Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरातमधील केवडिया इथं उद्या
एक भारत, श्रेष्ठ भारतचे प्रतीक असलेली भव्य
एकता परेड आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पाटणा इथं
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तची परेड
नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या परेडच्या धर्तीवर असेल, असं शहा यांनी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांव्यतिरिक्त, राज्यांचे पोलिस दल आणि देशभरातील कलाकार या कार्यक्रमाला
उपस्थित राहणार आहेत. तसंच सरदार पटेल आणि बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान गुजरातमधील एकता नगरमध्ये भारत पर्व साजरं
करण्यात येणार असल्याची माहिती शहा यांनी दिली.
बाईट – केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा
****
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर
आहेत. या भेटीदरम्यान, ते आज केवडिया येथील
एकता नगरमध्ये एक हजार १४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास
प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील आणि ई-बसना हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधानांच्या
हस्ते दीडशे रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशनही करण्यात येणार
आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये एकता दिनानिमित्त उद्या पदयात्रेचं
आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, शहागंज अशी ही पदयात्रा असणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. तसंच ३१
ऑक्टोंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात
सर्व महाविद्यालये, माध्यमिक विद्यालयांमध्ये
निबंध, चित्रकला, वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सरदार वल्लभभाई
पटेल आणि राष्ट्रनिर्माण याविषयावर आधारीत विविध कार्यक्रम होतील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाकडूनही उद्या एकता
दौड आयोजित करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या उपस्थितीत क्रांती चौक
इथून सकाळी साडेसहा वाजता ही दौड सुरु होईल.
****
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई
सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी या आठवड्यात तेरा कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ
आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केलं. बँकॉकहून येणाऱ्या प्रवाशांकडून १२ पूर्णांक
४१८ किलोचे अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी सहा प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात, शारजाह इथून ४० आयफोन
१७ प्रो मॅक्स युनिट्स, ३० लॅपटॉप, १२ दारूच्या बाटल्या आणि सिगारेट घेऊन जाणाऱ्या तीन प्रवाशांना
ताब्यात घेतलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी
आज नागपूर इथं प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनाला
भेट दिली. आपण एक शेतकरी म्हणून इथं आलो असून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण
पाठिंबा आहे, असं जरांगे यांनी सांगितलं. तर, जरांगे हे शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी झाल्यानं
आंदोलनाला फायदाच होईल, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. दरम्यान, आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर आपली पुढची
भूमिका जाहीर करू, असं कडू यांनी स्पष्ट
केलं.
****
आसियान आणि भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत
सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मलेशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी
रवाना होणार आहेत. शनिवारी संरक्षणमंत्र्यांची परिषद होणार आहे. आसियान सदस्य देश आणि
भारत यांच्यातील संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करणं आणि अॅक्ट ईस्ट धोरण पुढं
नेणं हा या परिषदेचा उद्देश असणार आहे, असं सिंह यांनी एका संदेशात म्हटलं आहे. या दौऱ्यात सिंह यांची मलेशियाच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा
होणार आहे.
****
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या
सामन्यात भारत- ऑस्ट्रेलिया लढत होणार आहे. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर
होणार हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होईल. आकाशवाणीवर या सामन्याचं
थेट प्रसारण हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये
दुपारी अडीच वाजल्यापासून ऐकता येईल. दरम्यान, काल रात्री गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या
पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर १२५ धावांनी मोठा विजय मिळवत, अंतिम फेरी गाठली.
****
हवामान
विदर्भ आणि खानदेशासह मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यासाठी आज पावसासाठीचा यलो अलर्ट
जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment