Monday, 27 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशाची जागतिक पातळीवरील सागरी ताकद आणि धोरणात्मक स्थान आपल्या किनारपट्टीच्या लांबीवरुन स्प्ष्ट होतं. देशात १३ किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्यांचा सागरी व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या जीडीपीमध्ये सुमारे ६०% वाटा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. शहा यांच्या हस्ते मुंबई इथं इंडिया मेरिटाईम विक या चौथ्या सागरी परिषदेचं आज उद्घाटन करण्यात आलं. आपल्याकडं असलेलं २३ पूर्णांक ७ लाख किलोमीटरचं विशेष आर्थिक क्षेत्र जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. आजच्या सागरी शिखर परिषदेतून भारतानं जागतिक गुंतवणूकदार आणि सागरी उद्योगातील व्यावसायिकांसाठी गुंतवणूकीच्या मोठ्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत, असं शहा यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महासागराचं धोरणात्मक आणि व्यापारी महत्त्व ओळखलं होतं आणि याच भूमीवर इंडिया मेरीटाईम वीक आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले. देशाच्या सागरी शक्तीचा महाराष्ट्राशी खूप जवळचा संबंध आहे. देशातील कंटेनर वाहतुकीत महाराष्ट्राचं सर्वाधिक योगदान असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. इंडिया मेरिटाईम विक या चौथ्या सागरी शिखर परिषदेचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते माझगांव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या विशेष नौका लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात येणार आहेत.

****

सरन्यायाधीश भूषण गवई येत्या 23 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडं केली आहे.

****

सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा वाढविण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाचे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून देशभरात दक्षता जागरूकता सप्ताह २०२५ साजरा केला जात आहे. "दक्षता - आपली सामुहिक जबाबदारी" ही यंदाच्या जागरुकता सप्ताहाची संकल्पना आहे. विविध मंत्रालये, विभाग, सार्वजनिक उपक्रम, बँका, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात आज प्रतिज्ञा घेऊन सप्ताहाची सुरुवात झाली. केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव आणि दक्षता आयुक्त ए. एस. राजीव यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय दक्षता आयोगाच्या अधिकाऱ्यांना शपथ दिली.

****

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मलेशियामध्ये आयोजित आसियान परिषदेदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय संबंध आणि व्यापार करारांबाबत चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात नमुद केलं. अमेरिका-पाकिस्तान संबंध, भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक, घनिष्ठ आणि महत्त्वपूर्ण नात्याविरोधात नसल्याचा पुनरुच्चार रुबिओ यांनी याप्रसंगी केला.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या  अवकाळी पावसाने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जामनझर परिसरात कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचं नुकसान झालं आहे. तसंच सोयाबीन, तूर, मका पिकाला देखील मोठा फटका बसल्यानं सरकारनं तातडीनं पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील नुकसान नुकसानग्रस्त शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या नागपूरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतमालाला  हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन, तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी हा मोर्चा असेल. बेलोरा ते नागपूर असा १८२ किलोमीटर हा मोर्चा निघणार आहे.

****

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथं उद्या पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. देगलूर बिलोली मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष आणि विविध पक्षातील अनेक प्रदेश पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मतदार याद्यांसंदर्भात नागरिकांच्या असणाऱ्या आक्षेप आणि तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगानं १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेल्या मतदार याद्यांबाबत काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यात दुबार नावे असणे ही तक्रार प्रामुख्याने आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

****

रायगड जिल्ह्यातील माथेरानची राणी ही मिनी ट्रेन १ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. जून ते ऑक्टोबर या काळात ही मिनी ट्रेन बंद होती. पावसानंतर रेल्वेमार्गाची दुरुस्ती आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर मिनी ट्रेन पर्यटकांना निसर्गाचा आनंद देण्यासठी सज्ज झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment