Tuesday, 28 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तातडीनं आणि ठोस पावलं उचलण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. आज नवी दिल्ली इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या आठव्या संमेलनात त्या बोलत होत्या. या समस्येचा परिणाम संपूर्ण जगावर होत असून भारत या समस्येचा सामना करण्यासाठी सज्ज होत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. यावेळी ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आणि आयएसएचे महासंचालक आशिष खन्ना उपस्थित होते. या संमेलनात १२४ देश आणि ४० हून अधिक देशांचे मंत्री सहभागी झाले आहेत.

****

राज्यात बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा, म्हणजे एम सँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चितीसंबंधीचा शासन आदेश आज जारी झाला. या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत एम सँड युनिट मंजुरीसाठी असलेले शासनाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबई इथं ही माहिती दिली.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई इथं मंत्रालयात नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. सिंचन प्रकल्पांचं काम वेगानं पूर्ण होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांमुळं नांदेड, लातूर आणि मराठवाडा विभागातील हजारो शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्याचा लाभ होईल, असं पवार यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी अंबाजोगाई आणि परळी या दोन तालुक्यात मोजणीचं काम प्रगतीपथावर आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ही माहिती दिली. दोन तालुक्यांतील चार गावांतील मोजणी पूर्ण झाली असून आणखी चार गावांतील मोजणी प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.

****

फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात वडवणी इथं आज आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांसह गावकरी सहभागी झाले होते.

****

माजी उपपंतप्रधान दिवंगत सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परभणी कृषी विद्यापीठ परिसरात वॉक फॉर युनिटी पदयात्रा काढण्यात आली. परभणी पोलीस दल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं ही पदयात्रा काढण्यात आली. पोलीस अधीक्षक रवींद्र सिहं परदेशी यांनी पदयात्रेविषयी माहिती दिली, ते म्हणाले...

बाईट - पोलीस अधीक्षक रवींद्र सिहं परदेशी

****

अबू धाबीमधील भारतीय दूतावासानं आजपासून अद्ययावत पारपत्र प्रणाली स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. युएईमधील सर्व भारतीय नागरिकांना एम्बेडेड चिप्ससह ई-पारपत्र जारी करणारी अद्ययावत प्रणाली सुरू करण्यात आली आहे. युएईमध्ये पारपत्राशी संबंधित सेवा घेणाऱ्या सर्व भारतीयांना हा नियम लागू होत असल्याचं भारतीय दुतावासानं स्पष्ट केलं आहे. आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आणि सुटसुटीत पारपत्र प्रक्रिया होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जाणवत आहे. आंध्र प्रदेशात किनारपट्टीवर ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगानं वारे वाहत असून मुसळधार पाऊस सुरु आहे. हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत काकीनाडा किनारी धडकण्याची शक्यता आहे. मोंथा चक्रीवादळामुळं आंध्र प्रदेशातील सुमारे एक हजार ४०० गावं आणि ४४ खेडी प्रभावित होणार आहेत. या चक्रीवादळामुळं आंध प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगढ आणि झारखंड राज्यांमध्ये बहुतांश जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानं विविध ठिकाणी पथकं तैनात केली आहेत.

****

प्रसिद्ध नाटककार आणि ‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचं वयाच्या 86 व्या वर्षी काल मुंबईत निधन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसच अजित पवार यांनी जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहिली. गंगाराम गवाणकर यांनी मालवणी बोलीभाषेच्या अस्सल भावविश्वाला मुख्य प्रवाहात आणल्याचं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

****

मराठी साहित्यक्षेत्रात संवेदनशील आणि वास्तववादी लेखनासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार यांचं निधन झालं. आज संध्याकाळी देगलूर तालुक्यातील मंगाजीवाडी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बिरादार यांच्या ‘अंतःपुरुष’, ‘अग्निकाष्ठ’, ‘कावड’, ‘संभूती’ या कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

****

No comments:

Post a Comment