Saturday, 25 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ ऑक्टोबर २०२ सकाळी .०० वाजता

****

निवडणुक प्रचारा दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या वापरासंबंधी निवडणूक आयोगानं नियमावली जारी केली आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या प्रतिमा, ऑडिओ किंवा व्हिडिओवर कृत्रिम सामग्री म्हणून चिन्हांकीत करण्यास बंधनकारक असल्याचं आयोगानं या नियमावलीत म्हटलं आहे. याबाबत चुकीच्या पद्धतीनं सादर करणाऱ्या आणि मतदारांना दिशाभूल करण्याच्या किंवा फसवण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या साहित्याची प्रसिद्धी करण्यास आयोगानं मनाई केली आहे. आयोगानं असे साहित्य तीन तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

****

नाशिक इथं आजपासून अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनाला सुरूवात होत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घघाटन होणार आहे. या सोहळ्यात नियोजित अध्यक्ष महंत मोहनराज कारंजेकर बाबा हे परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

****

पाकिस्ताननं त्यांच्या बेकायदेशीर ताब्याखालील प्रदेशांमध्ये, विशेषतः काश्मीरमध्ये, गंभीर आणि सतत होणाऱ्या मानवी हक्कांचं उल्लंघन थांबवावं, असं भारतानं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, पार्वतानेनी हरीश यांनी काल ८० व्या संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त आयोजित "संयुक्त राष्ट्र संघटना : भविष्यासाठी एक दृष्टी" या विषयावरील खुल्या चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित केलं.

जम्मू आणि काश्मीर हा  भारताचा अविभाज्य भाग असून तो नेहमीच भारताचाच अविभाज्य भाग राहील असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. वसुधैव कुटुंबकमसाठी भारत वचनबद्ध असून सर्वांसाठी न्याय, प्रतिष्ठा, संधी आणि समृद्धीसाठी भारतानं सातत्याने पुढाकार घेतल्याचं ते म्हणाले. भारत नेहमीच जागतिक दक्षिणेतील आपल्या सहकारी राष्ट्रांसोबत उभा राहिला असून त्यांना भविष्यातही पाठिंबा देत राहील असेही ते म्हणाले.

****

पाकिस्तानचा हॉकी संघ आगामी पुरुष ज्युनियर विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतात जाणार नाही, असं पाकिस्तानी महासंघानं आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला कळवलं आहे. पुढच्या महिन्यात तामिळनाडूमध्ये पुरुष ज्युनियर विश्वचषक स्पर्धा होणार आहे. पाकिस्तानला सरकारशी सहभागाबाबत सल्लामसलत करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय महासंघानं भारतात होणाऱ्या या स्पर्धेच्या सोडतीची घोषणा सुमारे एक महिना पुढे ढकलली. बिहारमधील राजगीर इथं झालेल्या पुरुष आशिया कपनंतर पाकिस्तानने माघार घेतलेली ही दुसरी स्पर्धा आहे.

****

चार दिवस चालणाऱ्या छठ उत्सवाची सुरुवात आजपासून न्हाय-खैय या पवित्र विधीनं होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसह देशभरातील भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनीही छठपूजेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. छठ पूजा परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक सौहार्दाचा उत्सव आहे, या शब्दात शहा यांनी जनतेच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या रामलीला मैदानावर श्री राम जानकी प्रतिष्ठानतर्फे छठपुजा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सुर्यदेवाला जल आणि गायीचं दूध अर्पण करण्यासाठी याठिकाणी तीन कृत्रिम तलाव बांधण्यात आले आहेत.

****

दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर आणि वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर बारा तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल दिवसभरात सुमारे दीड लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला शेवटचा सामना आज सिडनी इथं सुरु आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कांगारु संघाच्या २६ षटकात ३ गडी बाद १३७ धावा झाल्या होत्या. या मालिकेत ऑस्ट्रेलियानं दोन विरुद्ध शुन्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात काल कोलंबोमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या मैदानावर अनिर्णित राहिलेला हा स्पर्धेतील पाचवा सामना आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी गुण विभागले. सुरुवातीला पावसामुळे खेळ तीन तास उशिरा सुरू झाला, त्यानंतर पुन्हा पाऊस पडण्यापूर्वी फक्त ४ षटके आणि २ चेंडू खेळता आले.

****

राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘महादेवा’ योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत १३ वर्षाखालील मुला-मुलींसाठी धाराशिव जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या ३० तारखेला सकाळी १० वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल इथं ही चाचणी होणार असल्याचं, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी सांगितलं.

****

गेल्या चोवीस तासात कोकणात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात, कोकणात आणि इतर ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment