Saturday, 25 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      शासकीय नोकरी म्हणजे देशसेवेत सक्रीय योगदानाची संधी- १७ व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन; देशभरात ५१ हजारांहून अधिक युवकांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रं प्रदान  

·      हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकू नये-मुख्यमंत्र्यांचं कापूस तसंच सोयाबीन उत्पादकांना आवाहन; शासकीय यंत्रणेद्वारे संपूर्ण माल खरेदीची ग्वाही

·      यंदाचा ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान राबवला जाणार

आणि

·      भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज शेवटचा सामना

****

शासकीय नोकरी म्हणजे देशसेवेत सक्रीय योगदान देण्याची संधी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. १७ व्या रोजगार मेळाव्यात काल देशभरातल्या ५१ हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. त्यावेळी दृकश्राव्य संदेशातून पंतप्रधानांनी सर्वांना संबोधित केलं. भविष्यातल्या भारतासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी नियुक्ती मिळालेल्या तरुणांना केलं, ते म्हणाले...

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

देशभरात रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ११ लाख नियुक्त्या करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

   

नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत, मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत, तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. या लाभार्थ्यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...

लाभार्थी बाईट

****

भावी पिढी आरोग्यवान होण्यासाठी नैसर्गिक शेती अनिवार्य असल्याची भावना, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केली आहे. ते काल मुंबईत 'नैसर्गिक शेती' विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासावर आधारित Modi’s Mission या पुस्तकाचं प्रकाशन काल राज्यपालांच्या हस्ते मुंबईत झालं. प्रख्यात वकील बर्जिस देसाई यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

****

बेकायदेशीर बांग्लादेशी नागरिकांची काळी यादी तयारी करुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही याची खात्री करावी असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. दहशतवाद विरोधी पथकानं गुन्हा दाखल केलेल्या पावणे तेराशे बेकायदेशीर बांग्लादेशी नागरिकांकडे कुठलीही कागदपत्रं असतील तर ती रद्द करण्याचे आदेशही सरकारनं दिले. शिधापत्रिकांचं वितरण करताना कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करावी, असंही या आदेशात म्हटलं आहे.

****

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी केंद्र तसंच राज्य सरकारच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी केला जाईल, असं आश्वासन दिलं, ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

देशात लवकरच ‘भारत टॅक्सी’ ही सहकारी तत्त्वावर चालणारी टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. या प्रकल्पाचा प्रायोगिक टप्पा दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. अशाप्रकारची ही देशातील पहिलीच सहकारी टॅक्सी सेवा असेल.

****

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतुने दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ ऑक्टोबर या जन्मदिनापासून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा केला जातो. यावर्षी २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यभर आयोजित होणाऱ्या या सप्ताहात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. ‘दक्षता आपली सामायिक जबाबदारी’ अशी यंदाची संकल्पना आहे.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उमरी तसंच देगलूर इथं कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत.

****

हवामान बदलाची परिस्थिती लक्षात घेता, गेल्या काही वर्षांप्रमाणे देशात थंडीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरून त्यासाठी पूर्वतयारी करावी, अशी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिली आहे. १९ राज्य सरकारांना आणि ४ केंद्रशासित प्रदेशांना ही सूचना करण्यात आली आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत थंडीच्या लाटेमुळे तीन हजार ६३९ मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आयोगाने दिली.

****

आंध्र प्रदेशातल्या कुरनूल जिल्ह्यात काल पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. हैदराबादहून बंगळुरूला जात असलेल्या या बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी होते. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

****

जागतिक पोलिओ दिन काल पाळण्यात आला. देशाच्या पोलिओ निर्मूलनातलं यश हे समर्पित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. प्रत्येक बालकाचं वेळेत लसीकरण करावं आणि आरोग्यदायी, पोलिओमुक्त भारतासाठी एकत्र काम करावं, असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे.

****

राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातल्या जैवविविधता संवर्धनासाठी १ कोटी ३६ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. यामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातल्या कुंजीरवाडी या गावातल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना प्रत्येकी पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये निधी मिळणार आहे.

****

धाराशिव इथल्या प्रभात सहकारी पतपेढीच्या तेर शाखेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते काल झालं. सहकार क्षेत्रातील सभासदांनी सदैव जागृत राहण्याची गरज बागडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

सहकारातून विकास आणि विकासातून समृद्धी साधता येते, असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते काल नांदेड इथं भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखानाच्या ३०व्या गळीत हंगामाला प्रारंभ झाल्यानंतर बोलत होते. या कारखान्याची तीन दशकांची ही वाटचाल म्हणजे शेतकऱ्यांच्या परिश्रमाची, सहकाराच्या शक्तीची आणि सामुहिक विकासाच्या जिद्दीची कहाणी आहे, असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगर इथं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वंचित आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले.

****

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात भूसंपादनासाठी १८ कोटी ८९ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला. यामुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचा प्रत्यक्ष श्रीगणेशा लवकरच होईल, अशी अपेक्षा, मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

****

नांदेड इथं सामाजिक कार्यकर्ते विधीज्ञ दिलीप ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजातल्या वंचितांसोबत भाऊबीजेचा सण साजरा केला. शहरातले भिक्षेकरी तसंच भ्रमिष्ट इसमांना महिलावर्गाने ओवाळून मिठाई भरवली, तर पुरुष वर्गाने सुमन बालगृहातल्या मुलींकडून ओवाळून घेत, त्यांना मिठाई, फटाके, भेटवस्तू देत सहभोजनाचा आनंद घेतला.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला शेवटचा सामना आज सिडनी इथं खेळला जाणार आहे. हा सामना सकाळी नऊ वाजता सुरू होईल. या मालिकेत ऑस्ट्रेलियानं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

हवामान

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल पावसाच्या सरी कोसळल्या. येत्या दोन दिवसात, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment