. भारतीय महिला कुस्तीगीरांनीही त्यांच्या संबंधित वजन गटात पाच कांस्यपदके जिंकली आहेत.

****

गडचिरोली जिल्ह्यात आज एका किशोरवयीन मुलाचा वीज कोसळून मृत्यू झाला. कोरचीपासून १८ किलोमीटर अंतरावरील केसालडाबरी इथं ही घटना घडली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

****

No comments:

Post a Comment