Thursday, 30 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑक्टोबर २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, ते आज केवडिया येथील एकता नगरमध्ये एक हजार १४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील आणि ई-बसना हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधानांच्या हस्ते दीडशे रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशनही करण्यात येणार आहे.

****

ज्येष्ठ भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मुझफ्फरपूर आणि छपरा इथं आज निवडणूक सभा घेणार आहेत. ते मुझफ्फरपूरमध्ये सकाळी ११ वाजता आणि छपरा येथे दुपारी १:४५ वाजता सभांना संबोधित करतील.  केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची पत्रकार परिषद होणार आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा नालंदा जिल्ह्यातील बरौनी आणि नागरनौसा इथं जाहीर सभांना संबोधित करतील.

****

आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज त्यांना अभिवादन केलं. महर्षी दयानंद सरस्वती यांनी वेदांचे ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवून अविस्मरणीय भूमिका बजावली आहे, असं शाह यांनी एका संदेशात म्हटलं आहे. महिला शिक्षण, समता आणि सन्मानासाठी त्यांनी चळवळी घडवल्या; तसच बालविवाह, पडदा पद्धती आणि सतीप्रथा यांसारख्या सामाजिक कुप्रथा विरोधात समाजात जागरूकता निर्माण केली. गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन करुन महर्षी दयानंद यांनी भारताच्या पारंपरिक शिक्षणपद्धतीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले. महर्षी दयानंद सरस्वती हे आजही प्रत्येक युवकासाठी चारित्र्य आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्याचे प्रेरणास्थान आहेत, असं शाह यांनी म्हटलं आहे. 

****

नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २५ हजार ५५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून सात हजार ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. केंद्र सरकारच्या माध्यमातून २९७ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग आणि रस्त्यांसाठी२ हजार ४५८ कोटी रुपये तर महामार्गाच्या २९४ किलो मीटर लांबीच्या  सात कामांसाठी ४ कोटी ७४९ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आठ रेल्वे स्थानकांच्या कामासाठी १ हजार ४७६ कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले असून कुंभमेळाव्यतिरिक्त आराखड्यामध्ये नसलेल्या नाशिक इथल्या श्रीराम काल आणि प्रकल्पासाठी ९९ कोटी १४ लाख रुपये आणि ओझर इथल्या विमानतळाच्या विकासासाठी ६४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक इथल्या साधू ग्रामच्या भूसंपादनासाठी १ हजार ५० कोटी रुपये देखील राज्य शासनाने मंजूर केले आहेत, अशी माहिती गेडाम यांनी दिली.

****

मुंबई इथं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या ऑनलाईन प्रणालींच्या माध्यमातून विविध परवानग्यासाठी सुलभ प्रशासनासंबधी वास्तूशास्त्रज्ञ संघटनेला माहिती देण्यात आली. बृहन्मुंबई कार्यालयात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रॅक्टिसिंग इंजिनिअर्स आर्किटेक्ट्स अँड टाउन प्लॅनर्स असोसिएशन यांच्यासोबत "धोरण, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि डिजिटल सेवांद्वारे सुलभ संवाद” परिसंवाद सत्र संपन्न झालं. या परिसंवाद सत्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयामार्फत होत असलेल्या ऑनलाईन प्रणालीची सविस्तर माहिती देण्यात आली.

****

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामासाठी जगभरातील रामभक्तांनी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले की, राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत अंदाजे एक हजार पाचशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. बांधकाम पूर्ण होईपर्यंत हा खर्च सुमारे एक हजार आठशे कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. पुढच्या वर्षअखेरपर्यंत राम मंदिर पूर्णपणे तयार होईल, अशी ट्रस्टला आशा आहे, असं मिश्रा म्हणाले.

****

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. आज दुपारी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होईल. आकाशवाणीवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये दुपारी अडीच वाजल्यापासून ऐकता येईल. दरम्यान, काल रात्री गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर १२५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ५० षटकांत सात खेळाडू  गमावत ३१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १९४ धावांवर गारद झाला.

****

परभणी  इथं आज एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. बी. रघुनाथ सभागृहात होणाऱ्या या अभियानात थॅलेसेमिया तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment